मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर न्यायालयीन फेऱ्यात अडकलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार पती रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. जामीन अर्जामधील अटींचे उल्लंघन केल्याचा दोघांवर आरोप करण्यात आला आहे. राणा दाम्पत्य हे १८ मेच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत. आता याप्रकरणी १५ जूनला सुनावणी होणार आहे. साधारण महिन्याभराचा कालावधी त्यांना मिळाला असला तरी मुंबईच्या न्यायालयात त्यांना विविध आरोपांवर उत्तर द्यावे लागणार आहे. या प्रकरणी माध्यमांसमोर न बोलण्याची अट न्यायालयाने जामीन मंजूर करण्यापूर्वी घातली होती. परंतु त्यानंतर दोघेही माध्यमांशी बोलले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. जवळपास अकरा दिवस कोठडीत काढल्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. दोघेही असा गुन्हा पुन्हा करणार नाही. या प्रकरणी माध्यमांशी काहीही बोलणार नाही. तसेच पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत, अशा तीन अटी न्यायालयाने घातल्या होत्या. तिन्हीपैकी एका अटीचे उल्लंघन केले तर जामीन तत्काळ रद्द केला जाईल, असे न्यायालयाने म्हटले होते.
हनुमान चालिसा पठणाच्या वादानंतर एकमेकांवर शब्दांचे बाण चालवणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि नवनीत राणा सध्या लडाखमध्ये आहेत. त्यामुळे माध्यमांसह प्रत्येकाचे लक्ष त्यांच्या वक्तव्याकडे असेल. खासदार नवनीत राणा आणि खासदार संजय राऊत हे दोघेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत. समितीच्या कामानिमित्त दोन्ही नेते सध्या लडाख येथे पोहोचले आहेत.