५१ शक्तीपीठापैकी एक नाशिकची श्री भद्रकाली देवी
॥ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी॥
॥दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते॥
आसामची कामाख्या देवी, बंगालची कालीमाता, पंजाबची ज्वालामुखी, काशीची मनकर्णिका एवढंच कशाला कोल्हापूरची अंबाबाई या देवींच्या सुप्रसिद्ध ५१ पीठांतील देवींएवढेच महत्त्व असलेली देवी आपल्या नाशिकमध्ये असूनही आपल्याला त्याची जाणीवही नाही. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवी वरील सर्व देवींइतकीच महत्त्वाची आहे.
भद्रकाली देवी मंदिर पौराणिक महत्त्व
देवीच्या ५१ शक्तिपीठ निर्मितीविषयी तंत्राचुडामणी या ग्रंथात एक प्रसिद्ध कथा आहे. शिवपुराणामध्ये साक्षात भगवतीच्या ५१ शक्तिपीठांचे वर्णन समाविष्ट करण्यात आले आहे. पार्वतीचे पिता साक्षात दक्ष प्रजापती यांनी आरंभिलेल्या यज्ञामध्ये सर्व देवता गंधर्व ऋषिगण आदी सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु या यज्ञामध्ये साक्षात देवाधिदेव महादेव यांना आमंत्रण करण्यात आले नव्हते. आपल्या पित्याच्याच घरी यज्ञ असल्यामुळे पार्वती ही आमंत्रणाविना यज्ञास गेली. महादेवांनी अनेकदा सांगून देखील पार्वतीने यज्ञास जाण्याचा मार्ग निवडला. अशा यज्ञामध्ये महादेवांची अपमान अवहेलना झाली हे पार्वतीला सहन झाले नाही म्हणून तिने तात्काळ यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. हे ज्यावेळेस महादेवांना समजले त्यावेळेस महादेवांनी दक्ष प्रजापतीचे शीरच्छेदन केले, तसेच त्या पूर्ण यज्ञाचा विध्वंस केला आणि सखी पार्वतीचे शव घेऊन तिन्ही लोकांमध्ये शोक करू लागले.
महादेवांच्या या शोकाला आवर घालणे कुणासही शक्य नव्हते. तेव्हा सर्व देवांनी विष्णूंची स्तुती करून विष्णूंना यावरती उपाय शोधण्याची विनंती केली. यावर भगवान श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या सहाय्याने सती पार्वतीच्या शवाचे छेद केले. पार्वतीच्या शरीराची जी जी अवयव अथवा शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले या शक्तिपीठांच्या सुरक्षेसाठी महादेवांनी भैरवाची स्थापना केली. या ५१ शक्तीपीठापैकी हनुवटीच्या म्हणजेच चिबुक स्थानाचा भाग हा जनस्थान म्हणजेच नाशिक येथील भद्रकाली देवी होय. या देवीचा भैरव हा साक्षात विकृताक्ष आहे. या देवीची भ्रामरी ही शक्ती आहे.
भद्रकाली देवस्थान
भद्रकाली देवी मंदिर हे अत्यंत प्राचीन असून सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली, मूळ मंदिर हे अतिप्राचीन आहे. १७९० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद तत्कालीन कागदपत्रांत सापडते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी मंदिराला भेट दिली आहे. भद्रकाली देवी मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाचे शक्ती आणि ऊर्जेचे केंद्र राहिले आहे.
उत्सव आणि धार्मिक सेवा
भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात ९ ते १० इंच उंचीच्या ९ प्राचीन मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूंच्या असून, या नवदुर्गा आहेत. या मूर्तींबरोबरच एक दशभुजांचा गणपतीदेखील येथे आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून, आजही त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. वासंतिक शारदीय असे दोन नवरात्र उत्सव भद्रकाली देवी मंदिरामध्ये साजरे करण्यात येतात. अत्यंत पारंपारिक पद्धतीने सर्व वार्षिक उत्सव येथे साजरे होतात.
पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्ती मार्गाने देवीची सेवा करण्यात येते. यामध्ये प्रातः महाअभिषेक पूजन, सप्तशती पाठ, महानैवेद्य, देवी भागवत पुराण, शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण अशा प्रकारे वेगवेगळ्या अध्यात्मिक तसेच संगीत सेवा, भजन सेवा , कीर्तन सेवा, सामुहिक स्त्रोत्र पठन, संस्कार वर्ग अशा पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरामध्ये उत्सवामध्ये रोज कुमारिका पूजन, ब्राह्मण भोजन, कुंकुमार्चन आदी विशेष पूजन देखील करण्यात येते.
वार्षिक उपक्रम आणि समाज उपयोगी सेवाकार्य
भद्रकाली देवी मंदिर हे केवळ शक्ती पीठच नव्हे तर एक विशिष्ट धार्मिक अधिष्ठान आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला जोडणारे हे अधिष्ठान आहे. समाजामध्ये येणाऱ्या विविध समस्या संकटे हे जणू आपल्या कुटुंबावरती आले आहे असे समजून समजतील प्रत्येक समस्यांसाठी भद्रकाली देवस्थान हे कार्यरत असते. आपल्या भागातील गरजू पालकांच्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिक्षण घेता यावे याकरता अत्यंत अल्पदरात बाल शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्थेच्या मदतीने बाल विद्यालय चालवण्यात येते. मंदिराच्या इतर आयामापैकी नाशिक प्राच्य विद्यापीठा मार्फत संस्कृत मध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी गुणगौरव आणि शिष्यवृत्ती देण्यात येते, तसेच संपूर्ण वर्षभर मंदिरामध्ये बालसंस्कार केंद्र चालवणे. असे अनेक उपक्रम मंदिरातर्फे घेण्यात येतात.
कोविड सारख्या महामारी काळात भद्रकाली देवस्थान तर्फे संपूर्ण नाशिक शहरातील ३००० हून अधिक पुरोहित, नाभिक, समाजसेवेचे कार्य करणाऱ्या महिला, फुले विकणारे विक्रेते अशा अनेक लोकांना दोन महिने पुरेल इतके धान्य वाटपाचे कार्य पूर्ण केले आहे. तसेच नाशिक मध्ये विविध ठिकाणी उभारलेल्या कोविड केअर सेंटर साठी व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून आवश्यक अशा सर्व गोष्टींची मदत करण्याचे सेवा कार्य मंदिर देवस्थान तर्फे केले आहे. तसेच समाजात घडणाऱ्या कुठल्याही चांगल्या गोष्टीचे पालकत्व स्वीकारून त्या घटकांच्या पाठीशी उभे राहणे हे मंदिर देवस्थान आद्यकर्तव्य म्हणून स्वीकारते.
अधिक माहितीसाठी संपर्क –
– मंदार कावळे गुरुजी, मुख्य पुजारी, भद्रकाली देवस्थान (+919422261628)
– विनायक चंद्रात्रे, उत्सव समिती प्रमुख (+919545588820)
Navarastri Festival Nashik Bhadrakali Devi Temple