मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येईल की नाही याचा फैसला झाला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. येत्या 20 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका राज्यमंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक आणि देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहेत.
न्यायमूर्ती एनजे जामदार यांनी गुरुवारी सर्व पक्षकारांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतला आणि शुक्रवारी निकाल दिला जाईल, असे सांगितले. सुनावणीदरम्यान, मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी असे सांगितले की, मंत्र्यांची केस ही मतदानासाठी न्यायालयीन कोठडीत असताना सुरक्षा कवचाखाली जाण्याची परवानगी देण्याची साधी विनंती होती.
सुनावणीदरम्यान देसाई म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम ६२(५) तुरुंगातील लोकांना मतदान करण्यास मनाई करत असले तरी, सुरक्षा व्यवस्था आणि कारागृहात अशा भौतिक समस्यांमुळे असे निर्बंध आहेत. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि जामीन देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. कारण, त्यांची २ मते कमी झाली आहेत.
राज्य विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी येत्या सोमवारी द्विवार्षिक निवडणूक होत आहे. इलेक्टोरल कॉलेजमध्ये मतदानासाठी राज्य विधानसभेचे सदस्य असतात. एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात भाजपचे पाच आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार (महाविकास आघाडीचे एकूण सहा उमेदवार) उभे केले आहेत.