इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावतीः भाजपच्या स्टार प्रचारक, माजी खासदार नवनीत राणा यांच्या जाहीर सभेत मोठा गदारोळ झाला. अमरावती जिल्ह्यातील दरियापूर तालुक्यातील खल्लार येथे नवनीत राणा यांच्या सभेत गोंधळ झाला. लोक एकमेकांवर खुर्च्या फेकताना आणि घोषणाबाजी करताना दिसले. राणा यांच्यावरही खुर्च्या फेकण्यात आल्या, पण, त्या थोडक्यात बचावल्या. या गोंधळात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राणा यांना सुखरूप बाहेर काढले.
राणा शनिवारी रात्री दरियापूरमधून युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होत्या. त्यांच्या प्रचारासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत काही मुद्द्यावरून वादावादी झाली, त्याला गदारोळाचे स्वरूप आले. यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी राणा यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई करताना व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.
याप्रकरणी पोलिस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. शनिवारी सायंकाळीच पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला. ऑक्टोबरमध्ये राणा यांना एका पत्राद्वारे धमकी मिळाली होती. त्यात त्यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती. हे पत्र त्यांना स्पीड पोस्टद्वारे आले होते, ज्यावर आमिरचे नाव लिहिले होते. यानंतर माजी खासदाराच्या स्वीय सचिवाने अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.