नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक अँडव्हर्टायजिंग वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या अध्यक्षपदी पलक अँडव्हर्टायजिंगचे संचालक प्रवीण चांडक यांची तर सरचिटणीस म्हणून एम. के. अँडव्हर्टायजिंगचे मिलिंद कोल्हे -पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडीची घोषणा करण्यात आली.
मावळते अध्यक्ष सचिन गिते यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा केंसिंग्टन क्लब येथे संपन्न झाली. यावेळी असोसिएशनचे दिवंगत पदाधिकारी कै मंगेश खरवंडीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाल्यानंतर. निवडणूक निर्णय अधिकारी अँड.भाऊसाहेब गंभीरे यांनी नूतन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पाडली. अध्यक्ष पदासाठी प्रवीण चांडक यांचे नाव जेष्ठ सदस्य विठ्ठल देशपांडे यांनी सूचित केले, त्यास सर्वानुमते सहमती दर्शविण्यात आल्याने अध्यक्ष म्हणून चांडक यांची बिनविरोध निवड करण्यात आली . त्यानंतर उर्वरित कार्यकारिणीत सरचिटणीसपदी मिलिंद कोल्हे पाटील,उपाध्यक्ष गणेश नाफडे , कार्याध्यक्ष साहिल न्याहारकर, खजिनदार अमोल कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख दिलीप निकम,चिटणीस दीपक जगताप या पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते निवडीची घोषणा अध्यक्ष प्रवीण चांडक यांनी केली. नितीन राका, सचिन गिते, रवि पवार, विठ्ठल राजोळे, राजेश शेळके, श्याम पवार, विठल देशपांडे, दिनेश गांधी, शैलेश दगडे या सदस्यांचा संचालक कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. यावेळी प्रताप पवार, कैलास खैरे, श्रीकांत नागरे, सुनील महामुनी आदी सदस्य उपस्थित होते .
शहरातील माध्यम कर्मींसाठी लवकरच नावा चषक क्रिकेट स्पर्धा तसेच जाहिरात दिनाचा भव्य कार्यक्रम आणि नावा सदस्यांच्या हितासाठी विविध उपक्रम आयोजित केले जाणार असल्याची घोषणा नुतन अध्यक्ष प्रवीण चांडक यांनी केली.