नवरात्रोत्सव विशेष लेखमाला
II नारायणी नमोस्तुते II
बीकानेरची करणी माता!
राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात करणी मातेचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे करणी मातेची मूर्ती आहे.बीकानेर पासून ३० किमी अंतरावर दक्षिणेला ‘देशनोक’ नावाच्या गावात हे मंदिर आहे. चारण कुळांत जन्म झालेल्या करणी मातेच्या मंदिराला ‘चूहोंका मंदिर’ किंवा ‘उंदीरांचे मंदिर’ या नावानेही ओळखले जाते कारण या मंदिरांत सुमारे २५ हजार पेक्षा जास्त उंदीर तब्बल ६५० वर्षांपासून मस्त मजेत राहतात. चला तर मग यंदा नवरात्रोत्सवा निमित्त राजस्थान मधील करणी मातेचे दर्शन घेऊ या.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुंदर नक्षीकाम आणि कलाकुसर पाहण्यासाठी देखील पर्यटक येथे येतात.मंदिराला असलेले चांदीचे दरवाजे, सोन्याचे छत्र आणि २५ हजार उंदीर मामांच्या भोजनाची चांदीची परात पहायलाही भाविकांना आवडते. या मंदिरांत दोन प्रचंड मोठ्या कढाया आहेत त्यांना ‘सावन -भादो’ म्हणतात.
राजस्थान मधील बीकानेर जिल्ह्यातील देशनोक गावात करणी मातेचे हे मंदिर म्हणजे राजपूती वास्तुकलेचा देखना अविष्कार आहे. बीकानेरचे संस्थापक राव बीका यांचे वंशज महाराजा गंगा सिंह यांनी हे मंदिर १५व्या शतकांत बांधले आहे. पंचवीस तीस हजार उंदीर सांभाळणारी अशीही देवी असू शकते यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही.
श्रद्धाळू भाविकांच्या मते करणी देवी साक्षांत जगदंबेचा अवतार होती. सध्या जेथे करणी मातेचे मंदिर आहे त्याच ‘देवनोक’ गावांत सुमारे साडेसहाशे वर्षां पूर्वी एका गुहेत करणी माता आपल्या इष्ट देवतेची पूजा अर्चा करीत असे.आजही या परिसरांत ही गुंफा पहायला मिळते. माता ज्योतिर्लिन झाल्या नंतर तिच्या इच्छेनुसार तिची मूर्ती या गुंफेत स्थापन करण्यात आली. करणी मातेच्या कृपेनेच ‘बीकानेर’ आणि ‘जोधपुर’ राज्यांची स्थापना आणि भरभराट झाली होती अशी श्रद्धा आहे.
करणी मातेचे संगमरवरा पासून बनविलेले विशाल मंदिर पाहूनच मन प्रसन्न होते.मुख्य प्रवेशव्दार ओलांडून येताच हजारो काळे पांढरे उंदीर पाहून कुणीही आश्चर्य चकित होतं. येथे इतके उंदीर आहेत की चालतांना पाय उचलून टाकण्या ऐवजी पाय घासत चालावं लागतं. सर्व लोक अशाच प्रकारे पाय घासत घासत करणी मातेच्या मूर्ती पर्यंत पोहचतात.
मंदिराच्या संपूर्ण प्रांगणात उंदीरांचेच राज्य आहे. ते भाविकांच्या अंगावर चढतात,उड्या मारतात परंतु कुणाला चावत किंवा ओरखडत नाहीत.कुणाला नुकसान इजा करीत नाहीत.चिल,गिधाडं आणि इतर पशु पक्षांपासून उंदीरांचे रक्षण करण्यासाठी मंदिराच्या खुल्या जागांवर बारीक तारेची जाळी लावलेली आहे. या उंदीरांच्या उपस्तिथी वरुनच करणी मातेच्या मंदिराला ‘उंदीरांचे मंदिर’ किंवा ‘चुहोंका मंदिर’ या नावाने ओळखतात.सफेत उंदीर दिसणं भाग्याचं असतं असं म्हणतात. ते शुभ मानतात. सकाळी पांच वाजेची मंगल आरती आणि सायंकाली सात वाजेची आरती यावेळी उंदीरांची धावपळ,पळापळ पाहण्यासारखी असते.
अशी आहे कथा
करणी मातेची कथा एका सामान्य ग्रामीण कन्येची कथा आहे. परंतु वयाच्या वेगवेगळया टप्प्यावर अनेक चमत्कारी घटना तिच्या जीवनात घडल्या. संवत १५९५ च्या चैत्र शुक्ल नवमीला करणी माता ज्योतिर्लिन झाली आणि त्याच महिन्यात चतुर्दशी पासून येथे श्री करणी मातेची पूजा अर्चा करने सुरु झाले. ते आजतागायत नियमित सुरु आहे.
जोधपुर येथील मेहाजी किनिया यांच्या घरी दिनांक २० सप्टेंबर १३८७ या दिवशी करणीजीचा जन्म झाला.करणी मातेचे मुळ नाव रिद्धूबाई होते. चारण परिवारातील ती सातवी कन्या होती.
जोधपुर जिल्ह्यातील सुवाप गावात तिचा जन्म झाला. दुर्गा देवीनेच जनहितार्थ करणी देवीचा अवतार घेतला होता अशी मान्यता आहे. तत्कालिन जंगली प्रदेशांतच तिने आपले कार्यस्थळ बनविले. करणी देवीनेच जंगल प्रदेशांत राज्य स्थापन करण्याचा आशीर्वाद राव बीका याला दिला होता. मानव आणि पशु पक्षी यांचे संवर्धन करण्यासाठी करणी मातेने त्याकाळी देशनोक येथे दहा हजार एकर जागा ‘ओरण’ (आपल्या कडे त्याला कुरण म्हणतात) म्हणजे पशु चराई साठी उपलब्ध करुन दिली होती.
करणी मातेने पुगल येथील राव शेख याला सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या मुलतान येथून सोडवून आणले आणि त्याची उपवर कन्या ‘रंगकंवर’ हिचा विवाह राव बीका याच्याशी घडवून आणला. दशरथ मेघवाल हा करणी देवीच्या गायीं चारणारांचा प्रमुख होता डाकू पेंथड आणि पूजा महला यांच्या तावडीतून गायींचे रक्षण करतांना दशरथ मेघवाल याला आपला प्राण गमवावा लागला. करणी मातेने डाकू पेंथड आणि पूजा महला यांचा नाश करुन दशरथ मेघवाल याला पूजनीय बनविले. सामाजिक समरसतेचे हे प्रतिक मानले जाते.
मंदिराची वास्तुकला
या मंदिराची निर्मिती १५ व्या शतकांत बीकानेरचे महाराज गंगा सिंह यांनी रजपूत शैलीत केली आहे. मंदिरा समोर महाराजा गंगा सिंह याने चांदीचा दरवाजा बनविला आहे. आतल्या गाभार्यात देवीची मूर्ती आहे, इ.स. १९९९ मध्ये हैदराबाद येथील कुंदनलाल वर्मा यांनी मंदिराच्या काही भागाचा विस्तार केला. देशनोक बीकानेर प्रमाणेच उदयपुर आणि अलवार येथेही करणी देवीची मंदिरं आहेत.
कसे जावे
बीकानेर पासून जीप,टैक्सी सहज मिळतात. बीकानेर जोधपुर रेल्वे मार्गावर दशनोक रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन पासून जवळच मंदिर आहे.नवरात्र आणि चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. निवासाची व्यवस्था मंदिराच्या धर्म शाळेत होऊ शकते.
विशेष सूचना : करणी मातेच्या मंदिरांत भाविकांना सध्या प्रवेश दिला जात आहे.
मंदिराची वेळ: सकाळी ४.०० ते रात्री १०.००
संपर्क: Karni Mata Temple
NH-89, Deshnok, Bikaner, Rajastan 334801
Mob. – 09898467264
Website – www.matakarnitemple.com