नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेवारस जनावरं रस्त्यांवर फिरत असतात. त्यांचा मालक आला नाही तरीही त्यांचे नुकसान होत नाही. पण देशाच्या सर्व प्रकारच्या वित्तीय प्रणालीमध्ये १ लाख कोटी रुपये बेवारस पडले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मुख्य म्हणजे याची माहिती स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
बँकांचा विचार केला तर देशातील सर्व बँका मिळून एकूण ३५ हजार कोटी रुपये बेवारस पडलेले आहेत. या पैशांवर कुणीही दावा केलेला नाही आणि त्याचे मुख्य कारण नॉमिनी आहे. हा पैसा ज्यांचा आहे त्यांनी बँकांमध्ये पैसा जमा करताना उत्तराधिकारीच नेमला नाही. पण, हा पैसा ज्यांचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार गंभीर असल्याचे अर्थ्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होत्या. हा पैसा सरकारलाही वापरता येत नाही आणि कुणाला देताही येत नाही. त्यामुळे त्याचा उत्तराधिकारी शोधण्याशिवाय पर्याय नाही.
अशी परिस्थिती भविष्यात येऊ नये यासाठी सर्व खातेदारांकडून नॉमिनी अर्थात उत्तराधिकारी निश्चित करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. बँकांमधील मुदत ठेवी बेवारस पडून आहेत. हा पैसा मूळ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मोहीम राबविली होती. त्यासाठी उद्गम पोर्टलही सुरू केले होते. बँकेतील खाते असो वा म्युच्युअल फंड असो वा आणखी कोणत्या बँकींग प्रणालातीली ठेवी असो, यापुढे उत्तराधिकारी नमूद करणे अनिवार्य असणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राऊंड ट्रिपींग धोकादायक
कर स्वर्ग (टॅक्स हेवन) देश आणि पैशांची राऊंड ट्रिपींग यापासून वित्तीय व्यवस्थेला धोका असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. आपली विक्री वाढवून दाखविण्यासाठी संपत्ती इतरांना विकून पुन्हा खरेदी करण्यास राऊंड ट्रिपींग म्हटले जाते. आता अर्थमंत्र्यांनी फिनटेक कंपन्यांना सायबर सुरक्षेसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे.
Nationalize Banks Money Nomination Account Union Government