नवरात्रोत्सव विशेष लेखमाला
II नारायणी नमोस्तुते II
वाराणशीची आदिशक्ती दुर्गामाता
गंगेच्या काठावर वसलेली काशी प्राचीन नगरी आहे.येथे भगवान भोलेनाथाचं दर्शन करण्यासाठी देशभरांतून दरवर्षी लाखो भाविक येतात. काशी ही केवळ शिवाचीच नगरी नाही तर ही आदिशक्तीची देखील नगरी आहे. येथील दुर्गा मातेचे मंदिर काशी विश्वनाथाच्या मंदिरा एवढेच प्राचीन आहे. वाराणशीत अनेक मंदिरं आहेत त्यात दुर्गा मातेचे मंदिर प्रमुख आहे. वर्षभर काशीत विश्वनाथाचं दर्शन घेणारे भाविक तर आदिशक्ती दुर्गा मातेचं दर्शन तर घेतातच परंतु नवरात्रोत्सवांत दुर्गा मातेची पूजा करायला व दर्शन घ्यायला लाखो भाविकांची रिघ लागते.
या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे दुर्गा मातेच्या अनेक रुपांचे दर्शन करण्याचे भाग्य येथे मिळते. यामुळेच येथे भाविक तासन तास दुर्गा मातेच्या दर्शानासाठी रांगेत उभे असतात. येथे आल्यावर भाविकांना सकारात्मक उर्जा प्राप्त झाल्याचा अनुभव येतो. यामुळे अनेक भाविक मातेचे दर्शन झाल्यावर काही वेळ बाहेर प्रांगणात बसतात, स्थिर होतात आणि मगच बाहेर जातात.मंदिराची रचना अशी आहे की बाहेरच्या रस्त्यांवरुनही दुर्गा मातेचे मुख दर्शन घेता येते.
मंदिराची निर्मिती कशी झाली?
अठराव्या शतकांत रानी भावानीने या मंदिराची निर्मिती केली. ती स्वत: देवीची नि:स्सीम भक्त होती. या मंदिराच्या प्रमुख वैशिष्ट्यांत मंदिर परिसरांत बनविलेल्या कुंडाचा समावेश होतो. हे कुंड गंगा नदीशी जोडलेलं आहे असं म्हणतात. या मंदिराची निर्मिती लाल दगडां पासून उत्तर भारतीय नागर शैलीत करण्यात आली आहे. येथे माता दुर्गा देखील लाल रंगातच अवतीर्ण झाली आहे.दुर्गा माता येथे शक्ती रुपांत पहायला मिळते. एवढंच नाही तर मंदिरांत प्रवेश केल्यावर मंदिराच्या भिंतींवर कित्येक सुंदर नक्षीदार दगड कोरलेले दिसतात.वारणसी कैंटोनमेंट स्टेशन पासून ऑटो रिक्षाने मंदिरा पर्यंत जाता येते.
काशीतील प्राचीन मंदिर
मंदिरांत माता दुर्गा यंत्र रुपांत विराजमान आहे. मंदिर प्रांगणात दुर्गा माते शिवाय देवी सरस्वती,लक्ष्मी, काली आणि बाबा भैरवनाथ यांच्या वेग वेगळ्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. हे मंदिर आदि काला पासून अस्तित्वात आहे अशी मान्यता आहे. दुर्गा मातेने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध केल्या नंतर येथे विश्रांती घेतली आणि याच ठिकाणी ती शक्ती रुपांत विराजमान झाली आहे. प्राचीन काळी काशी मध्ये फक्त तीनच मंदिरं होती. पाहिले मंदिर काशी विश्व नाथाचे, दुसरे मंदिर अन्नपूर्णा देवीचे आणि तिसरे मंदिर दुर्गा मातेचे. धार्मिक परंपरेनुसार येथील दुर्गा कुंडात तंत्र पूजा देखील केली जाते. तसेच या कुंडात होम हवन देखील केले जाते.
दुर्गाकुंडाजवळ अनेक मंदिरे
वाराणशीच्या दुर्गा कुंडाजवळ अनेक मंदिरं आहेत. यांत संकट मोचन, तुलसी मानस मंदिर आदींचा समावेश होतो. दुर्गा कुंडला गेल्यावर आसपासच्या मंदिरांचे सहज दर्शन घडते. शारदीय नवरात्रांत तर या मंदिराचे महत्व अधिकच वाढते. नवरात्रांत चौथ्या माळेला मातेला कुष्मांडा मातेच्या रुपांत पुजलं जातं. या काळात मंदिर खूप छान सजवितात.या मंदिरांत देवीचं तेज इतकं प्रखर असतं की माते समोर उभं राहून दर्शन घेतांनाच कित्येक जन्मातील पापं जळून भस्मसात होतात असे मानतात.
या मंदिराची निर्मिती इ.स. १७६० मध्ये रानी भवानीने केली होती.त्यावेळी मंदिर निर्मिती साठी ५० हजार रूपये खर्च आला होता अशी नोंद आहे.दुर्गा कुंड क्षेत्र पूर्वी वनाच्छादित होतं या वनांत असंख्य वानरं देखील होते. परंतु कालानुसार वनांची कत्तल झाली व त्यामुळे वानरांची संख्याही कमी झाली. अयोध्येचा राजकुमार सुदर्शन याला वाचाविण्यासाठी भगवती माता या ठिकाणी कशी अवतीर्ण झाली या विषयीची पौराणिक कथा येथील पुजारी सांगतात.
रक्ताने भरले दुर्गा कुंड!
अयोध्येचा राजकुमार सुदर्शन याचं शिक्षण भारद्वाज ॠषिंच्या आश्रमांत प्रयागराज येथे झाले.शिक्षण पूर्ण झाल्यावर राजकुमार सुदर्शनाचा विवाह काशी नरेश राजा सुबाहू याच्या कन्येशी झाला. या विवाहाची कथाही मनोरंजक आहे.
काशी नरेश राजा सुबाहु यांनी आपली कन्या उपवर झाल्यावर तिचा विवाह करण्यासाठी स्वयंवराची घोषणा केली.परंतु स्वयंवराच्या एक दिवस आधी राजकन्येला स्वप्नं पडले. त्या स्वप्नात आपला विवाह अयोध्येचा राजकुमार सुदर्शन याच्याशी झाल्याचे तिला दिसले. राजकुमारीने आपले स्वप्न आपल्या पित्याला राजा सुबाहू याला सांगितले.
काशी नरेशाने स्वयंवरासाठी आलेल्या राजा-महाराजांना हे सांगितले तेव्हा सगळे राजे महाराजे राजा सुदर्शनच्या विरोधांत उभे राहिले.त्या सगळयांनी त्याला सामुहिक रुपांत युद्ध करण्याचे आव्हान दिले. राजकुमार सुदर्शनने त्यांचे हे आव्हान स्विकारले. आणि युद्धात विजय मिळावा म्हणून माता भगवतीला युद्धात विजय मिळू दे अशी प्रार्थना केली. राजकुमार सुदर्शन याने ज्या ठिकाणी आदिशक्तिची आराधना केली तेथे देवी माता प्रकट झाली.तिने सुदर्शनला विजयी होण्याचे वरदान दिले आणि स्वत:च त्याचे प्राण रक्षण केले.
असं म्हणतात की, जेव्हा राजा महाराजांनी सुदर्शनला युद्धासाठी आव्हान दिले तेव्हा माता आदिशक्तीने युद्ध भूमीत प्रकट होउन सर्व विरोधकांचा वध केला. या युद्धात इतका प्रचंड रक्तपात झाला की तेथे मानवी रक्ताचे एक कुंडचा तयार झाले. तेच पुढे दुर्गा कुंड या नावाने प्रसिद्ध झाले.असं म्हणतात की या कुंडात थेट पाताळातून पाणी येते. त्यामुळे या कुंडातलं पाणी कधीच अटत नाही की कमी होत नाही.
याने बांधले पहिले दुर्गा मंदिर
सुदर्शनचं रक्षण केल्यावर मातेने काशी नरेशाला दर्शन देऊन आपल्या कन्येचा विवाह सुदर्शनशी करण्याचा आदेश दिला. माता म्हणाली, ” कोणत्याही युगात या ठिकाणी येउन जो मनुष्य मनापासून माझी आराधना करील त्याला मी साक्षात दर्शन देईन व त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. हे स्वप्न पहिल्या नंतर राजा सुबाहूने येथे मातेचे मंदिर बनविले. या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार झाला. हे मंदिर गेल्या अनेक वर्षांत लाखो भाविकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे.
पौराणिक मान्यतेनुसार ज्या ज्या दिव्य स्थळी देवी माता साक्षात प्रकट होते तेथील मंदिरांत देवीची मूर्ती प्रतिमा स्थापन केली जात नाही. अशा मंदिरांत ‘यंत्र पूजा’ केली जाते. येथे मातेच्या मूर्ती ऐवजी मातेचा मुखवटा आणि चरण पादुका यांची पूजा केली जाते.तसेच येथे यांत्रिक पुजाही केली जाते.एवढंच नाही तर काशी तील या दुर्गा मंदिराची स्थापना ‘बीसा यंत्रा ‘वर आधारित आहे. बीसा यंत्र म्हणजे वीस कोनाची यांत्रिक संरचना ज्यावर मंदिराची आधारशिला ठेवण्यात आली आहे.ज्यावेळी काशीला जाण्याचा योग येईल त्यावेळी काशी विश्वनाथा सोबत दुर्गा मातेचे मंदिरही पहायला विसरु नका.