नवरात्रोत्सव २०२१ – विशेष लेखमाला
II नारायणी नमोस्तुते II – सहावी माळ
योगमाया (दिल्ली)
महाभारत काळापासून अस्तित्वात असलेले योगमायेचे मंदिर नवी दिल्ली येथे आहे. योगमाया भगवान श्रीकृष्णाची मोठी बहिण होती. दिल्लीच्या महरौली भागात जिथे कुतुबमीनार आहे याच परिसरांत योगमायाचे सिद्धपीठ आहे.
देशांत योगमायेची अनेक मंदिरं आहेत परंतु मथुरा वृन्दावन आणि महाभारत काळाशी संबंध असलेल्या योगमायेच्या मंदिराचे महत्व काही वेगळेच आहे. ही योगमाया म्हणजे दूसरी तिसरी कुणी नसून भगवान श्रीकृष्णाची मोठी बहिण होती. योगमायेनेच श्रीकृष्णाचे प्राण वाचविले असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार योगमायेनेच देवकिच्या सातव्या गर्भाचे संकर्षण करून रोहिणीच्या गर्भात पोहचविले यामुळे श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलरामजींचा जन्म झाला.
योगमाये विषयीची ही पौराणिक कथा माहित असल्याने ‘किशोर -विद्या’ यांच्या कड़े दिल्लीला गेल्यावर ज्या दिवशी कुतुबमीनार पहायला निघालो त्याच वेळी योगमायेचे मंदिर पहायचे मनाशी पक्के केले. कुतुबमीनार पासून अगदी जवळच श्री योगमाया सिद्धपीठ हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. येथे प्रवेश करतांना आपण महाभारत कालापासून अस्तित्वात असलेल्या,पांडवानी बांधलेल्या देवस्थानात जातो आहोत हे फिलिंगच खूपच वेगळं असतं. या मंदिराच्या निर्मिती नंतर महरौलीच्या या भागाला योगिनीपूरा म्हणत असत असे वर्णन बाराव्या शतकांत लिहिलेल्या जैन ग्रंथात केलेले आहे.महाभारत काळात पांडवांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात. या मंदिराची निर्मिती सर्व प्रथम अकबर व्दितीय याच्या शासन काळात लाल सेठ नावाच्या धनिकाने केली असा उल्लेख आहे.
मंदिराची वास्तुकला
या मंदिराची रचना नागर शैलीतील आहे.मंदिराच्या प्रवेशव्दारावरच एक नागाची आकृती कोरलेली आहे.हा नाग म्हणजे चिंता मायेचे एक रूप मानतात.संपूर्ण मंदिर सुंदर भित्तिचित्रांनी सजविलेले आहे.मंदिराच्या भिंतीवर श्रीविष्णु,दुर्गा देवी,लक्ष्मी,यक्ष,गंधर्व आदिंच्या आकृत्या दगडातून कोरुन काढलेल्या आहेत. योगमाया मंदिराची निर्मिती इ.स. १८२७ मध्ये करण्यात आली. मंदिराचे प्रवेशव्दार आणि गाभारा एका सरळ रेषेत असून मंदिराची सर्व रचना एकाच वेळेतली आहे.
मंदिराच्या प्रमुख मध्यवर्ती गाभार्यात योगमायेची मूर्ती स्थापन केलेली आहे.ही मूर्ती काळया पाषाणा पासून बनविलेली आहे. देवीची मूर्ती विविध आभुषणे आणि सुंदर वस्त्रांनी सजविलेली असते. मंदिरांत एक सुंदर घुमटही पहायला मिळतो.
मंदिराच्या गर्भ गृहावर योगमाया मंत्र लिहिलेला आहे. श्रद्धाळू भाविक हा मंत्र गुणगुणतच देवीच्या दर्शनार्थ पुढे सरकतात. गर्भ गृहात योगमायेची भव्य आणि मोहक मूर्ती आहे.येथे जमिनीवर एका गोल कुंडात ही मूर्ती ठेवलेली असते. कुंडाच्या गोलाकार घेरयात भगवती योगमायेचे मुख प्रतिष्ठित आहे.
योग मायेला अशरीरी मानले गेले आहे त्यामुळेच येथे केवळ प्रतीकात्मक रुपांत मातेच्या मुखाची पूजा केली जाते. योगमायेचं हे मंदिर हे भारताची आध्यात्मिकता, संस्कृती आणि वास्तुकला यांचे प्रतिक आहे. त्यामुळेच देशातील व परदेशातील भाविक भक्त आणि अभ्यासू पर्यटक येथे आकर्षित होतात. कुतुबमीनार पासून जवळच हे मंदिर असल्या मुळे येथे नेहमीच देशातील भाविक आणि परदेशी पर्यटक यांची गर्दी असते.
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यापूर्वी दुर्गा मातेने योगमायेचे रूप घेतले. दुर्गा मातेने हा अवतार थोड्याच काळासाठी घेतला होता. गर्गसंहिता पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाची आई देवकीच्या सातव्या गर्भाला बदलून योमायेने तो रोहिणीच्या गर्भात पोहचविला, ज्यामुळे नंतर रोहिणीच्या गर्भातून बलरामाचा जन्म झाला.यानंतर यशोदेच्या गर्भातून योगमायेचा जन्म झाला. योगमायेचा जन्म झाला त्यावेळी यशोदा गाढ झोपलेली होती. त्यामुळे आपल्याला कन्या झाली हे देखील तिला समजले नाही.ती आपल्या कन्येला पाहू शकली नाही.
देवकिच्या आठव्या पुत्राचा श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर वासुदेवाने बाल कृष्णाला यशोदे समोर नेवुन ठेवले आणि तिच्या उदरातून नुकताच जन्म झालेल्या योगमायेला घेउन तो कारागृहांत परत आला.यशोदेने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिला योगमायेच्या जागी पुत्र दिसला. वासुदेव नुकत्याच जन्मलेल्या बालिकेला घेउन मथुरेला कारागृहात आला. तेंव्हा कंसाने त्या बालिकेला दगडावर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला.परंतु कंसाच्या हातातून निसटलेली योगमाया आकाशांत गेली आणि तिनेच आकाशवाणी करुन कंसाला सांगितले ,” तुझा वध करणारा जन्माला आला आहे” तर ती ही योगमाया!
या संदर्भात आणखी एक पौराणिक कथा वाचायला मिळाली ती अशी, महाभारत युद्धात जयद्रथाने अभिमन्युला ठार मारल्या नंतर लाथ मारली. त्याच्या मृत्यु नंतर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या मंदिरांत देवीच्या दर्शनासाठी आणले. त्यावेळी याच मंदिरांत अर्जुनाने दुसर्या दिवशी सुर्यस्तापूर्वी मी जयद्रथाला ठार मारीन अन्यथा मी अग्नीप्रवेश करीन अशी प्रतिज्ञा केली. देवीच्या चमत्कार शक्ती मुळेच युद्ध भूमीवर भ्रम निर्माण करणारे सूर्यग्रहण झाले आणि सूर्य ग्रहणा मुळेच जयद्रथाला मारण्याची संधी अर्जुनाला प्राप्त झाली!
योगमाया मंदिरातील सण- उत्सव!
‘फूलोंवालोँ की सैर’ हा वार्षिकउत्सव या मंदिरांत खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.या आगळया वेगळ्या उत्सवाची सुरुवात सूफी संत कुतुबुद्दीन भक्तियार खाकी यांनी केली होती. साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांत हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी फुलांपासून बनविलेले पंख देवी योगमायेला अर्पण करतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत येणारी महाशिवरात्र येथे खुपच मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.याशिवाय चैत्र आणि आश्विन नवरात्रोत्सव तर देवीचे हक्काचे उत्सव आहेत.
भारताची राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशन पासून १० किमी अंतरावर योगमायेचे हे मंदिर आहे. ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी दिल्लीत फिरायला बेस्ट मानला जातो.
संपर्क : Yogmaya Temple
Khasra No 1806,Mehrauli, Seth Sarai,Mehrauli,New Delhi -110030
Mob. 09958001780