नवरात्रोत्सव विशेष लेखमाला
II नारायणी नमोस्तुते II
महैर माता
(शारदेचं देशातील एकमेव मंदिर!)
शारदा देवीचं देशातील एकमेव मंदिर मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात आहे. जबलपुर पासून सतना ला जाण्यासाठी साडेचार तास लागतात. सतना पासून सुमारे ४० किमी अंतरावर महैर गावात त्रिकुट पर्वताच्या सर्वोच्चशिखरावर महैर मातेचं मंदिर आहे.हेच आहे देशातील शारदा देवीचं एकमेव मंदिर. शारदा मातेचं हे मंदिर महैर मातेच्या नावानेच प्रसिद्ध आहे. त्रिकुट पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर सुमारे ६०० फूट उंचीवर देवीचं हे मंदिर आहे. शारदा मातेचे हे स्थान जागृत असून आजही येथे चमत्कार घडतात अशी लोकमान्यता आहे. शारदा मातेचे हे मंदिर म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताचे जन्म स्थान आहे असे मानले जाते. महैर येथील शारदा देवीचे मंदिर देशातील एकमेव शारदापीठ आहे अशी मान्यता आहे.
शारदा देवीच्या देशातील या एकमेव मंदिरांत दुर्गा देवी आणि सरस्वती देवी यांचेही भाविकांना दर्शन घडते. भारतातील प्रमुख तीर्थ स्थानांत महैर येथील शारदा मातेच्या मंदिराचा समावेश केला जातो. खरं सांगायचं तर आपल्या महाराष्ट्रांत शारदा आणि सरस्वती ही एकाच देवीची दोन नावं आहेत असं आपण मानतो.आणि ते खरं आहे. देवीची मूळ तीन रूपं सर्वांना ठाऊक आहेत. दुर्गा किंवा काली किंवा पार्वती हे पहिले रूप.दुसरे रूप म्हणजे माता लक्ष्मी किंवा महालक्ष्मी आणि तिसरे रूप म्हणजे सरस्वती. साधारण पणे देशांत कुठेही गेलं तरी देवीच्या मंदिरांत. काली माता, महालक्ष्मी माता आणि सरस्वती माता या तीन देवींची रूपं पहायला मिळतात. देशांत सर्वत्र काली आणि लक्ष्मीची अनेक मंदिरं दिसतात. सरस्वती किंवा शारदेची स्वतंत्र मंदिरं मात्र क्वचितच दिसतात. त्यामुळच महैर येथील शारदा मातेच्या मंदिराला असाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे.
सरस्वती किंवा शारदा देवी यांना आपण विद्येची देवता मानतो. आपल्याला जी बुद्धि आहे किंवा आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते ते सरसवती मातेमुळे प्राप्त होते. पौराणिक ग्रंथांत सरस्वतीची दोन रूपं केली आहेत.एक आहे ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती आणि दुसरी आहे विष्णु पत्नी सरस्वती जी ब्रह्मदेवाची कन्या आहे. ही जी दुसरी सरस्वती आहे विष्णुची पत्नी तिचा जन्म ब्रह्मदेवाच्या जिभे पासून झाला असे म्हणतात. काही ठिकाणी ब्रह्माच्या नाभीतून सरस्वतीचा जन्म झाला असे म्हणतात. त्यामुळे तिला ब्रह्मदेवाची कन्या म्हणतात.
सरस्वतीला वाणी, शारदा, वागेश्वरी, वेदमाता अशा विविध नावांनी ओळखतात. ही देवी शुक्लवर्ण ,शुक्लाम्बरा, वीणा व पुस्तक धारण केलेली असून श्वेत पद्मासनावर आरूढ़ झालेली आहे. सरस्वतीची उपासना केल्यावर जगातील महामूर्ख देखील विद्वान् होऊ शकतो असे मानतात.माघ शुक्ल पंचमी ( श्री पंचमी /वसंत पंचमी) ला सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. देवी सरस्वतीचे वर्णन वेदांमधील मेधा सूक्त ,उपनिषद,रामायण,महाभारत,कालिका पुराण वृहत्त नंदिकेश्वर पुराण, तसेच शिव महापुराण,श्रीमद देवी भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण यांत विस्ताराने आले आहे.
पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. सर्व प्रकारच्या वनस्पती, झाडं,वृक्ष, डोंगर,दर्या,समुद्र तयार केले.तसेच सर्व प्रकारचे जलचर प्राणी,पशु,पक्षी निर्माण केले. पण या सगळयांमध्ये एक कमतरता होती.उणीव होती. कोणताही आवाज किंवा शब्द नव्हता. सर्वत्र भीषण शांतता होती. हे पाहिल्यावर ब्रह्मदेवाने भगवान विष्णुंना आवाहन केले.भगवान विष्णु आले.ब्रह्माजींनी त्यांना आपली समस्या सांगितली. तेव्हा भगवान विष्णुंनी आदिशक्तीला आवाहन केले. या विश्वाचे मूळ स्वरूप असलेली आदिशक्ती ज्योतिपुंज स्वरुपांत त्वरित प्रकट झाली.
ब्रह्मा आणि विष्णुंनी आपली समस्या तिला सांगितली आणि ही समस्या निवारण करण्याची विनंती केली. ब्रह्मा आणि विष्णु यांचे म्हणने ऐकून घेतल्यावर आदिशक्तीच्या मुखावर स्मितहास्य उमटले. आदिशक्तिने संकल्प करून स्वत:च्या अंशातून श्वेत वर्णाचे प्रचंड तेज निर्माण केले. हे तेज दिव्य नारी रुपांत प्रकट झाले. या नारीच्या हातांत वीणा, वर मुद्रा, पुस्तक,आणि माला होती श्वेत वर्णाच्या कमळावर ती बसलेली होती.
मूळ प्रकृती आदिशक्तीच्या शरीरातून तेज प्रकट होताच त्या देवीने वीणेचा मधुर नाद केला त्याच क्षणी संपूर्ण विश्वातील समस्त जिवांना ‘वाणी’ प्राप्त झाली. जलधारेचा कोलाहल,वायुची सरसर उत्पन्न झाली.संपूर्ण विश्वात नाद निर्माण झाला.तेव्हा स्वर्गातील सर्व देवतांनी ‘शब्द’ आणि ‘रस’यांचा संचार करणार्या त्या देवीला ब्रह्मज्ञान ,विद्या, वाणी, संगीत कलेची अधिष्ठात्री देवता ‘सरस्वती’ असे नावं दिले तिचे स्तवन केले. त्यानंतर त्या आदिशक्ती मूळ प्रकृतीने पितामह ब्रह्मला सांगितले की माझ्या तेजा पासून उत्पन्न झालेली ही देवी सरस्वती आपली अर्धांगिनी शक्ती अर्थांत पत्नी होईल. जशी विष्णूची शक्ती लक्ष्मी आहे, शिवाची शक्ती पार्वती आहे तशी सरस्वती देवी आपली शक्ती होईल. असे म्हणून ती आदिशक्ती अदृश्य झाली. या पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती देखील दुर्गा आणि लक्ष्मी यांच्या प्रमाणेच महाशक्ती पासून सत्व गुणांनी उत्पन्न झालेली मूळ देवी आहे.
सरस्वती देवीला वागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी अशा अनेक नावांनी ओळखतात.हिची सर्व रुपे ब्रह्मविद्या,बुद्धि तसेच वाक म्हणजे वाणी प्रदाता आहेत. संगीताची निर्मिती केल्यामुळे ही संगीताची अधिष्ठात्री देवी आहे. ॠग्वेदांत सरस्वतीचे वर्णन करतांना म्हटले आहे,
प्रणोदेवी सरस्वती वाजेभिर्वजिनीवती धीनामणित्रयवतु
म्हणजे ही परम चेतना आहे. सरस्वतीच्या रुपातच आपली बुद्धी,प्रज्ञा तथा मनोवृतींची संरक्षक आहे. आपल्यात जे आचरण आणि मेधा (बुद्धी) आहे त्याचा आधार भगवती सरस्वती हीच आहे. तिचे स्वरूप आणि वैभव अदभुत आहे.
अशा या शारदा किंवा सरस्वती देवीचं देशातील प्रमुख मंदिर मध्यपरदेशांत सतना जिल्ह्यांत महैर येथे आहे. मंदिर परिसरांत बाला गणपती,भगवान मुरुगा आणि श्री शंकराचार्य यांचीही मंदिरं आहेत. पर्वत शिखरावरील महैर मातेचं मंदिर अतिशय रमणीय आणि देखणं आहे.
महैर मातेच्या मंदिराचा इतिहासही इंटरेस्टिंग आहे. शारदा मातेचं हे मंदिर आल्हा आणि उदल नावाच्या देवीच्या दोन भक्तांनी शोधलं. आल्हा आणि उदल यांनी राजा पृथ्वीराज चौहान याच्याशी युद्ध केले होते याच काळात त्यांनी त्या मंदिराचा शोध लावला. देवी भक्त ‘आल्हा’ ने यामंदिरांत १२ वर्षे तप केले.त्याची कठोर साधना पाहून देवी माता त्याला प्रसन्न झाली तिने आल्हा व उदल यांना अमरत्वाचे वरदान दिले.त्यामुळे आज ९०० वर्षां नंतरही आल्हा व उदल जिवंत आहेत असे मानले जाते.
असं म्हणतात की, महैर मातेच्या मंदिरांत आजही रोज मध्य रात्री आल्हा व उदल येतात. तिची पूजा करतात आणि सुर्योदया पूर्वी निघून जातात.कारण जेव्हा दिवस उगवतो मंदिराचे दरवाजे उघडतात तेव्हा देवी समोर फरशीवर जल आणि फुलं अर्पण केलेली पहायला मिळतात. हा एक चमत्कार समजला जातो. जो आजही प्रत्यक्ष पहायला मिळतो.
या मंदिराची निर्मिती विक्रम संवत ५०२ मध्ये झाली आणि येथे देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना विक्रम संवत ५५९ म्हणजे ५७ वर्षांनी करण्यात आली असे म्हणतात. या मंदिरांत सर्व प्रथम गुरु शुक्राचार्य यांनी पूजा केली होती. महान इंग्लिश इतिहासकार कनिंघम यांनी या मंदिराचे संशोधन करून त्याविषयी सर्व प्रथम लिहिले. प्राचीन काली येथे पशुबली देण्याची प्रथा होती असे त्यांनी लिहिले आहे.त्यानंतर म्हणजे इ.स. १९२२ साली सतनाचे तत्कालिन राजे राजा ब्रजनाथ जूदेव यांनी येथील पशुबली देण्याची प्रथा बंद केली.
मंदिराची रचना
महैर माता मंदिराची रचना खूपच सुंदर आहे. हे मंदिर विक्रम संवत ५०२ मध्ये बांधण्यात आले. हे मंदिर उंच पहाडावर आहे.येथे शारदा मातेच्या हातात एक मधुपात्र आहे आणि अतिशय दयाळूपणे स्मितहास्य करीत माता भक्तांकडे पाहते आहे. तिच्या डाव्या हातांत पुस्तक आहे. तंत्र चुडामणी ग्रंथातील कथेनुसार देशांत देवीची जी 51 पीठं निर्माण झाली आहे त्या कथेशी या मंदिराचा संबंध जोडलेला दिसतो. येथे सतीचा माईचा गळयातला हार पडला म्हणून या स्थानाला माई+हार =महैर असे म्हणतात अशी एक कथा येथे सांगितली जाते.मंदिराच्या वेबसाइट वरही ही कथा दिलेली आहे.
चित्रकूट पासून महैर ११७ किमी अंतरावर आहे.
मातेचं मंदिर त्रिकुट पर्वताच्या उंच शिखरावर जमिनीपासून ६०० फूट उंचीवर आहे. मंदिरांत जाण्यासाठी १०६३ पायर्या आहेत. उन व पाउस यापासून भाविकांचे रक्षण व्हावे यासाठी या पायर्यांवर शेडस बसविल्या आहेत. सध्या मंदिरांत जाण्यासाठी रोप-वेची सुविधा देखील उपलब्ध आहे. येथील रोप-वे ची व्यवस्था खूप छान आहे.सकाळी ६.३० पासून रात्री ७.०० वाजे पर्यंत रोप वे सुरु असते. दर माणशी तिकिट दर रू.१०३/- आहे. महैर मातेची आरती पहाटे ५ वाजता व रात्री ८ वाजता होते. या मंदिरा प्रमाणेच येथे शारदा देवी मंदिर,हनुमान मंदिर महैर किल्ला चंडी देवी मंदिरं देखील पाहता येते. रामनवमी व नवरात्रांत येथे मोठी यात्रा भरते.
संपर्क: मां शारदा मंदिर
महैर, जिला सतना, मध्यप्रदेश -485771
मोबा.07828570775
www.maashardatemple.com
www.maashardalive.com