मुुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सर्व केंद्रीय तपास यंत्रणांना खुले आव्हान दिले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मलिक यांनी जोरदार पवित्रा घेतला आहे. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर मलिक यांनी एनसीबी आणि वानखेडे यांच्या गैरव्यवहारांवर चंगलीच आगपाखड केली आहे. वानखेडे यांचे मालदीव आणि दुबई दौऱ्यांसह विविध प्रकारचे दावे, पुरावे मलिक यांनी सादर केले आहेत. गेल्या काही काळात तर त्यांची जवळपास दररोज पत्रकार परिषद होत आहे. त्यात आता मलिक यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन चांगलेच आव्हान दिले आहे.
नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, आज मी दुबईला रवाना होत आहेत. काही कामानिमित्त मी दुबईला जात आहे. यासंदर्भात आवश्यक असणारी सर्व ती परवानगी राज्य आणि केंद्र सरकारकडून घेतली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला मी भारतात परत येईन. माझी सर्व सरकारी तपास यंत्रणांना विनंती आहे की, त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि मी कुठे जातो, काय करतो यावर पाळत ठेवावी, असे मलिक यांनी म्हटले आहे.
मलिक यांनी केलेल्या विविध आरोपांमुळे ते सध्या विशेष चर्चेत आहेत. तसेच, त्यांनी वेळोवेळी विविध प्रकारचे पुरावेही सादर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत ते अचानक आणि तेही कुणाला काहीही न सांगता दुबईला गेले असते तर त्याचे विविध अर्थ काढले गेले असते. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या परेश दौऱ्याची माहिती स्वतःच दिली असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1461613137581338624