इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेख – वसईची वज्रेश्वरी देवी
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थान आहे. वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानली जाते. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे जिल्ह्याला हजारो वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिकप्रमाणे धार्मिक अधिष्ठानाची वैभवशाली पार्श्वभूमी आहे. वनवैभवासह सागरसान्निध्याच्या ठाणे जिल्ह्यला जे वैभव लाभलेय त्यात धार्मिक पार्श्वभूमीच्या मंदिर वास्तूंचाही सहभाग खूप मोठा आहे. त्या मंदिर वास्तूंना अजोड अशा शिल्पाकृतींबरोबर अनेक सत्ताधीशांच्या काळातील त्या शिल्पांवर त्यांची शैलीही पाहावयास मिळते.
मुंबई-ठाण्यापासून तास-दिड तासाच्या अंतरावरील वज्रेश्वरी माता मंदिर तसे सर्वपरिचित असून अनेक ज्ञाती, परिवारांचे ते श्रद्धास्थानासह कुलदैवतही आहे. त्यामुळेच या स्थानाला महाराष्ट्रातील पावित्र्यासह धार्मिक स्थळांत विशेष स्थान आहे.वज्रेश्वरी म्हणजे माता पार्वती देवीचे स्वरूप.
वज्रेश्वरी मंदिर इतिहास
जुन्या कथेंनुसार काळीकुट नावाच्या राक्षसाने मंदिराजवळच्या या प्रदेशमधील ऋषी, तपस्वी आणि माणसांना त्रास दिला तसेच त्याने देवतांच्या विरुद्ध युद्ध करण्याचा प्रयत्न केला. चिंता करून गुरू वशिष्ठांच्या नेतृत्वाखाली देव आणि ऋषींनी देवीला प्रसन्न करण्यासाठी एक यज्ञ केला. देवी त्या ठिकाणी प्रकट झाली आणि राक्षसांना मारले. त्यानंतर प्रभू श्रीरामाने विनंती केली की देवी वडवली प्रदेशात राहून वज्रेश्वरी या नावाने ओळखली जावी. अशा प्रकारे या प्रदेशात वज्रेश्वरी देवीच्या मंदिराची स्थापना झाली.
पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात पेशव्यांच्या काळात सरदार चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्यावर सर्व शक्तिनिशी जी यशस्वी युद्धमोहीम झाली त्याची पार्श्वभूमी या मंदिर वास्तूमागे आहे. इ. स. १७३९ मध्ये सरदार चिमाजी अप्पांनी आपल्या अंगभूत शौर्यासह कल्पकतेने मोहीम फत्ते करून पोर्तुगीजांना पराभूत केले.
‘‘माझी वसई परिक्षेत्राची नियोजित मोहीम यशस्वी झाल्यावर आई वज्रेश्वरी मी तुझे मंदिर उभारीन,’’ असा नवस सरदार चिमाजी अप्पांनी केला होता. त्याला यश आल्याने किल्लास्वरूप ही मंदिर वास्तू उभारली गेली. वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे. इतर प्राचीन मंदिरांप्रमाणे वज्रेश्वरी माता मंदिरालाही आख्यायिका, दंतकथेचे कोंदण आहेच. त्यानुसार, प्रारंभीच्या काळात वज्रेश्वरी मातेचे वास्तव्य आताच्या मंदिर वास्तूच्या नजीकच्या ‘वडवली’ गावात होते. कालांतराने ‘वडवली’ हे नाव मागे पडून वज्रेश्वरी हे नाव अखेर जनमानसात रूढ झाले.
वज्रेश्वरी मंदिर वास्तू किल्ल्याप्रमाणे उंचावर असल्याने दगडी पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जावे लागते. मूळ मंदिराचे बांधकाम भक्कम दगडाचे आहे. पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडप, गाभारा, प्रमुख गाभारा असे तीन टप्पे लागतात. या तिघांचेही बांधकाम दगडाचे आहे. या दगडी वास्तूवर सुशोभीकरणासाठी रंगरंगोटी केली जात असे; परंतु पुरातत्त्व खात्याच्या आदेशानुसार रंग देण्याला प्रतिबंध केल्यावर मूळ मंदिर वास्तूच्या शिल्पाकृतीचा बाज कायम राहिल्याने त्याच्या पुरातन बांधकामाची कल्पना येते. मंदिर वास्तूची रचना किल्लासदृश असल्याने त्याच्या पुरातन- पारंपरिक वास्तुरचनेनुसार मंदिर प्रवेशद्वारीच्या नगारखान्याची इमारत मूळ बांधकामाच्या शैलीशी सुसंगत अशी आहे.
या मंदिरातील वज्रेश्वरी देवीच्या हाती खड्ग आणि गदा आहे. तसेच वज्रेश्वरी देवीच्या आकर्षक मूर्तीच्या एका बाजूस रेणुका माता आणि दुसऱ्या बाजूस कालिका माता यांच्याही चित्ताकर्षक मूर्ती दर्शकांचे लक्ष वेधून घेतात. प्रमुख गाभाऱ्यात पाच मूर्ती आहेत. त्यांत मध्यभागी वज्रेश्वरी, तिच्या उजव्या बाजूला सावित्री-सरस्वती आणि डाव्या बाजूला लक्ष्मी-भार्गव यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या गाभऱ्यात गणपती, वेताळ, कालभैरव इत्यादींच्या मूर्ती आहेत. प्रमुख गाभाऱ्यात भाविकांना योग्य प्रकारे दर्शन घडावे अशाच प्रकारे देवीची स्थापना केली असून, त्यासाठी भाविकांच्या दर्शनाची आणि जाण्या येण्यासाठी खुप छान व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिर परिसरातील गणेशपुरी अकलोली, दातीवली येथील गरम पाण्याची कुंडे म्हणजे श्रद्धावान भाविकांबरोबर ते पर्यटक तसेच रुग्णांचेही आकर्षण आहे. कुंडातील गंधकयुक्त गरम पाण्याच्या सतत वाहत्या झऱ्यांमुळे त्वचारोगासाठी तो एक इलाज आहे असे मानले जाते.वज्रेश्वरी मंदिराच्या परिसरातील गणेशपुरी आणि अकलोली या ठिकाणांवर असलेली गरम पाण्याची कुंडे ही भाविकांचे आणि पर्यटकांचे तसेच रुग्णांचेही आकर्षण आहे. येथील हे उष्ण झऱ्यांचे प्रमाण हे या शहराला खरोखर अद्वितीय बनवते. ही कुंडे मंदिरापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर अकलोली आहे जेथे जवळपास ५ फूट खोल टाक्यांमध्ये सात गरम कुंड आहेत. या गरम पाण्याच्या झऱ्यांमुळे विविध त्वचारोग आणि आजार यांच्यावर उपचार होऊन ते बरे होतात असे सांगितले जाते. अकलोलीचे हे कुंड नेहमी पाण्याने भरलेले असतात. हे पाणी जमिनीतून येत असल्यामुळे आणि सतत वाहणारे पाणी असल्याने स्वच्छ असते त्यामुळे या कुंडामध्ये खूप लोक आंघोळ करतात.
वज्रेश्वरीला वर्षभर भाविकांचा ओघ असतोच; परंतु वार्षिक उत्सवातील चैत्रातील यात्रा जेव्हा भरते, तेव्हा या उत्सवाचा महोत्सव अनुभवता येतो. नवरात्र उत्सवाची सांगता होताना दसऱ्याची पालखी शोभायात्रा हे येथील खास आकर्षण आहे. या उत्सवाचे औचित्य साधत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांना आमंत्रित करून समाजप्रबोधन कार्याचा वसाही मंदिर व्यवस्थापनाने जपला आहे.
वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणे या जिल्ह्यात आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशनपासून हे मंदिर जवळ आहे. तानसा नदीकाठाजवळ वसलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाण्यापासून सु. ४२ किमी., तर भिवंडीपासून उत्तरेस १९ किमी. अंतरावर आहे. नवसाला पावणारी वज्रेश्वरी म्हणजे महाराष्ट्रातल्या देवीच्या महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. वज्रेश्वरी अनेकांची कुलदेवता देखील आहे.