नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई महामार्गावर शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात दुधाचा टँकर दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने हा टँकर जात होता. त्यावेळेस चालकाचा ताबा सुटल्याने टँकर कसारा घाटातील खोल दरीत कोसळला.
या अपघातात मृत झालेल्यांमध्ये श्लोक जायभाव (९), रा. नालासोपारा, अक्षय घुगे (३०) रा. नवीन मुंबई, अनिकेत वाघ (२१) रा. सिन्नर यांची नावे समोर आली असून दोन जणांची नावे मात्र कळाली नाही. या अपघातात चार जण जखमी झाले आहे.
हा अपघात घाटातील बलगर पॉइंट जवळ झाला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर तीनशे फूट दरीत कोसळला आहे. या घटनेत ५ जण ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे.