मुंबई – नवरात्रीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून यासाठी घरोघरी तयारी सुरू झाली आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे सार्वजनिकरित्या नवरात्रोत्सव मोठया प्रमाणावर साजरा करणे शक्य नसले तरी सर्व नियम पाळून घरोघरी नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. या सणानिमित्त घटस्थापनेपासून दररोज विविध रंगाचे वस्त्र देवीला परिधान करण्याचे करण्यात येते. तसेच महिलांना देखील प्रत्येक दिवशी या सणाला वेगवेगळ्या रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घालण्याची संधी या निमित्त मिळते. यंदाच्या नवरात्रीसाठी कोणते नऊ रंग आहेत ते जाणून घेऊ या…
नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे रज, ताम आणि सत्त्व या तीन गुणांमध्ये संतुलन प्रस्थापित करून जीवनाला सकारात्मक दिशा देण्याची संधी आहे. या पवित्र दिवसांमध्ये आपण उपवास, साधना आणि मौनातून आपला विवेक शुद्ध करू शकतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. हे नऊ दिवस अतिशय आनंदाचे, उत्साहाचे आणि भक्तीमय असतात. यंदा नवरात्रोत्सव गुरुवार, दि. ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा यासोबत नऊ रंगाचे कपडे घालण्याची महिला वर्गामध्ये उत्सुकता असते.
नऊ दिवसांच्या या उत्सवात प्रत्येक दिवशी एक रंग दिलेला असतो. त्यानुसार साडी, वस्त्र परिधान केले जातात. अलिकडच्या काळात ही प्रथा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे केवळ महिलांकडूनच नाही तर पुरुषांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला असो की, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असोत, नऊ दिवस रंगाचे कपडे अगदी आर्वजून घालतात. यंदा नवरात्रोत्सवात कोणत्या दिवशी कोणता रंग आहे.
घटस्थापना/प्रतिपदा – पहिला दिवस – दि.७ ऑक्टोबर – पिवळा
द्वितीया – दुसरा दिवस – दि. ८ ऑक्टोबर – हिरवा
तृतीया – तिसरा दिवस – दि.९ ऑक्टोबर – राखाडी
पंचमी – चौथा दिवस -दि.१० ऑक्टोबर – नारंगी किंवा केशरी
षष्टी – पाचवा दिवस -दि. ११ ऑक्टोबर – पांढरा
सप्तमी सहावा दिवस -दि.१२ ऑक्टोबर – लाल
अष्टमी सातवा दिवस -दि. १३ ऑक्टोबर – रॉयल ब्लू किंवा निळा
नवमी आठवा दिवस – दि.१४ ऑक्टोबर – गुलाबी
दशमीचा नववा दिवस -दि. १५ ऑक्टोबर – जांभळा
या रंगामागे नेमके धार्मिक कारण काय आहे ते देखील जाणून घेऊ या…
१ ) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या वर्षी दि. ७ ऑक्टोबरला शैलपुत्री देवीचा दिवस आहे. या दिवशी मातेची पिवळ्या रंगाची वस्त्रे घालून पूजा करावी.
२ ) नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या वर्षी दि. ८ ऑक्टोबर हा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा असल्याने या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालून मातेची पूजा केली जाईल.
३ ) नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या वर्षी दि. ९ ऑक्टोबर हा दिवशी तृतीया असल्याने या दिवशी चंद्रघंटा देवीला वंदन केले जाते. या दिवशी राखाडी कपडे घातले जातात.
४ ) नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या वर्षी दि.१० ऑक्टोबर रोजी कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करावे.
५ ) नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या वर्षी दि.११ ऑक्टोबर रोजी स्कंदमाते देवीची पूजा केली जाईल. या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे.
६ ) नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या वर्षी दि. १२ ऑक्टोबर हा दिवस कात्यायनी देवीच्या पूजेचा असेल. या दिवशी लाल वस्त्र परिधान करून मातेची पूजा करावी.
७ ) नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या वर्षी दि.१३ ऑक्टोबरला कालरात्री देवीच्या पूजेचा दिवस असेल. या दिवशी शाही निळ्या रंगाचे कपडे घाला आणि कालरात्री देवीची पूजा करावे.
८ ) नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या वर्षी दि. १४ ऑक्टोबर, रोजी महागौरी देवीचा दिवस आहे. या दिवशी गुलाबी वस्त्र परिधान करून मातेची पूजा करावी.
९ ) नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या वर्षी दि. १५ ऑक्टोबर हा सिद्धिदात्री देवीचा दिवस असेल. या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत.
सर्वांसाठीच नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. शारदीय नवरात्र यंदाच्या वर्षी गुरुवारी सुरु होऊन, गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्याने यंदा नवरात्री आठ दिवस साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे.
दि. ७ ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष एकमपासून सुरु होऊन दुर्गा महानवमी दि. १४ ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. या निमित्ताने लोक कन्या पूजन देखील करतात. दि. १५ ऑक्टोबर रोजी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ‘विजयादशमी’ म्हणजेच दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे.
राज्यातील करोना प्रतिबंधासाठीचे कडक निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी देखील यंदाही नवरात्रोत्सवदेखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व नवरात्रोत्सव मंडळांना केल्या आहेत. तसेच याबाबत नियमावली जारी केली आहे. नवरात्रोत्सवाच्या मंडपात मास्क घालणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर राखणे आणि हात नियमित धुणे असे नियम काटेकोटपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.