इंडिया दर्पण
नवरात्रोत्सव विशेष लेखमाला
कोल्हापूरची महालक्ष्मी
महाराष्ट्रात देवीची साडे तीन शक्तिपीठे मानली जातात. याविषयी एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे.
कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता l मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम् l
तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैवच ॥
या श्लोकांतील वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर सप्तशृंगीची देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखली जाते. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
आत्ताचे मंदिर हे तारका कृती असून या मध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली ,महासरस्वती ,गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकारचे मत आहे. कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात जुना भाग आहे. येथेच देवीचा गाभारा आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे म्हणतात.
देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो . हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे.
देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही खिडक्या नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत.
मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्या वर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यातील प्राधानिक रहस्यात तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे मातृलिंग गदा खेट पानपात्रचं विभ्रती l नागलिंगच योनि बिभ्रती नृप मुर्धनी ll महालक्ष्मी मूर्ती उंची सुमारे ३ फुट आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक (ढाल ) आहे. खालच्या दोन हाता पैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग (म्हाळुग) आहे. श्रीच्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्याचा नाग असून त्याचा फणा समोर आहे या फण्याच्या मागे लिंग व योनी ही प्रकृती तत्त्व व पुरुष तत्त्व यांची यांची प्रतीके आहेत मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी आहे.
देवीच्या डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ‘लिंगशैषाघौषहारिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच या देवीची महत्त्वाची ओळख आहे.
इ.स. १०९ मध्ये कर्णदेव राजा कोकणातून आला त्या वेळी अरण्यातील झाडे झुडपे तोडून ही मूर्ती उजेडात आणली असे म्हटले जाते आठव्या शतकात मंदिर भूकंपाने खचले. राजा गंडरदित्य याने मंदिराचा विस्तार केला . त्याने महाकाली मंदिर तर ११७८ ते १२०९ या काळात राजा जयसिंग व राजा सिंघण देव यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वर मंदिर बांधल्याचे म्हटले जाते. ज्या प्रमाणे श्री यंत्राच्या १६ काटकोनातील मध्यभागी सर्वोच्च बिंदू स्थान असते त्याच प्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणेचा मार्ग हा श्री यंत्रा प्रमाणे १६ काटकोनात विभागाला आहे. या मार्गाच्या मध्य भागी म्हणजेच सर्वोच्च बिंदू स्थानावर देवीची मूर्ती उभी आहे. संपूर्ण भारतातील अशी रचना असणारे उत्कृष्ट शिल्प वैभव व हेमाड पंथी असे एकमेव दोन मजली मंदिर असावे.
महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातुः लिंग असे म्हणतात महा लक्ष्मीच्या मस्तकावर याचे स्थान असून मातृरूपातील हे शिवलिंग असलेने याला अपवादात्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली तरी चालते. पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महलक्ष्मीचा उल्लेख आहे. काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव आहे परंतु करवीरात शिव व महलक्ष्मी दोघांचेही वास्तव्य आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे भक्ती आणि मुक्ती मिळते असा भोळ्या भक्ताचा भाव आहे.
महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो. शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.
नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा मराठमोळया मंदिराचे उत्तम उदाहरण आहे.