नवरात्रोत्सव २०२१ – विशेष लेखमाला – पाचवी माळ
IIनारायणी नमोस्तुतेII
शाकंभरी देवी
उत्तर भारतात वैष्णो देवीच्या खालोखाल दर्शानासाठी भाविकांची गर्दी होणारी देवी म्हणजे शाकंभरी देवी.उत्तर परदेशांत सहारनपुर जिल्ह्यांत शाकंभरी देवीचे मंदिर आहे. युपीचे सर्व पक्षाचे राजकीय नेते या देवीचे दर्शन घेउनच आपल्या निवडणुकांचा श्री गणेशा करतात.दोन तीन दिवसांपूर्वी कांग्रेस अध्यक्षा प्रियंका गांधी वाड्रा यांनी या देवीचे दर्शन घेतले.
शाकंभरी देवी ही आदिशक्ती जगद्न्म्बेचा सौम्य अवतार समजला जातो. ही देवी काही ठिकाणी चतुर्भुज तर कुठे अष्टभुजा दिसते. शाकंभरी मातेची अनेक मंदिरं देशांत आहेत परंतु शक्तीपीठ केवळ एकच आहे.सहारनपुरच्या पर्वतीय भागांत हे शक्तिपीठ आहे. उत्तर भारतातील सर्वाधिक भाविक येथे येतात.माता वैष्णोदेवी नंतरचे दुसरे सर्वांत प्रसिद्ध मंदिर म्हणजे शाकंभरी देवीचे हे मंदिर. या मंदिरा शिवाय राजस्थान मधील सकरायपीठ आणि सांभरपीठ ही दोन शाकंभरी देवीची पीठं भारतात प्रसिद्ध आहेत.
नवदुर्गामध्ये शाकंभरी देवी सर्वाधिक करुणामय आणि ममतामयी माता आहे. स्कन्द पुराणांत शाकम्भरी क्षेत्र आणि शाकेश्वर महादेव यांचा महिमा वर्णन केलेला आहे.शिवालिक पर्वत मालांमध्ये विसावलेल्या शाकंभरी देवीची गणना देवीच्या ५१ शक्तीपिठामध्ये केली जाते. येथे सतीचे शिश म्हणजे डोके पडले होते. पुरानांत या देवीपीठाला शक्तीपीठ, परमपीठ, महाशक्तीपीठ आणि सिद्ध पीठ म्हटलं आहे.
येथे गाभार्यात शाकंभरी देवीच्या प्रमुख्य मूर्तीच्या उजवीकडे भिमा आणि भामरी तर डाव्याबाजूला शताक्षी देवीची प्राचीन मूर्ती विराजमान आहे.प्रथम पूजनीय गणेश मुर्तीही येथे आहे. शाकंभरीदेवीच्या प्रसादांत हलवा-पुरी,सराल-शाक,फळं,भाज्या, मिस्त्री मेवा आणि शाकाहारी भोजनाचा नवैद्य दाखविला जातो. दर वर्षी आश्विन नवरात्रांत सहारनपुरच्या शिवालिक क्षेत्रांत भाविकांचा मोठा मेळा भरतो.याशिवाय चैत्र नवरात्र आणि होळीला देखील मातेचा मेळा भरतो.
शाकंभरी देवी आणि दुर्गमासुर यांची कथा
देवी पुराण, शिवपुराण आणि अन्य काही धार्मिक ग्रंथांत शाकंभरी देवी आणि दुर्गमासुर यांची कथा दिलेली आहे. हिरण्याक्षच्या वंशांत ‘ रूरु’नावाचा महा दैत्य होता. रूरुला एक पुत्र झाला त्याचे नाव दुर्गम. दुर्गामासुराने ब्रह्मदेवाची आराधना करुन चारी वेद स्वत:च्या आधीन करुन घेतले. आता वेदच नसल्यामुले सर्व धार्मिक क्रिया बंद पडल्या.पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार माजला. होमहवन व यज्ञ कार्ये बंद झाल्याने देवांची शक्ती क्षीण होऊ लागली. यामुळे भयंकर दुष्काळ पडला. कोणत्याही प्राण्याला जल म्हणजे पाणी मिळेना.
पाण्याच्या अभावामुळे वनस्पती सुकून गेल्या. शेवटी तहान व भुकेमुळे माणसं,जनावरं,पशु,पक्षी मरू लागले. याच वेळी दुर्गामासुराने देवतांशी भयंकर युद्ध केले.त्यात देवतांचा पराभव झाला.दुर्गामासुराच्या अत्याचाराने पीडित देव शिवालिक पर्वत रांगांमध्ये लपून बसले.आणि तिथे बसूनच जगदंबेचे ध्यान,जप,पूजन आणि स्तुती करू लागले. त्यांच्या प्रार्थनेमुळे महामाया पार्वतीमाता ‘आयोनिजा’ रुपांत तेथे प्रकट झाली. समस्त सृष्टीची दुर्दश बघून जगदंबेचे ह्दय पिळवटून गेले.तिच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. मातेच्या शरीरावर शंभर नेत्र प्रकट झाले.
शतनैना देवीच्या कृपेने जगावर भरपूर जलवृष्टी झाली.त्यामुळे पृथ्वी वरील नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहू लागले. त्यावेळी सर्व देवतांनी शताक्षी देवीच्या नावाने आराधना केली. शताक्षी देवीने सौम्य रूप धारण केले.चतुर्भुजी माता कमलासनावर विराजमान झाली होती.तिने आपल्या हातात कमळ,बाण,शाक-फळ आणि एक तेजस्वी धनुष्य धारण केलं होतं. भगवती परमेश्वरीने आपल्या शरीरातून अनेक शाक निर्माण केले .ते खावून जगाची भूक शांत झाली. मातेने सर्व प्रथम पहाडावर दृष्टी टाकली त्यामुळे सराल नावाच्या कंदमुळाची निर्मिती झाली.याच दिव्य रुपांत माता शाकंभरी या नावाने पुजली जावू लागली. त्यानंतर दुर्गासुराला भुलविण्यासाठी देवीने सुंदर रूप धारण केले आणि शिवालिक पर्वतावर आसन लावून ती बसली.
जेव्हा असुरांना पर्वतावर बसलेली सुंदर जगदंबा दिसली तेंव्हा तिला पकडण्याचा विचार त्यांच्या मनात आला.स्वत: दुर्गामासुरही तिथे आला तेव्हा देवीने पृथ्वी आणि स्वर्ग यांच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच निर्माण केले आणि ती त्याच्या बाहेर उभी राहिली. दुर्गमसुराबरोबर देवीने घनघोर युद्ध केले त्यांत दुर्गमासुर मारला गेला.याच ठिकाणी जगदंबेने दुर्गमासुर व अन्य दैत्यांचा संहार केला आणि भैरवाचे एक रूप असलेल्या भक्त भूरे देव याला अमरत्वाचा आशीर्वाद दिला.मातेच्या असीम अनुकंपे मुळे आज देखील भाविक सर्व प्रथम भूरे देवाचं दर्शन घेतात आणि त्यानंतरच डोंगर चढून शाकंभरी देवीचं दर्शन घेतात.
देवी शाकंबरी आणि दुर्गमासुर यांच्या युद्धाच्या खुणा आजही येथे पहायला मिळतात. ज्या ठिकाणी मातेने दुर्ग्मासुराचा वध केला होता तेथे आता ‘वीरखेत’ नावाचे मैदान पहायला मिळते. ज्या ठिकाणी माता सुंदर रूप घेउन पर्वत शिखरावर बसली होती तेथे शाकंभरी देवीचे मंदिर (भवन) आहे.मातेने जेथे भूरा देवाला अमरत्वाचे वरदान दिले होते तेथे आता बाबा भरे देव यांचे मंदिर आहे.निसर्गाचं प्राकृतिक सौंदर्य आणि हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेली इथली हिरवीगार डोंगर दरी भाविकांचे मन मोहित करते.देवी पुराणानुसार ‘शताक्षी’, शाकम्बरी’ आणि ‘दुर्गा’ही एकाच देवीची नावं रूपं आहेत.
तसं पहिलं तर शाकंबरी देवीची अनेक मंदिरं देशांत आहेत परंतु सहारनपुरच्या पहाडात विराजमान मातेच्या या मंदिराचे वैशिष्ट्ये वेगळेच आहे. हे मंदिर समुद्र सपाटी पासून ४४८ मीटर उंचीवर आहे.पहाडाच्या सपाट भागावर मातेचं सुंदर मंदिर आहे.पंधरा सोळा पायर्या चढून आल्यावर मातेचे अदभुत रूप नजरेस पडतं. संगमरवरी चबुतरा चांदीच्या नक्षीदार पत्र्याने सुशोभित केलेला आहे.या ठिकाणी माता शाकंबरी आपल्या चार रुपांत बाल गणेशासह विराजमान झालेली आहे.मातेची चारही रुपे सुंदर पोशाख आणि सोन्या चांदीच्या दगिन्यानी शोभून दिसतात. मातेच्या उजव्या बाजूला भिमा,भ्रामरी देवी तर डावीकडे शताक्षी देवी प्रतिष्ठित आहे. देशातलं हे एकमेव मंदिर असे आहे जेथे दुर्गेच्या चारी रुपांचे एकत्र दर्शन होते. मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भूरा देव बाबा चे दर्शन घ्यावे लागते.
कसे जावे
शाकंबरी देवीचे हे सुप्रसिद्ध मंदिर दिल्ली पासून १८२ किमी अंतरावर आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपुर जिल्ह्यांत सहरनपुर पासून ४० किमी अंतरावर जसमोर गावा जवळच मंदिर आहे. येथे बस,जीप ,टैक्सी सेवा उपलब्ध आहे.
सध्या मातेचे दर्शन नियमित सुरु आहे.
मंदिराची वेळ – सकाळी ५.०० ते रात्री ९.३०
संपर्क: श्री शाकंबरी माता मंदिर
जसमोर ,सहारनपुर,उत्तर प्रदेश २४७१२१
मो. ९३१२६३१०२७