नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांना गेल्या पाच वर्षात ब्रेक का लावला गेला. महापलिकेत सत्ता असतांना नाशिककरांच्या हिताच्या दृष्टीने कुठलेही महत्वाचे प्रकल्प राबविता आले नाही याबाबत आधी आपण नाशिककरांच्या हितासाठी काय दिवे लावले याचा हिशोब द्यावा. उगाचच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी टीका करण्याचा आणि विशेषतः उपरे येऊन आम्हाला शिकविण्याचा माजी मंत्री गिरीश महाजन यांना कुठलाच अधिकारी नाही असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी लगावला आहे.
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या अडीच वर्षात भुजबळांनी कुठली विकास कामे केली असा सवाल उपस्थित केला होता. त्याला सडेतोड परिपूर्ण माहितीसह आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये उत्तर देऊन गिरीश महाजन यांची बोलती बंद केली आहे.
शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरच्या काळात कोरोनाचा प्रसार अधिक वाढल्याने सुमारे सुरवातीची दोन वर्ष ही संपूर्ण कोरोनाच्या सावटाखाली गेली. या कालावधीत नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने प्रयत्न केले. या कालावधीत कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन तसेच मोफत स्वरूपात नागरिकांना धान्य उपलब्ध करून देत दिलासा दिला. कोरोनाचा कालावधी सुरु असतांना सर्वाधिक निधी हा आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्यास शासनाचे प्राधान्य होते. तरी देखील जिल्ह्यातील विकासकामांना मंत्री छगन भुजबळ यांनी ब्रेक लागू दिला नाही. जनतेच्या हिताची अनेक कामे त्यांनी या काळातही मार्गी लावण्यास प्राधान्य दिले.
मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या कालवधीत नाशिक शहरातील गंगापूर मेगा पर्यटन संकुल–बोट क्लब, साहसी क्रीडा संकुल, ग्रेप पार्क रिसॉर्ट ची कामे पूर्ण करून ती सुरु केली. नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था मंजूर करून घेतली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधीची तरतूद करण्यात येऊन कामाला सुरुवात केली. नाशिक जिल्हा न्यायालय नुतन इमारत, नाशिक जिल्हा परिषद नूतन इमारत, वन्यजीव संरक्षण केंद्र -रुग्णालय म्हसरूळ, संदर्भ सेवा रुग्णालय विस्तारीत इमारत, महिला व नवजात शिशु रुग्णालय ही कामे हाती घेतली.नाशिक विमानतळ नियमित प्रवासी सुविधेस प्राधान्य दिले. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविण्यात येऊन जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण बनला.
तसेच नाशिक रोड येथील पाणीपुरवठा विभागाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण – संशोधन केंद्र (मित्रा) सुरु करत महाज्योती विभागीय केंद्र, कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बार्टी, सारथी, महाज्योती च्या धर्तीवर अमृत संस्थेचे मुख्यालय नाशिकमध्ये आणले. कोरोना काळातील यशस्वी नियोजनामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला. तसेच जिल्ह्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेची बळकटी झाली अशी कितीतरी कामे झालेली आहे. याची नोंद देखील नाशिककरांनी घेतली असून त्याबद्दल कौतुक देखील केले आहे. त्यामुळे त्याचा हिशोब देण्याची गरज नाही. मात्र तुम्ही पाच वर्षात कुठले दिवे लावले व विझविले त्याचा हिशोब गिरीश महाजन यांनी नागरिकांना द्यावा अशी बोचरी टीका शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक येथे सुसज्ज असे विमानतळ उभारण्यात आले आहे. नाशिक शहरातील उड्डाणपूल, अंतर्गत व बाह्य रिंगरोडचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यात फोर लेनचे जाळे, त्र्यंबकेश्वर येथील हिरवा चौपदरीकरण मार्ग, बोट क्लब, कलाग्राम, साहसी क्रीडा संकुल, ग्रेप पार्क रिसोर्ट, सप्तश्रृंगी येथील फर्निक्युलर ट्रॉली, मांजरपाडा प्रकल्प यासह अनेक महत्वपूर्ण विकासाची कामे शहर व जिल्ह्यात करण्यात आली. त्यामुळे शहर व जिल्ह्याचा बदलता चेहरामोहरा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी बघितला आहे. मात्र तुमच्या सत्तेच्या कालावधीत नाशिकचे प्रकल्प इतरत्र पळवितांना तसेच अनेक महत्वपूर्ण प्रकल्प रखडविताना नाशिककरांनी बघितले. जनता तुम्हाला त्याचा हिशोब लवकरच देईल. त्यामुळे तुम्ही जनतेला तुम्ही पाच वर्षात काय दिवे लावले याचा हिशोब द्यावा असे सांगत उपरे म्हणून येत आम्हाला शिकवू नका असा टोला त्यांनी गिरीश महाजन यांना लागवला आहे.