नवरात्रोत्सव २०२१ – IIनारायणी नमोऽस्तु तेII – तिसरी माळ
हरिद्वारची ‘मनसा देवी’!
शिवाला हलहलापासून वाचविणारी शिवकन्या! अशी हरिद्वारच्या मनसा देवीची ओळख आहे. भगवान शिवाला कार्तिकेय आणि गणेश ही दोन मुलं असल्याचं सर्वांना माहित आहे. परंतु भगवान शिवाला एक कन्या देखील आहे. तिचं नाव मनसा आहे, हे कित्येकांना माहित नाही. चला तर मग आज नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेला शिव पार्वतीच्या कन्येची अर्थात मनसा देवीची माहिती घेऊ या…
शिव पार्वतीला किती मुलं होती?
मनसा देवी भगवान शिव आणि माता पार्वती यांची कन्या आहे. शिवाच्या मस्तकापासून म्हणजे मस्तकातील मनापासून हिचा जन्म झाला म्हणून हिला मनसा असे म्हणतात. हिला अनेक नावांनी ओळखतात. महाभारतातील उल्लेखा नुसार हिचे खरे नाव ‘जरत्कारू’ असे आहे. विशेष म्हणजे तिच्या सारखेच ‘जरत्कारू’ नाव असलेले महर्षि जरत्कारू तिचे पती आहेत. हिच्या पुत्राचे नाव आस्तिक आहे. कार्तिकेय, आयप्पा आणि गणेश हे तिचे भाऊ तर देवी अशोक सुंदरी आणि देवी ज्योति या तिच्या थोरल्या बहिणी आहेत. हिचा नंबर खालून दूसरा. मनसा देवी गणपती पेक्षा मोठी आहे. मनसा देवीचे भारतातील सुप्रसिद्ध मंदिर हरिद्वार येथे असून ते शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. मनसा वयात आल्यावर भगवान शिवाने हिचा विवाह ‘जरत्कारू’शी लावून दिला. हिच्या गर्भातून एक तेजस्वी पुत्र जन्माला त्याचे नाव आस्तिक ठेवण्यात आले. आस्तिकने ‘नाग’ वंशाला नष्ट होण्यापासून वाचविले. शिवकन्या असलेल्या मनसाचे जिजाजी होते राजा नहुष.
जगाचे कल्याण करणारी देवी
मनसा देवीला ‘नागकन्या’, ‘रुद्रांश’, ‘विषहर’, ‘नागेश्वरी’, ‘रक्ताम्बरी’, ‘मुकुटेश्वरी’, ‘विषेश्वरी’ इत्यादि अनेक नावांनी ओळखले जाते.मनसा देवीचा निवास कैलाश किंवा नागलोकांत असतो. मनसा देवीच्या हातांत त्रिशूल,चक्र,पाश,खड्ग, सर्प,शंख, वरमुद्रा, अभयमुद्रा इत्यादि शस्त्र-अस्त्रे आहेत. मनसा देवीचा जन्म जरी भगवान शिव आणि माता पार्वती पासून झाला तरी तिचे पालनपोषण कश्यप ॠषी आणि त्यांची पत्नी कद्रू यांनी केले.मनसा देवी विषयी एक आख्यायिका सांगितली जाते.
तिचे पालन पोषण करणार्या पालकांनी तिच्या जन्मा विषयी तसेच तिच्या दैवी शक्ती विषयी काहीच सांगितले नाही. तेव्हा मनसाने भगवान शिवाला प्रसन्न करुन आपले जन्म रहस्य विचारायचे ठरविले. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तिने कठोर साधना सुरु केली. तिची तीव्र इच्छा आणि कठोर साधना पाहून भगवान शिव तिला प्रसन्न झाले. आपले स्वरूप जाणल्या नंतर जगाचे कल्याण करण्याची शक्ती तिला प्राप्त झाली. मनसा देवी कमळ,हंस, सिंहासनावर विराजमान झालेली असते.
ग्रीक पौराणिक साहित्यांत देखील मनसा देवी सारखी देवी आहे. शिव पार्वती यांची कन्या असलेल्या मनसा देवीचा समावेश चौदाव्या शतकांत शिव परिवारातील मंदिरांत करण्यात आला. असं म्हणतात की मनसानेच भगवान शंकरला हलाहल विषापासून वाचविले.
नागांची व सर्पांची भीती दूर करणारी
झारखंड,बिहार आणि बंगाल प्रांतात हिची विषाची देवी म्हणून पूजा केली जाते. बंगाली पंचांगानुसार संपूर्ण भाद्रपद महिन्यात हिची पूजा केली जाते. मनसा देवीच्या विविध नावांचा जप केल्यास नागांची व सर्पांची भीती राहत नाही अशी मान्यता आहे.ती नावे अशी, जरत्कारू, जगद्गौरी, मनसा, सिद्धयोगिनी, वैष्णवी, नागभगिनी, शैवी, नागेश्वरी, जरत्कारूप्रिया, आस्तिक माता आणि विषहारी.
नागांनी अच्छादित मनसा देवी मुख्यत: कमलावर विराजमान झालेली असते. सात नाग सदैव तिच्या भोवती तिच्या रक्षणार्थ असतात. अनेक चित्रांत ही एका बालकाला घेउन बसलेली दिसते हा तिचा पुत्र आस्तिक आहे.
महाभारत युद्ध सुरु होण्यापूर्वी राजा युधिष्ठिराने मनसा देवीची पूजा केली होती. तिच्या आशीर्वादा मुळे पांडवाना विजय प्राप्त झाला.युधिष्ठिराने जेथे मनसा देवीचे पूजन केले होते त्या सालवन गावात देवीचे भव्य मंदिर आहे. नवरात्रांत अष्टमीला येथे होम हवं केले जाते. मोठा उत्सव आयोजित केला जातो.
हलाहलविषा पासून वाचविले
अनेक पुरानांत मनसा देवी विषयी विविध किंवदंती दिलेल्या आहेत. हिचा जन्म भगवान शिवाच्या मस्तकापासून झाला आहे. मनसा कोणत्याही विषापेक्षा अधिक शक्तिशाली होती. भगवान शिवाला तिने हलाहलविषा पासून वाचविले म्हणून ब्रह्माने हिचे नाव ‘विष हरी’ ठेवले. विष्णु पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण,बंगाली भाषेतील विजय गुप्त यांनी लिहिलेले प्राचीन ‘मनसा मंगल काव्य’ आणि इ.स. १४९५ मध्ये विप्रदास पिल्लै यांच्या ‘मनसा विजय’ ग्रंथांत मनसा देवी बद्दलची माहिती उपलब्ध आहे.
हरिद्वार मंदिर
अशा या मनसा देवीचे सर्वांत मोठे शक्तिपीठ हरिद्वार पासून ३ किमी अंतरावरील बिल्व पर्वताच्या शिखरावर आहे. हिमालयाच्या दक्षिणे कडील सिवालिक पर्वत रंगांमध्ये बिल्व पर्वत आहे. येथील शक्तिपिठात स्थापित माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. मनसा देवी प्रमाणेच येथे चंडीदेवी मंदिर आणि माया देवी मंदिर आहेत. हे मंदिर सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत उघडे असते. दुपारी १२ ते २ वाजे पर्यंत मंदिराचे दरवाजे बंद करतात.यावेळी मनसा देवीचा शृंगार केला जातो व तिला नैवेद्य दाखविला जातो.मंदिर परिसरांत एक वृक्ष आहे मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भाविक या वृक्षाला पवित्र धागा बांधतात.परंतु मनसा पूर्ण झाल्यावर सूत्र सोडणे अत्यावश्यक मानले जाते.
हरिद्वार येथील मनसा देवीचे मंदिर पर्वत शिखरावर आहे. डोंगर चढून हल्लीच्या भाषेत सांगायचे तर ट्रेकिंग करून येथे जाता येते.काही वर्षां पासून येथे रोप वे उपलब्ध आहे. येथील ‘रोप- वे’ ला ‘मनसा देवी उडन खटोला’ असे म्हणतात. विशेष म्हणजे याच उडनखटोलाने चंडी देवीच्या मंदिरांत देखील जाता येते. खालच्या रोप-वे स्थानकापासून भाविकांना थेट मनसा देवीच्या मंदिरा जवळ नेले जाते. मनसा देवी उडनखटोला ५४० मीटर म्हणजे १,७७० फूट लांब असून त्याची उंची १७८ मीटर्स म्हणजे ५८४ फूट आहे.
पंचकुला मंदिर
मनसा देवीचे भारतातील दुसरे प्रसिद्ध मंदिर चंडीगड़ जवळ पंचकुला येथे आहे. हे मंदिर १०० एकर जागेवर पसरलेले आहे. अतिशय भव्य आणि विशाल असे हे मंदिर आहे. नवरात्रांत येथे फार मोठी यात्रा भरते. इ.स. १८११ ते १८१५ या काळात राजा गोलासिंह याने हे मंदिर बांधले आहे. चंडीगड़ बस स्थानका पासून १० किमी आणि पंचकुला बस स्थानका पासून ४ कि.मी.अंतरावर हे मंदिर आहे येथे ऑटो रिक्षाने जाता येते.
विशेष सूचना – सध्या मनसा देवी दर्शन नियमितपणे सुरु आहे.
संपर्क- 08194037983 / 09756774751
Websaite – www.haridwarrishikeshtourism.com
मनसा देवी पंचकुला वेबसाइट- www.mansadevi.org