इंडिया दर्पण नवरात्रोत्सव लेखमाला
श्री सप्तशृंगनिवासिनी देवी
यंदाच्या नवरात्रांत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशांतील देवी भक्तांमध्ये सप्तशृंगनिवासिनी देवीच्या नवीन खरं तर प्राचीन रूपाची चर्चा आहे. गेली दोन वर्षे लॉकडाउन मुळे बंद असलेली देवीची यात्रा यंदा उत्साहात भरली आहे.त्यांत यंदा सप्तशृंगनिवासिनीदेवीच्या अंगावरील एक हजार वर्षांचा सिंदूर लेप विधिवत काढण्यात आला.त्यामुळे एक हजार वर्षां पूर्वीचे सप्तशृंगनिवासिनीदेवीचे रूप कसे दिसते ते पाहण्याची उत्सुकताभाविकांत शिगेला पोहचली आहे. आज आपणही सप्तशृंगनिवासिनीदेवीचे नवीन रूप डोळ्यात भरून घेऊ या.
सप्तशृंगनिवासिनी देवी म्हणजे उत्तर महाराष्ट्राला पडलेले एक गोड स्वप्न आहे. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप्तशृंगगडावर विसावलेली आई जगदंबा. श्री सप्तशृंगनिवासिनीची नाशिक जिल्ह्यावर विशेष कृपादृष्टी आहे. सर्व क्षेत्रांत नाशिक पुढे आहे, त्याचेही अधिष्ठान जगदंबा आहे…
महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे प्रसिद्ध आहेत. देवी भागवतात या साडेतीन पीठांचा उल्लेख आहे तो असा-
कोल्हापूरं महास्थानं, यत्र लक्ष्मी सदास्थिता।
मातृ:पुरं द्वितीयंच, रेणुकाधिष्ठितं।
तुळजापूर तृतीयं स्थान, सप्तशृंग तथैवच।।
यातील सप्तशृंगनिवासिनी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांची आवडती भगवती.
त्रिभुवनी भुवनी पाहता तुजऐसी नाही…
पर्वतशिखराच्या मधोमध कड्यामध्ये गुहाकृती अशी अठरा-वीस फूट उंचीची कपार आहे. त्या कपारीत खोलवर महिरप कोरलेली आहे. त्या महिरपीतच श्री सप्तशृंगदेवीची आठ फूट उंच मूर्ती कोरलेली आहे. देवीची मूर्ती अतिशय भव्य, शेंदूर लावलेली रक्तवर्णी आहे. देवीची पूजा शिडीवर उभे राहूनच करतात. देवीला अठरा हात आहेत. तिच्या उजव्या हातांमध्ये मणिमाळ, कमळ, बाजा, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल आणि कुऱ्हाड ही आयुधं, तर डाव्या बाजूच्या हातांमध्ये शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू आहेत. सप्तशृंगनिवसिनीला अष्टादशभुजा महालक्ष्मीच म्हणतात. देवी पूर्वाभिमुख आहे.
त्रिकाल पूजेची व्यवस्था
देवीला रोज वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक केल्यावर तिच्या सर्वांगाला शेंदूर लावतात. पापण्या व भुवया रंगाने कोरून कपाळावर ठसठशीत कुंकू लावतात. हे कुंकू दररोज निरनिराळ्या रंगाचे व आकाराचे असते. रविवारी सूर्यफूल, सोमवारी शैवपंथी, मंगळवारी गोल, बुधवारी फुलाकृती, गुरुवारी स्वस्तिक, शुक्रवारी पिंपळपान, शनिवारी शंखाकृती कुंकू लावतात. याचप्रमाणे अष्टमी, नवमी आणि पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा कुंकवाचा आकार बदलण्यात येतो. नंतर देवीच्या अंगात तीन खणांची चोळी. कटीला वस्त्र व डोक्यावर मुकुट चढवितात. संस्थानाने देवीच्या त्रिकाल पूजेची व्यवस्था केली आहे. देवीला दर वाराच्या वेगवेगळ्या पैठण्या आहेत. पैठणी नेसवून झाली म्हणजे नित्याचे अलंकार घालतात. अंबाबाईसाठी सोन्याचा कंठहार, गाठले, बिंदी, मंगळसूत्र, नथ, पुतळीहार, चांदीचा मुकुट, कमरपट्टा, चांदीचे पाय, पादुका आदी लाखो रुपये किमतीचे दागिने, तसेच अभिषेकपात्र, समया, घागरी, मोरमुकुट, घंटा, ताटवाटी, राजदंड आदी पूजेची उपकरणे आहेत.
पहाटेपासून विधींचा प्रारंभ
पहाटे पाच वाजता सप्तशृंगीदेवीचं मंदिर उघडतात. सहा वाजता काकड आरती होते. त्यानंतर आठ वाजता आईच्या महापुजेला सुरुवात होते. यामध्ये भगवतीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते नवी पैठणी किंवा शालू नेसवून तिचा साजशृंगार केला जातो. मातेच्या मुखात पानाचा नवीन विडा दिला जातो. नंतर वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखविला जातो. दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती होते. देवीची सायंकाळी साडेसात वाजता आरती करतात.
अशी आहे आख्यायिका
स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगीच्या उत्पत्तीसंदर्भात श्रीसप्तशतीमध्ये उल्लेख आढळतो. त्यानुसार महिषासुराच्या जाचाला कंटाळून देव-देवतांनी होम केला. देवीला प्रसन्न केले. देवांच्या विनंतीनुसार देवीने महिषासुराबरोबर झालेल्या घनघोर युद्धात त्याला ठार केले. मरतेसमयी महिषासुराने देवीकडून एक वर मागितला, की तुझे दर्शन घेण्यापूर्वी भक्तांनी माझे दर्शन घ्यावे. यामुळे मंदिरात जाताना पहिल्या पायरीजवळ डाव्या बाजूला महिषासुराच्या मस्तकाची स्थापना केली असून, नंतर श्रीगणेशाचे मंदिर, निम्म्या पायऱ्या चढून गेल्यावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे मंदिर लागते.
येथील ४७२ पायऱ्या पेशव्यांचे एक सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाई यांनी बांधल्या आहेत. या पायऱ्यांवर विसाव्यासाठी व सावलीसाठी ट्रस्टने अकरा शेड बांधले आहेत. कासव टप्प्याच्या थोडे पुढे औदुंबराचे झाड आहे. या झाडाच्या पूर्वेस ३० फुटांवर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आहे तो असा,
तो मच्छिंद्र सप्तशृंगी।
भग्नावयव चौरंगी।
भेटला की तो सर्वांगी।
संपूर्ण झाला।।
देवीला प्रदक्षिणा घालायची झाल्यास सप्तशृंग पर्वताच्या मध्यावरून आखलेल्या पायवाटेने घालावी लागते. मात्र, नवरात्राच्या काळात प्रदक्षिणा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. गडावर चैत्र पौर्णिमा व नवरात्रोत्सव हे दोन्ही उत्सव अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात पार पाडले जातात. वरील दोन्ही उत्सवांच्या वेळी श्रीजगदंबेचे मूळ स्थान असलेल्या सर्वोच्च शिखरावर दरेगावचे पाटील पारंपरिक पद्धतीने ध्वज लावतात. ध्वज लावणारा परत येताना विशिष्ट प्रकारचे गवत प्रसाद म्हणून घेऊन येतो व ते गवत प्रसाद म्हणून वाटतो. हा समारंभ झाला की यात्रा परतू लागते.
Navaratri Festival Special Article Shree Saptashrungi Devi by Vijay Golesar