इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावतीः दर्यापूरमधील महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उभे असलेले भाजपमध्ये बंडखोरी करणारे रमेश बुंदीले यांच्या प्रचारात नवनीत राणा करत असल्याचे पुन्हा दिसून आले.
काल अमरावतीमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना इशारा दिला. तर त्याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राणा दांपत्यावर टीका केली होती. तरी सुध्दा इशारा हवेतच विरला..
अमरावती भाजप कार्यालयात काही दिवसांपूर्वी बडनेराचे उमेदवार रवी राणा यांची बैठक झाली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली, तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. राणा यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांकडून त्यांची कानउघडणी करण्यात आली. ‘राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धीसारखे वागत आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेले बरे. त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला, असे पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आता शिंदे यांनीही राणा दाम्पत्याचे कान टोचले आहेत.
“महायुती मजबुतीने लढत आहे. महायुतीत कोणीही मीठाचा खडा टाकण्याचे काम करू नका. मी राणा परिवारालाही सांगतो, की तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीत सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. सरकार आणण्यासाठी कॅ. अभिजीत अडसूळदेखील आपल्याला हवे आहेत. म्हणून आपणदेखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचे आणि महायुतीच्या विरोधात काम करायचे हे कोणी करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणून मी हे आवाहन करत आहे,” असे शिंदे यांनी म्हटले.