इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेख
मांढरदेवची ‘काळूबाई’!
आज आपण सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळूबाईचे दर्शन घेणार आहोत. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक-भक्त वर्षभर येत असतात. समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्टया शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई – भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड.
अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साता-याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते. शिवाय पुर्वेकडून शिरवळवरुन लोहोम-झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे. पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे. त्यानंतरच्या टप्प्यावर मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे. स्थानिक लोक तिला मंडीआई असे म्हणतात. या मंदिरासमोरच गोमुखतीर्थ हे जलकुंड आहे.
द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा सेनापती देवीलाख्यासूराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती. देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला साहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांढव्यऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले. त्यांनी हिरडाच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू- महादेवाची तपसाधना केली, त्याठिकाणी मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्यालाच मांढेश्वर असेही म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे.
शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेत तेथुन जवळपास १२५ पाय-या चढाव्या लागतात. मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची ५ फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह तीन खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची दोन फूट उंचीची शेंदूरचर्चित महिषासूरमर्दिनी रुपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे.
मुर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी-चोळी नेसवलेली असते. हळदी-कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण-नारळाने भरतात. देवीभक्तीची ज्योत अखंड रहावी म्हणूनच मंदिरासमोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजीबाबा (गोविंदबुवा) तरडावीकडे शिपाई मांगीरबाबा यांची मंदिरे आहेत. याशिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मीआई, गंगाजीबाबा, तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला ५२वीरांचा वेढा आहे.
वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात.पौषी यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा केली जात असते. या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे ‘बोपगावच्या फडतरे’ यांना असतो. गावोगावची भक्तमंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल-ताशा-हलगी-संबळ-झांजेच्या तालावर छबीना काढून डोंगर चढून येत असतात. यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. शाकंभरी पौणिर्मेशिवाय नवरात्रौत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरत असते. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ आणि ‘बोल मांढरच्या काळीचं चांगभलं’ च्या गजराने सारा परिसर दुमदुमुन जातो.
Navaratri Festival Mandhardevi Kalubai by Vijay Golesar