इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेख
माळ पुण्याची चतु:शृंगी माता
प्राचीन काळापासून पुण्यातील चतु:शृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात सर्व पुणेकरांची पावले या देवी मंदिराकडे वळतात. या देवीला चतु:श्रृंगी का म्हणतात याविषयी असे सांगतात, या मंदिराच्या नावाचा पहिला शब्द ‘चतुर’ म्हणजे ‘चार’ आणि म्हणून चतु:श्रृंगी म्हणजे चार शिखरे असलेला पर्वत. आज या मातेला आपण नमस्कार करणार आहोत.
चतु:श्रृंगी मंदिर खूप मोठं असून 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक आहे. मंदिर सेनापती बापट रस्त्यावरील टेकडीवर आहे. चतु:श्रृंगी देवी ही या मंदिराची प्रमुख देवता आहे आणि देवीला अंबरेश्वरी देवी असंही म्हणतात. पुण्याच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर उंचावर आहे. देवीला जाण्यासाठी १७० पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिरात गणपतीचे मंदिरदेखील आहे. या मंदिराच्या देखभालीचे काम चतु:श्रुंगी देवस्थान ट्रस्टकडे सोपवण्यात आले आहे.
हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. अनेक पुणेकरांची या देवीवर मोठी श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जगभरातून लोक येतात. धार्मिकदृष्ट्या या मंदिराला खूप महत्त्व असून ज्येष्ठ नागरिकही १७० पायऱ्या चढून देवीच्या दर्शनासाठी येतात.
मंदिराचा इतिहास
पेशव्याच्या काळात सुमारे 300 वर्षापूर्वी दुलभशेठ नावाने पेशव्यांचे सावकार होते. ते पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे. नाशिकच्या वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे परमभक्त होते. प्रत्येक चैत्र आणि अश्विन पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रोत्सवात हे सावकार त्याकाळी प्रवास करुन दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे. घोडा गाडी, बैल गाडी तर कधी चालत ते देवीची सेवा करण्यासाठी वणीला जायचे. असे अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली मात्र वृद्धापकाळाने त्यांना वणीला जाणं शक्य नव्हतं. देवीची सेवा करता येणार नसल्याने त्यांना दुख: झालं. त्यावेळी देवीने त्यांचं दुख: जाणलं आणि देवी भक्तासाठी प्रकट झाली. पुण्याच्या डोंगरावर उत्खनन करायला सांगितलं. माझी मूर्ती मिळेल असंही सांगितलं. सांगितलेल्या ठिकाणी भक्ताने उत्खनन केल्यानंतर भक्ताला चांदळास्वरुप (मुखवटा) मूर्ती मिळाली. त्याप्रमाणे भक्तासाठी ही देवी पुण्याच्या चतु:श्रृंगी नावाने प्रकट झाली. देवी प्रकट झाल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांची टांकसाळ होती. त्या टांकसाळीत त्यांनी देवीचा एक चांदीचा रुपया बनवला आणि त्याकाळी त्यांनी चतु:श्रृंगी रुपया नावाने प्रचलित केला होता.
रँडच्या वधाचा कट
चतु:श्रृंगी मंदिराच्या परिसरातील पार्वतीनंदन गणपती मंदिरात बसून चाफेकर बंधूंनी रँडच्या वधाचा कट रचला होता.अशी एक आठवण सांगितली जाते. त्यावेळी त्यांनी या गणपतीचे आशीर्वाद घेतले, देवीची आराधनाही केली. आम्हाला या कटात यश मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली. त्यात चाफेकरांना यश मिळालं. त्यावेळी त्यांनी सांकेतिक भाषेत लोकमान्य टिळकांना खिंडीतील गणपती पावला, असा निरोप दिला होता. त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी रॅंड कसा होता आणि त्याचा वध कसा करण्यात आला यासंदर्भात टिळकांनी लेख लिहिला होता.
पुण्यात उत्तर पेशवाईत दुलभशेठने नाणी पडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दुलभशेठची एक टाकसाळ होती. दुलभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली. लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते.
चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु:श्रुंगी येथे पहाटे पळत जात असत. आता तालीमबाज व पळत जाणे बाजूला पडले असले, तरी आजही पुण्याच्या पेठांमधून चतु:श्रुंगीला तोरण वाहण्याची प्रथा सुरू आहे. जुन्या काळातील येथील जत्रा आजही अनेकांच्या स्मरणात असेल.
चतु:श्रुंगीचे दुसरे एक मंदिर रविवार पेठेत आहे हे मात्र थोडक्याच जणांना माहित असेल. सुमारे २०० वर्षांपूर्वी किसनदास राजाराम यांनी येथे देवीची स्थापना केली व बढाई समाजाने मंदिर बांधले. येथे देवी तांदळा स्वरूप आहे. सुभानशा दर्ग्याच्या चौकातून गोविंद हलवाई चौकाकडे जाऊ लागले की उजव्या बाजूस हे मंदिर आहे.
सोमवारपासून चतु:श्रृंगी मंदिरांत नवरात्र उत्सव सुरू झाला असून, ५ ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या उत्सवात.श्री देवी चतुःशृंगी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले असणार आहे. .बुधवार (ता.५) रोजी सायंकाळी ५ पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह देवीच्या सेवेकर्यांचा सहभाग असेल. तसेच हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
पुजा साहित्य, लहान मुलांची खेळणी, कपडे, महिलांसाठी दागिने कपडे, गृहपयोगी वस्तु, फोटो, मसाले, खाण्यापिण्याचे पदार्थ यांच्या स्टॉलची रेलचेल सुरू आहे.भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसरात जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यंदा अनिरूद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक सेवा करीत आहेत. मंदीर परिसरात जंतुनाशके तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. ग्रीन हिल्स ग्रुप’च्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने बारा हजार रोपे लावली असून त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे. त्यास लागणार्या खताची निर्मिती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून करण्यात येते. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी संपूर्ण बॅरिकेडिंगसह रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Navaratri Festival Pune Chatushrungi Mata