इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेखमाला
माहूरची श्री रेणुकादेवी
माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत. पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत. श्रीक्षेत्र माहूर हे नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रीरेणुकादेवी मंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय.
आख्यायिका
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला.
आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ‘ इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर ‘ असे सांगितले.
परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ‘तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘ मातापूर ‘ म्हणू लागले.
रेणुकामातेचा तांदळा
मंदिराच्या मुख्य गाभार्यात रेणुका मातेचा तांदळा असून हा मुखवटा सुमारे ५ फूट उंच असून ४ फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढविला आहे.या मंदिरामागे परशुरामाचे मंदिर आहे.
मंदिर इतिहास
माहूर गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगंण्यात येते. हे मंदिर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुर्नबांधणी ही इ.स. 1546 मध्ये झाली असून त्या संबधीचा शिलालेख मुख्य दरवाजावर आहे. हया मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स. 1624 च्या सुमारास केला आहे.
हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे. मंदिर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभाऱ्यात प्रवेशव्दासर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. दक्षिणाभिमुख चांदीने मडविलेल्यात प्रवेशव्दारातून आपण प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश करतो. रेणुकेच्या विविध पुजा-अर्चनेने व पुजाऱ्याच्या गाभाऱ्यातील मंत्र विधीने वातावरणात चैतन्य निर्माण होते.तद्वतच तेला तुपाच्या नंदादीपामुळे वातावरण प्रसन्न होते.जेंव्हा नम्र होऊन पूर्वाभिमुख असलेला रेणुकेच्या तांदळा स्वरुप तेजपुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते. सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली व महालक्ष्मीच्या व तुळजाभवानीची मूर्ती आहेत.खालच्या बाजुला परशुराम मंदिर, दर्शनी भागात गणपती मंदिर, विष्णू कवी मठ,पांडवतीर्थ,औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ,रामतीर्थ इ.आहेत.
कसे जायचे
नांदेडपर्यंत – नांदेड हे लोहमार्गानुसार दक्षिण मध्य रेल्वे वर येते. मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला आगगाडीने थेट जाता येते. माहूरपर्यंत – नांदेड ते माहूर अशी एस्टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे. माहूर गांव ते टेकडीवरील मंदिर – शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.
Navaratri Festival Special Article Mahur Renukadevi