विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
अपघात किंवा आजारांमुळे अनेक लोकांचे जीव जातात. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे देखील भारतात अनेक लोकांचा मृत्यू होतो ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणता येईल, विशेषत : चक्रीवादळ, महापूर, मुसळधार पाऊस, वीजा कोसळणे, प्रचंड तापमान आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे देखील अनेक लोकांचे जीव जातात. देशात गेल्या ३ वर्षात अतिवृष्टी, वीज, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या जल-हवामान आपत्तींमध्ये ६,८११ लोक मरण पावले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
विशेषत: बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश केरळमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो लोकांनी आपला जीव गमावला. त्याचवेळी, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या काही राज्यांचा किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबतचा डेटा काही वर्षांपासून गहाळ होता. एप्रिल २०१८ ते मार्च २०२१ पर्यंत गेल्या ३ वर्षात मृत्यूच्या यादीत बंगाल अव्वल असून येथे अशा आपत्तींमध्ये किमान ९६४ लोक मरण पावले. त्यामुळे देशात सात मृत्यूंपैकी एक मृत्यू बंगालमध्ये झाला. बंगालनंतर मृतांच्या संख्येत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ९१७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ७०८ मृत्यूंसह केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेशात २०१९ ते २०२० मध्ये ६७४ मृत्यूंची नोंद झाली असून मुख्यतः पुरामुळे ही दुर्घटना घडली आहे. झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या काही राज्यांचा डेटा काही वर्षांपासून गहाळ होता. जल-हवामान आपत्तींमध्ये मुसळधार पाऊस, वीज, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, हिमस्खलन, उष्णतेची लाट आणि थंडीची लाट यांचा समावेश आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे उपलब्ध आकडेवारी नुसार , भारतीय किनाऱ्यावर २०२० मध्ये पाच गंभीर चक्रीवादळे देशामध्ये धडकली. त्याचप्रमाणे पूर आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे, असे या आकडेवारीवरून दिसून येते. भारतभरात २०२० मध्ये १,९१२ स्थानकांवर अतिवृष्टीची नोंद झाली आणि ३४१ स्थळांवर अतिवृष्टीची नोंद झाली.