नवरात्रोत्सव विशेष
नारायणी नमोस्तुते
माता वैष्णोदेवी!
तिरुपती बालाजीच्या खालोखाल भारतातली सर्वाधिक लोकप्रिय देवता म्हणजे माता वैष्णोदेवी! साक्षात हिमालयातल्या त्रिकुट पर्वतावर अत्यंत अडचणींच्या ठिकाणी वास्तव्य करून असलेल्या माता वैष्णोदेवीचं कधी कधी एकेका दिवसांत लाखो भाविक दर्शन घेतात हाच खरं तर एक मोठा चमत्कार आहे!
असं म्हणतात की, माता वैष्णोदेवीचं बोलवणं आल्या शिवाय तिच्या दर्शनाला कुणीही जाऊ शकत नाही. आणि ते खरंही आहे. आपली शारीरिक आणि आर्थिक स्थिती कितीही भक्कम असली तरी माता वैष्णोदेवीच्या इच्छेशिवाय आपण ही अवघड यात्रा करूच शकत नाही.
अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीला जावे असे वाटायचे पण तिथे चौदा-पंधरा किमी चा डोंगर चढावा उतरवा लागतो हे ऐकुनच दरवेळी हा विचार पुढे ढकलत होतो. पण वेळ येताच आम्ही रेल्वेने दिल्लीला तिथून रेल्वेनेच जम्मूला ,जम्मूहुन बसने कटरा येथे पोहचलो. आणि कटरा येथून हेलीकॉप्टरने माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला थेट तिच्या हिमालयातील गुहेत जावून पोहचलो. मातेचे अतिशय शांतपणे दर्शन झाले.यावेळी आमच्या कुटुंबातलेच सगळे तिथे होतो. माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची इच्छा अक्षरश: स्वप्नासारखी प्रत्यक्ष घडली. आज नवरात्रोत्सवाच्या दुसर्या माळेला माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊ या.
’तुने मुझे बुलाया शेरावालीये’ १९८० साली प्रदर्शित झालेल्या जितेंद्र,रामेश्वरी यांच्या ‘आशा’ या चित्रपटातील या गीतामुळे माता वैष्णोदेवी सर्व प्रथम देशभर माहित झाली. या गाण्यांत जितेंद्र आपल्या फेव्हारहीट पांढरा शर्ट,पांढरी प्यांट, आणि पांढऱ्या बुटांत चमकला होता. त्यानंतर १९८३साली राजेश खन्ना,शबाना आजमी यांच्या ‘अवतार’ चित्रपटातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या गीताने माता वैष्णोदेवी घराघरांत जाऊन पोहचली. तेंव्हा पासूनच माता वैष्णोदेवीला जाण ही एक क्रेझ निर्माण झाली.
लोकप्रिय गायक महंमद रफी, आशा भोसले, नरेंद्र चंचल, अनुराधा पौडवाल, सोनू निगम आणि मुख्य म्हणजे गुलशन कुमार यांनी आपल्या माता वैष्णोदेवीच्या अजरामर भक्तीगीतांनी माता वैष्णोदेवीची देशभरातील भाविकांच्या मनामनांत स्थापना केली. जितेंद्रने आपल्या फिटनेसचे श्रेय दरवर्षी एकदातरी वैष्णोदेवीला पायी जाण्याला दिल्याचे आठवते. फिल्मी कलाकारांच्या भक्तीमुळे देशभर लोकप्रिय झालेल्या माता वैष्णोदेवीची कथाही एखाद्या चित्रपटासारखीच इंटरेस्टिंग आहे. विरोधी प्रेमभक्तीचा उच्च आविष्कार माता वैष्णोदेवीच्या आख्यायिकेत दिसतो.
श्रीधर पंडित नावाच्या भोळ्या भाबड्या भक्तासाठी वैष्णोदेवी लहान बालिकेच्या रूपांत प्रकट झाली असं म्हणतात. रत्नाकर सागर यांच्या घरांत माता वैष्णोदेवी दैवी बालिकेच्या रूपांत जन्मली. जन्म घेण्यापूर्वीच ‘तुम्ही कुणीही माझ्या इच्छेच्या आड येणार नाही’ असे वचन तिने घेतले होते. लहानपणी तिला ‘त्रिकुटा’ म्हणत. नऊ वर्षांची झाल्यावर तिने समुद्राकाठी तपश्चर्येला जाण्याची परवानगी मागितली.
पुढे श्रीधर पंडिताच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या त्रिकुटाने त्याला भंडारा घालण्यांस सांगितले. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेल्या पंडिताने बालिकेच्या सांगण्यावरून गावातल्या सर्व लोकांना भोजनाचे आमंत्रण दिले. सर्वांसोबत भैरव नाथ नावाच्या एका दुष्ट तरुणालाही त्याने भंडारासाठी जेवायला बोलावले.निर्धन असलेला श्रीधर पंडित कसा काय भंडारा घालतो त्याची फजिती पहायला भैरव नाथ आणि इतर लोक आले.पण दैवी शक्ति असलेल्या त्रिकुटेने ३६५ लोकांच्या भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली. त्यानंतर बालिका त्रिकुटा तपश्चर्या करायला हिमालयातील एका गुहेत निघून गेली.
त्रिकूटेचे रूप आणि गुण पाहून भैरव नाथ तिच्यावर मोहित झाला. तो तिचा शोध घेऊ लागला पण ती त्याला कुठेही सापडली नाही. नऊ महिन्यांच्या अथक शोधानंतर हिमालयातील एका गुहेत ती त्याला दिसली. तो तिच्या मागेच लागला. त्रिकुटेन त्याला टाळण्याचा, सावध करण्याचा बराच प्रयत्न केला. जमिनीत बाण मारून तिने बाणगंगा निर्माण करण्याचा चमत्कार केला तरीही तो तिचा पिच्छा करू लागला. शेवटी अगदीच नाईलाज झाल्याने वैष्णवदेवीने एका बाणाने भैरव नाथाचे शिर उडविले. सध्याच्या वैष्णोदेवीच्या गुहेपासून ३ किमी वर भैरव घाटीत जावून पडले. भैरव नाथाने मरतांना माता वैष्णोदेवीची क्षमा मागून तिच्या नावासोबत आपलीही आठवण निघावी अशी इच्छा व्यक्त केली. तेंव्हा दयाळू असलेली माता वैष्णोदेवी त्याला म्हणाली, ‘ जे भक्त माझे दर्शन घेतील ते तुझेही दर्शन घेतील. तुझे दर्शन घेतल्या शिवाय माझ्या दर्शनाचे पुण्यफळ त्यांना मिळणार नाही.’ यानंतर माता वैष्णोदेवीने तीन पिंड (शिर) सहित एका मोठ्या खडकाचा आकार धारण केला आणि ती कायमस्वरूपी तिथेच ध्यानमग्न झाली!
पूर्वी वैष्णोदेवीला जाणे,तिचे दर्शन घेणे खूपच अवघड होते. आजही आहे. कटरापासून १४-१५ किमीचा डोंगर चढून जाणे कष्टाचे होते. हल्ली चांगला रस्ता व सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. कटरा येथून डोली, घोडा,पिट्टू इत्यादी साधनं उपलब्ध आहेत. आता तर हेलिकॉप्टरने तासाभरांत माता वैष्णोदेवीचे दर्शन घेणे शक्य झाले आहे. हे सगळं असलं तरी इथलं हवामान आणि वातावरण कधी बदलेल हे मात्र सांगता येत नाही.
माता वैष्णोदेवीचं बोलावण आल्याशिवाय तिचे दर्शन घेता येत नाही मात्र मातेच्या मनांत आल्यावर सर्व यात्रा सुरळीत पार पडते याची अनुभूती आली. सगळं सुरळीत पार पडल्यावरही माणसाला त्याचं महत्व वाटत नाही. स्वच्छ निरभ्र वातावरणांत हेलिकॉप्टरने जाऊन माता वैष्णोदेवीचं निवांत दर्शन घडल्यावर बाहेर देवीच्या गुहारुपी मंदिराच्या प्रांगणात कुटुंबियांसह चहा पित बसलो होतो. तेंव्हा सभोवती पसरलेला आपल्या भागातल्यासारखाच उघडा बोडका त्रिकुट पर्वत पाहून हा हिमालय आहे असे वाटले देखील नाही. पण आम्ही कटराला पोहचल्यावर वातावरण बदलले. दुसऱ्या दिवशी तर ढगाळ वातावरणामुळे सर्व हेलिकॉप्टरची उड्डाणे रद्द झाली. आम्ही सगळे सुखरूप घरी पोहचलो. त्यानंतरच्याच आठवड्यांत तिथे प्रचंड बर्फवृष्टी झाली. सर्व परिसर आणि रस्ते बर्फमय झाले. तिथे साचलेलं बर्फ तोडण्यासाठी बुलडोझर आणावे लागले. तीन दिवस माता वैष्णोदेवीचं दर्शन बंद ठेवावं लागलं. वृत्तपत्रातल्या बातम्या आणि टीव्हीवरील दृष्य पाहून आम्ही सर्वांनी मनोमन कबूल केलं, माता वैष्णोदेवीची इच्छा असल्या शिवाय तिचे दर्शन घेता येत नाही हेच खरे!
विशेष सूचना मां वैष्णो देवीचे दर्शन सध्या सुरु आहे .
संपर्क
Shri Mata Vaishno Devi Shrine Board
KATRA Disrict Reasi J & K ( India)
Call Centre No-01991-234804
Protocol Department 01991-232029
Website www.maavaishnodevi.org