मुंबई – तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील सगळ्याच राज्यांमध्ये विद्ध्वंस केला आहे. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांचे शोधकार्य वेगाने सुरू आहे. आतापर्यंत २६ लोकांचा मृत्यू झालेला आहे. चक्रीवादळाच्या सहा दिवसांनंतर बचावकार्य वेगाने करण्यासाठी शनिवारी (२२ मे) नौदलाने मुंबईच्या किनार्यावर डायव्हिंग टीमला तैनात केले आहे. शनिवारी सकाळीच टीमला रवाना करण्यात आले आहे.
बजरा पी ३०५ आणि वरप्रदाचे बेपत्ता चालक दलाला शोधण्यासाठी विशेष डायव्हिंग टीमला आयएनएस मकर जहाजावर तैनात केले आहे. सोबत साई़ड स्कॅन सोनार आणि आयएनएस तरासासुद्धा तैनात आहे, अशी माहिती नौदलाचे प्रवक्त्यांनी ट्विट करून दिली.
अरबी समुद्रात सोमवारी (१७ मे) बुडालेल्या पी३०५ जहाजावरील खलाशांच्या मृतांची संख्या ६० झाली आहे. सध्या ११ लोकांचा शोध घेतला जात आहे. चक्रीवादळामुळे बेपत्ता झालेले लोक जीवंत असण्याची शक्यता कमीच असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. खूपच खराब वातावरणात
नौदलाच्या जवानांनी बजरा पी ३०५ जहाजावरील २७३ पैकी १८४ खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. इतर दोन बजरा आणि तेल उत्खनन केंद्रातील सर्व लोक सुरक्षित आहेत. गेल्या चार दशकांमधील हे सर्वाधिक आव्हानात्मक बचावकार्य असल्याचे नौदलाचे उपप्रमुख वाइस अॅडमिरल मुरलीधर पवार यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किना-यावर आदळण्याच्या काही तासांपूर्वी मुंबईजवळ अरबी समुद्रात हे जहाज फसले होते. बुधवारपर्यंत पी ३०५ वरील १८४ खलाशांना वाचविण्यास यश आले. आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या खलाशांना घेऊन मुंबईच्या किना-यावर पोहोचले आहेत. आयएनएल तेग, आयएनएस बेतवा, आयएनएस व्यास, पी८१ विमान आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव आणि शोधकार्य सुरू आहे, असे नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.