घटस्थापना अर्थात नवरात्र महात्म्य
दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना अर्थात शरद ऋतूच्या सुरुवातीस म्हणून शारदीय नवरात्रास सुरुवात होते. त्याविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत….
यंदा अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात 7 ऑक्टोबर (गुरुवार) पासून अश्विन शुद्ध नवमी 15 ऑक्टोबर या काळात नवरात्र साजरे होत आहे. नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीचे पूजन. देवीच्या नऊ रूपांचे अर्थात नवदुर्गाचे पूजन. संपूर्ण भारतभरात विविध नावाने व विविध पद्धतीने नऊ दिवस केले जातात.
पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कृष्णानदीती, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायानी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी व शेवटच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्री या नवदुर्गा होत.
शास्त्रात देवीची सौम्या आणि रुद्र अशी दोन प्रकारची रूपे सांगितलीआहेत. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत. तर दुर्गा, काली, चंडी आणि भैरवी ही रुद्र रूपे आहेत.
यंदाचा घटस्थापना मुहूर्त सकाळी साडेसहा ते आठ वाजेपर्यंत तर दुपारी अकरा ते दीड वाजेपर्यंत असा आहे. नऊ दिवस देवीला विविध 9 प्रकारचे नैवेद्य दाखवतात. त्यातील पहिल्या दिवशी शुद्ध तूप, दुसऱ्या दिवशी साखर, तिसऱ्या दिवशी दूध, चौथ्या दिवशी मालपोहा, पाचव्या दिवशी केळी, सहाव्या दिवशी मध, सातव्या दिवशी गुळ, आठव्या दिवशी नारळ, नवव्या दिवशी तीळ या क्रमाने नैवेद्य दाखवावा.
नवरात्रीच्या नऊ दिवसांना नऊ माळा असे म्हटले जाते. त्याचे कारण प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या फुलांची माळ वाहिली जाते. पहिल्या दिवशी सोनचाफा, दुसऱ्या दिवशी मोगरा, तिसऱ्या दिवशी गोकरण, कृष्णकमळ, चौथ्या दिवशी भगवा झेंडू, पाचव्या दिवशी बेल माळ, सहाव्या दिवशी कर्दळी फुले, सातवा दिवशी लाल झेंडू, आठव्या दिवशी लाल फुले, नवव्या दिवशी कुंकुमार्चन अशा प्रमाणे माळा वाहाव्यात.
नवरात्रातील अष्टमीचा होम अर्थात चक्रपुजा यास विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी नवसपूर्तीसाठी चक्र पूजा केली जाते. कृष्णाने युद्धातील विजयासाठी पांडवांकडून चक्र पूजा करून घेतली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. अष्टमीला सांजोऱ्या व कडकण्या यांचा नैवेद्य दाखवून घटा समोर बांधले जातात.
घटस्थापने साठी लागणारे साहित्य
कुलदैवता प्रतिमा, कलश, नारळ, केळीचे पान, फुले, सप्तधान्य, मातीचा घट, शेतातील काळी माती, शंख, घंटा, समई, नंदादीप, वात, धूप, दीप.
षोडशोपचारे घटस्थापना पूजा झाल्यानंतर नऊ दिवस सकाळ, सायंकाळ देवीची आरती करुन नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रात अनेक भाविक नऊ दिवस उपवास ठेवतात तर सप्तशती पाठ, दुर्गा महात्म्य, देवी महात्म्य, देवी सहस्त्रनाम, दुर्गा स्तुति, महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, देवी सूक्त, दुर्गा सप्तशती सार, देवी अश्टोत्तरा सतनामावली अशा आदिमाया शक्तीच्या विविध रूपांचे मंत्र पठण करतात.
महिलाभगिनी वर्ग देखील नवरात्रातील प्रत्येक माळेला देवीला अर्पण करण्यानुसार असलेल्या फुलांच्या विविध रंगानुसार असलेल्या रंगाच्या साड्या परिधान करतात. त्यानुसार यंदा पहिल्या माळेला पिवळा रंग, दुसरी माळ हिरवा रंग, तिसरी माळ करडा रंग, चौथी माळ नारिंगी रंग, पाचवी माळ पांढरा रंग, सहावी माळ लाल रंग, सातवी माळ निळा रंग, आठवी माळ गुलाबी व नववी माळ जांभळा रंग आहे.
नवरात्रानंतर दहाव्या दिवशी सीमोल्लंघन अर्थात दसरा सण साजरा केला जातो. त्यादिवशी सोने लुटणे म्हणजेच आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
सर्व वाचकांना नवरात्र व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.