नवरात्रोत्सव विशेष
II नारायणी नमोस्तुते II
वेल्लोरचं महालक्ष्मी सुवर्णमंदिर!
तिरुपतीला जाई पर्यंत वेलोरच्या महालक्ष्मी मंदिराची कल्पना नव्हती . बालाजीच्या मंदिराचा सोनेरी घुमट,सोन्याचे दारं सोन्याचे खांब पाहुणच आम्ही पुरेसे आश्चर्य चकित झालो होतो. तेव्हढ्यात कुणी तरी सांगितलं हे तर काहीच नाही तुम्ही वेलोरचं महालक्ष्मी मंदिर पहाल तर त्यापुढे बालाजीला विसरून जाल. इथून फक्त १२० किमी अंतरावर आहे वेल्लोर .आमच्या नशिबात सुवर्ण योग होताच त्यामुळे दुसर्या दिवशी तिरुपतिहून थेट वेल्लोरला गेलो. आणि का्य सांगू राव आयुष्यात कधीही पहिलं नाही इतकं अफाट सोनं याचि देही याच डोळा पहिलं.पाया पासून कळसापर्यंत आणि दरवाजा पासून देवी पर्यंत जिकडे पहावं तिकडे सोनंच सोनं! नवरात्रोत्सवात चला जावू या वेल्लोरला साक्षांत महालक्ष्मीचं वैभव पहायला.
आजवर सुवर्णमंदिर म्हटलं कि आठवतं अमृतसर सुवर्णमंदिर पण आता दक्षिण भारतातही एक सुवर्ण मंदिर तयार झालं असून ते भाविकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. तमिळनाडूतील वेल्लोर येथील ‘महालक्ष्मी नारायणी मंदिर’ देशातीलच नाही तर परदेशी भाविकांच्याही औत्सुक्याचे केंद्र बनले आहे.
महालक्ष्मीचं हे मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णपणे सोन्याचं बनविलेलं आहे. या सुवर्ण मंदिराची चमक इतर सर्व मंदिरापेक्षा वेगळीच आहे. इथे खरच महालक्ष्मीचा निवास असल्याची खात्री पटते. मंदिर पाहिल्यावर येथे नक्कीच महालक्ष्मीचा वास असेल असा विश्वास वाटतो. कळसापासून खांबांपर्यंत आणि पायापासून गाभाऱ्यापर्यंत सगळं सोन्याचं बनविलेलं आहे. इथे आल्यावर नजर जाईल तिथपर्यंत सोनचं सोनं दिसतं.
मंदिराच्या भिंती सोन्याच्या, मंदिराचे सर्व खांब सोन्याचे, मंदिराची चौकट सोन्याची आणि मंदिरातील देवीची मुर्तीही सोन्याचीच. इथे आल्यावर मिडास राजाची कथा आठवते. तो ज्यावस्तूला हात लावायचा त्याचं सोनं व्हायचं. इथेही प्रत्येक वस्तू सोन्याची आहे. देशातलं हे नवीन सुवर्णमंदिर शंभर सव्वाशे नाही तर चक्क १५०० किलो सोन्यापासून तयार करण्यात आलं आहे. जगातलं हे एकमेव मंदिर असावं जिथे एवढया मोठ्या प्रमाणात सोनं वापरलेलं आहे.
सकाळी सूर्याची पहिली किरणं पडताच मंदिर झळाळून निघतं आणि रात्रीच्या वेळी हजारो, लाखो विद्युत दिपांनी मंदिरच सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.
तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात श्रीपुरम येथे संपूर्ण सोन्याने तयार केलेलं हे महालक्ष्मी नारायणी मंदिर आहे. चनैई पासून श्रीपेरांब्दूर, कांचीपुरम मार्गे १७५ किमीवर वेल्लोर आहे. तर तिरुपतीहून १२० किमी अंतरावर दक्षिण भारतातलं हे एकमेवाद्वितीय सुवर्णमंदिर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी तसेच माता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दररोज किमान २५ हजार भाविक येतात. काही विशेष प्रसंगी तसेच दर शुक्रवारी एक लाखांपेक्षा जास्त भाविक मंदिराला भेट देतात.
वेल्लोर जिल्ह्यातल्या श्रीपुरम या निसर्गरम्य ठिकाणी तयार करण्यात आलेलं हे वैभवशाली सुवर्ण मंदिर म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं नवीन केंद्र बनलं आहे. मंदिराचा प्रत्येक खांब त्याचा इंच अन इंच भाग सोन्याने सजविलेला आहे. हे मंदिर नवीनच असल्यामुळे इथल्या सोन्याची झळाळीही इतर सुवर्णमंदिरांपेक्षा जास्त चमकदार आहे. तिरुपतीहून वेल्लोरला गेल्यावर हा फरक विशेषत्वाने जाणवतो.
एकशे एक एकर जागेवर उभारलेलं हे सुवर्णमंदिर तयार करण्यासाठी १५०० किलो सोनं लागलं ज्याची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त आहे. दिवसा सूर्यप्रकाशात तर हे मंदिर दुरूनही उठून दिसतं पण रात्री लायटिंग मध्ये त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. कल्पनेतला स्वर्ग साक्षांत भूमीवर तर अवतरला नाही ना! असं वाटतं. एखाद्या चित्रपटांत किंवा स्वप्नातंही जेवढं सोनं आपण कधी पाहिलं नसेल, ज्याची कल्पना देखील आपण कधी केली नसेल एवढं सोनं इथं उघड्यावर खुलेआम पहायला मिळतं.
आपली नजर जिथवर पोहचते तिथे सोनंच सोनं दिसतं. तेही अत्यंत सुंदर,सुबक आणि मनमोहक नक्षीकाम केलेलं. आपण स्वर्गात महालक्ष्मीच्या खऱ्याखुऱ्या महालांत तर नाही ना असं वाटू लागतं. त्यामुळेच तर हे मंदिर पाहायला भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कधी कधी तर एकेका दिवसांत लाखांपेक्षा जास्त भाविक वेल्लोरच्या श्रीपुरम येथील महालक्ष्मी नारायणी मंदिरांत येतात.
हे मंदिर बनविण्यासाठी तांब्याच्या हजारो प्लेट्सवर सोन्याचे नऊ ते दहा थर देण्यांत आले आहेत. ७ वर्षे दररोज ८०० कामगार हे मंदिर तयार करण्यासाठी काम करीत होते. १०१ एकर जागेवर हे मंदिर उभारण्यात आलं आहे. मंदिराच्या दर्शनी भागात १००८ दिव्यांची तांब्याचे १० स्तर असलेली दीपमाळ लक्ष वेधून घेते. कासवाच्या पाठीवर ही दीपमाळ उभारण्यात आली आहे. विशेष प्रसंगी १००८ दिव्यांची ही दीपमाळ प्रज्वलित करण्यात येते. दिपमाळेच्या मागे तीन दिशांना मा दुर्गा, मा लक्ष्मी आणि मा सरस्वती यांच्या आकर्षक रंगीत मूर्ती स्थापन केलेल्या आहेत.
मंदिराच्या दर्शनी भागात देशातील प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘तीर्थम सरोवर’ बनविलेले आहे.तर मंदिराच्या प्रवेश मार्गवर हिरवागार बगीचा फुलविण्यात आला आहेत. २० हजार प्रकारच्या नैसर्गिक औषधी आणि फुलांच्या रोपांनी, वृक्षांनी आणि झाडांनी हा बगीचा समृद्ध झालेला आहे. निसर्गापासून जास्तीत जास्त उर्जा मिळविण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. हे मंदिर वर्षभर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं असत. या मंदिरातली महालक्ष्मीची मुख्य मूर्ती ७० किलो सोन्याची तयार केलेली आहे.
पहाटे ४ वाजे पासून महालक्ष्मीची नित्य पूजाअर्चा, अभिषेक सुरु होतो. विशेष म्हणजे या मंदिरांत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वत:च्या हाताने देवीला अभिषेक करत येतो. तसेच देवीला स्पर्शकरून तिच्या चरणावर डोकं टेकविता येते. तिरुपतीला तर खूप दुरून फक्त नजरेनं बालाजी पहाता येतो. इथे मात्र भक्त देवीला अभिषेक करू शकतो स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो. देवी आणि भक्तांतला दुरावा कमी करण्यात आलं आहे. मंदिरातर्फे अन्नदान, विद्यादान, गोशाळा, रुग्णालय इत्यादी सुविधा पुरविल्या जातात. येथील गोशाळेत गायींची विशेष काळजी घेतली जाते. मुख्य मंदिरात पुरुषभर उंचीची चांदीची गाय लक्षवेधक आहे. महालक्ष्मीच्या दर्शना नंतर चांदीच्या गायीचं दर्शन लक्षांत राहतं.
महालक्ष्मी नारायणी मंदिराची रचना सहा टोकांच्या चांदणी किंवा स्टार सारखी आहे. या रचनेला श्रीचक्र म्हणतात. मुख्यमंदिरांत जाण्यासाठी या २ किमी अंतराच्या या स्टार मार्गावर हिरवळ तयार करण्यात आली आहे. तसेच उन्हापावसापासून भाविकांचे रक्षण करण्यासाठी वर छत करण्यात आलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा मानवता आणि जनकल्याणासाठी उपयुक्त संदेश फलक लावण्यात आले आहेत. या अद्भुतरम्य आणि शांत वातावरणात येथील संदेशफलक अतिशय प्रभावी वाटतात. मंदिर निर्माण करणाऱ्यां ‘शक्तिआम्मा’ या तरुण संन्याश्याचा उद्देशही हाच आहे.
श्रीपुरम चेन्नई पासून १४५ किमी, बंगळुरूपासून २१५ किमी, तिरुपती पासून ११५ किमी अंतरावर आहे. श्री पुरम येथील श्री नारायणी मंदिर सध्या सुरु आहे. सकाळी ८.०० ते १२.०० पर्यंतच मंदिरात प्रवेश दिला जातो.
संपर्क: Sri Puram Sri Narayani Peetam
Thirumalai Kodi,Vellore Tamil Nadu 632055
Phone- 0416-2206500 Mob- 91462206500
Website:- www.sripuram.org