नवरात्रोत्सव २०२१ – II नारायणी नमोऽस्तु ते II – पहिली माळ
तांत्रिकांची काशी : आसामची कामाख्यादेवी
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला आठवते ती आसामची कामाख्या देवी. खरं सांगायचं तर आसामच्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी मनात घर करून राहिल्या आहेत. हिरवेगार चहाचे मळे, विशाल ब्रह्मपुत्रा, घनदाट काझीरंगा अभयारण्य, शक्तिशाली एकशिंगी गेंडा आदी. पण, आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजन करणार आहोत ते कामाख्या देवीचे. जाणून घेऊ या ऐतिहासिक मंदिर, त्याचा इतिहास, परंपरा आणि बऱ्याच काही बाबींविषयी…
आसामच्या म्हटल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टी भव्य, विशाल आणि अद्भुत आहेत. छोटे, लहान, क्षुद्र असं काही नाहीच. सगळं लार्जर दॅन लाईफ. इंग्रजीत ज्याला ‘ऑसम’ म्हणतात त्यालाच मराठीत ‘आसाम’ म्हणत असावे! सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन आहे कामाख्या देवीचं मंदिर! रेल्वे स्टेशनपासून ७ किमी अंतरावर निलाचल नावाच्या टेकडीवर हे भव्य मंदिर आहे.
मंदिर येथे कसे आले?
मंदिरालाही प्राचीन कथा आहे. मंदिराची माहिती देणाऱ्या पुजारी कम गाईडने सांगितले, “हे मंदिर कामदेवाने बांधलं असं म्हणतात. भगवान शंकर आणि पार्वती यांच्या प्रणयक्रीडेत व्यत्यय आणल्यामुळे क्रोधीत झालेल्या शिवाने आपला तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्मसात केलं. कामदेवाची पत्नी रतीने त्याची राख सांभाळून ठेवली. पुढे शरद ऋतूत प्रसन्न झालेल्या शिवाकडून रतीने कामदेवाला जिवंत करून घेतले. कामदेव जिवंत झाला खरा परंतु त्याच्यात पूर्वीचा जोम, उत्साह आणि तेज नव्हतं. हे तेज पुन्हा प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाने त्याला कामाख्या देवीचे स्थान शोधून तिथे मंदिर बांधायला सांगितलं. विश्वकर्माच्या मदतीने कामदेवाने हे मंदिर बांधलं म्हणून याला ‘कामाख्या मंदिर’ म्हणतात.”
पुढे वेगवेगळ्या शतकांत आसामच्या अनेक राजांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर अतिशय भव्य, प्रशस्त आणि देखणं आहे. मंदिरावर ७ घुमट आहेत. त्यावर कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. आसामी स्थापत्य कलेची छाप या मंदिरावर पडलेली सहज दिसते.
मंदिराच्या निर्मिती विषयीची आणखी एक आख्यायिका ऐका्यला मिळाली ती अशी, “असुरराज नरकासुर अहंकारी होता. भगवती कामाख्येला आपली पत्नी करून घेण्याची त्याची इच्छा होती व त्यासाठी तो आग्रही होता. नरकासुराचा मृत्यू जवळ आला आहे, हे ओळखून देवीने त्याला सांगितले की, आज एका रात्रीत तू नील पर्वताच्या चारही बाजूंना दगडाचे चार रस्ते तयार कर. आणि मंदिरासोबत एक विश्राम गृहही तयार कर. तू हे पूर्ण करू शकलास तर मी तुझी पत्नी होईन. आणि नाही करू शकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे.
अहंकारी राक्षसाने सकाळ होण्यापूर्वी दगडाच्या पायऱ्यांचे रस्ते तर तयार केले, पण विश्रामगृहाचे काम चालू असतानाच देवीने एका मायावी कोंबड्याच्याद्वारे सकाळ झाल्याचे सूचित केले. ज्यामुळे रागावलेल्या नरकासुराने त्याचा पाठलाग केला. ब्रह्मपुत्रेच्या दुसऱ्या तीरावर पोचलेल्या असूराने त्या कोंबड्याला मारले. हे ठिकाण आजही कुक्टाचकी नावाने प्रसिद्ध आहे. नंतर देवी भगवतीच्या मायेमुळे विष्णूने नरकासुराचा वध केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा भगदत्त कामरूपचा राजा झाला. भगदत्तानंतर कामरूप राज्य छोट्या भागात विभागले गेले आणि सामंत राजाचे राज्य सुरू झाले. नरकासुराच्या हीन कार्यामुळे तसेच मुनीच्या अभिशापामुळे देवी प्रकट व्हावे लागले होते.”
‘तंत्रचुडामणी’ ग्रंथातील सुप्रसिद्ध कथेनुसार सतीची योनी या ठिकाणी पडल्यामुळे देवीचे शक्तीपीठ येथे तयार झाले. देवीच्या ५१ शक्तीपिठांत कामाख्या मंदिराचा समावेश होतो. या विशाल मंदिराच्या प्रवेशद्वारातून जेव्हा गाभाऱ्यात देवीच्या मुख्यमूर्ती जवळ येतो तेव्हा चकित होतो. इतर मंदिरांत दिसणाऱ्या देवीच्या मूर्ती सारखी येथे देवीची मूर्ती दिसत नाही. एका खडकावर योनीच्या आकाराची प्रतिमा पहायला मिळते. कुंकवाचे मळवट भरल्यामुळे ही प्रतिमा लालसर रंगाची दिसते. गाभारा पूर्ण खडकाचाच आहे. प्रतिमेच्या खालून सतत पाणी झिरपत असते.
देवीचा ‘अम्बुवाची’ नावाचा उत्सव!
दरवर्षी जून महिन्यात ३-४ दिवस कामाख्या देवीचा ‘अम्बुवाची’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. याला सृजनाचा उत्सव म्हणतात. यावर्षी २२ ते २६ जून या कालावधीत हा उत्सव साजरा करण्यात आला. मराठीतील संशोधक साहित्यिक रा. चिं. ढेरे यांनी या विषयी सविस्तर लिहिले आहे. देवी जगदजननी आहे. संपूर्ण विश्वाची निर्मिती तिच्याच उदरातून झाली आहे. या तीन दिवसांत देवी रजस्वला होते, असे मानले जाते. यावेळी तिच्या शरीरातून रक्त बाहेर पडते. याकाळात मंदिर तीन दिवस बंद ठेवतात.
आडोसा म्हणून गाभाऱ्यात पांढरे कापड लावतात. ते कापड तीन दिवस झिरपणाऱ्या लाल रंगाच्या पाण्यामुळे रक्तवर्णी होते. हा एक चमत्कार मानला जातो. हा चमत्कार पाहण्यासाठी लाखो भाविक इथे येतात. चौथ्या दिवशी मंदिराचे पुजारी या कापडाचे तुकडे भाविकांना प्रसाद म्हणून वाटतात. रक्तवर्णी कापडाचे हे तुकडे मिळविण्यासाठी अहमहमिका लागते. भाविक हे तुकडे भक्तीभावाने घरी घेऊन जातात. देव्हाऱ्यात, तिजोरीत जपून ठेवतात.
सर्वोच्च कौमारी तीर्थ
सती स्वरूप आद्यशक्ती महाभैरवी कामाख्येचे तीर्थ हे जगातील सर्वोच्च कौमारी तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे या शक्तीपीठाच्या ठिकाणी कुमारी पूजनाचे अनुष्ठानही महत्त्वाचे मानले जाते. सर्व कुलांतील आणि वर्णांतील कुमारिका या आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जातात. यामध्ये जातिभेद पाळला जात नाही. असा भेद पाळल्यास साधकाची सिद्धी नाहीशी होते (असे मानले जाते.) शास्त्रात सांगितले आहे की, असा भेद केल्याने इंद्र्तुल्य देवालाही आपल्या श्रेष्ठ पदाला मुकावे लागले होते. या स्थळी आदिशक्ती कामाख्या कुमारी रूपात स्थापित आहे असे मानले जाते. ज्याप्रमाणे उत्तर भारतात कुंभमेळ्याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्याचप्रकारे आदिशक्तीच्या अम्बुवाची पर्वाचे महत्त्व आहे. तंत्र आणि मंत्रशास्त्राचे उपासक या काळात मंत्रांचे पुरश्चरण, अनुष्ठान करतात.
कामाख्या म्हणजे तांत्रिकांची काशी!
कामाख्या मातेचे मंदिर म्हणजे तांत्रिकांची काशी समजली जाते. जून महिन्यातील आम्बुवाची उत्सवाच्या काळात भारताप्रमाणेच बंगलादेश, तिबेट, आफ्रिका या देशातील तांत्रिकही आपल्या विद्येचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येथे येतात. वाममार्ग साधनेचे तर हे सर्वोच्च पीठ आहे. मच्छीन्द्रनाथ, गोरखनाथ, लोनाचमारी, इस्माईल जोगी सारखे जगप्रसिद्ध तांत्रिक कामाख्या विद्यापीठाचे गोल्ड मेडालिस्ट आहेत. येथे तंत्रसाधना करूनच ते जगप्रसिद्ध झाले.
फोटो काढल्यास ५ हजार दंड
या मंदिरांत देवीचा फोटो काढायला सक्त बंदी आहे. एखाद्याने चुकून किंवा जाणीवपूर्वक फोटो काढलाच तर त्याला ५ हजार रुपये दंड केला जातो. शिवाय तांत्रिकांची दहशत असते ती वेगळीच! देवीचा आम्बुवाची उत्सव आणि नवरात्रात लाखो भाविक, तांत्रिक, पर्यटक कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. त्यावेळी शिर्डी किंवा तुळजापूर सारख्या बारीतूनच देवीचे दर्शन घ्यावे लागते. येथे ५०१ रुपयात देवीचे पेड दर्शन देखील घेता येते. येथे जनावरांचे सर्रास बळी दिले जातात.
कामाख्या मंदिरांत पशु,पक्षी, कबुतर, कोंबड्या, बोकड, रेडे इत्यादी जनावरांचे सर्रास बळी दिले जातात. मंदिराचा एक भाग त्यासाठीच राखीव ठेवण्यात आला आहे. बळींची प्रथा बंद करण्यासाठी समाजसुधारक, अंधश्रद्धानिवारक, विचारवंत मंडळी लोकांचे प्रबोधन करतात. पण अजून तरी याला म्हणावे तसे यश मिळतांना दिसत नाही. या मंदिरांत कामाख्या देवी प्रमाणेच भैरवी, कामाख्या, प्रकांडचंडिका, छीन्नमस्ता, मातंगी ,त्रिपुरा, अम्बिका ,बगुला, भुक्तेशी, धुमिनी (धूमावती) ही कालीची १० उग्र रूपं पाहायला मिळतात.
कामाख्या मंदिरापासून ३ किमीवर असलेल्या उमानंदाचं दर्शन केल्यावरच कामाख्या देवीची यात्रा पूर्ण होते, असे मानले जाते. ब्रह्मपुत्रेच्या विशाल पात्रातून उमानंद मंदिरांत जाण्यासाठी मोटारबोटी उपलब्ध असतात. पं. दिवाकर शर्मा यांनी सांगितले आहे की, आद्य शक्ती भैरवी कामाख्येचे दर्शन घेण्यापूर्वी महाभैरव उमानंडाचे दर्शन घेतात. हे मंदिर गुवाहटी शहराजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या वरच्या भागात आहे. हे ठिकाण तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. या भागाला मध्यांचल पर्वत या नावानेही ओळखले जाते. कारण या ठिकाणी समाधीस्थितीत असलेल्या शंकराला कामदेवाने बाण मारला होता. आणि समाधीतून बाहेर आल्यावर शंकराने त्या कामदेवाला जाळले होते. नीलाचल पर्वतावर कामदेवाला पुन: जीवनदान मिळाले म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हटले जाते.
विशेष सूचना
कामाख्या देवीचे मंदिर सकाळी ७ वाजता उघडते व सायंकाळी ४.३० वाजता बंद केले जाते. दर्शानेच्छूक भाविक पहाटे ४.३०-५ वाजे पासून रांगेत उभे रहातात. दर्शनासाठी साधारण साडेतीन तास वेळ लागतो. कोविडची दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तींनाच मंदिरांत प्रवेश दिला जातो. कोविड संदर्भात सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाते.
मंदिराचा पत्ता:
The Kamakhya Debutter Board
Kamakhya Temple Complex, Kamakhya, Guwahati- 781010
फोन- 0361-2734624 / 2734654 /2734654/2734655
Website: www.maakamakhya.org