इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अब्जाधीश सीईओंमध्ये सध्या नव्यानेच एका सीईओंचा समावेश झाला आहे. नवील नोरोन्हा असे त्यांचे नाव आहे. डी मार्ट हा लोकप्रिय ब्रँड चालवणाऱ्या कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ आहेत. इग्नाटियस नवील नोरोन्हा हे जगातील सर्वाधिक पगार मिळवणाऱ्या सीईओंमध्ये समाविष्ट नसले तरी ते देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक राधाकिशन दमाणी यांनी डी मार्ट सुपरमार्केटची साखळी चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. नोरोन्हा यांनी पाच वर्षांपूर्वी सीईओ पद स्वीकारले. तेव्हापासून डी मार्टचा नफा वाढला असून या क्षेत्रातील इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे.
मूळचे मुंबईकर असलेले नोरोन्हा हे प्रसिद्धीपासून दूर राहतात. म्हणूनच ते देशातील सर्वात प्रसिद्ध सीईओंच्या यादीत नाहीत. सीईओ नवील नोरोन्हा श्रीमंत असूनही लो-प्रोफाइल राहतात. महत्त्वाचे म्हणजे उद्योग जगतात ते एक नम्र सीईओ म्हणून ओळखले जातात. ऑक्टोबर २०२१ मध्ये नोरोन्हा अब्जाधीश सीईओंच्या क्लबमध्ये सामील झाले. नोरोन्हा यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार घेतला आहे.
एसआयईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स तसेच नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथून विज्ञान आणि व्यवस्थापन शाखेतून नोरोन्हा यांनी पदवी संपादन केली आहे. सुरुवातीला हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये मार्केट रिसर्च आणि आधुनिक व्यापाराच्या क्षेत्रात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत होते. आठ वर्षांनी ते डीमार्टमध्ये सहभागी झाले. एव्हेन्यू सुपरमार्केटमध्ये नोरोन्हा यांची सुमारे २ टक्के भागीदारी आहे.
आज ही सगळी चर्चा करण्याचे कारण म्हणजे एखाद्या त्यांनी मुंबईत घर घेतल्याच्या बातमीची एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे चर्चा आहे. त्यांचे मुंबईतील घर हे तब्बल ७० कोटींना विकत घेण्यात आले आहे. तसेच १० गाड्यांच्या पार्किंगसाठी दोन युनिट्स बुक केल्या होत्या. त्यांची ही जागा ९,५५२ चौरस फूट एवढी आहे. अहवालानुसार, त्यांनी ६६ कोटी रुपयांचे घर आणि त्यासाठी ३.३० कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. ही मालमत्ता नोरोन्हा आणि त्यांची पत्नी काजल नोरोन्हा यांनी एकत्रितरित्या खरेदी केली.
Navil Noronha India’s Richest CEO Salary