नाशिक/सटाणा – नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीवर बागलाण तालुक्यातुन पदाधिकारी म्हणुन काम करत असलेले सर्व जिल्हा पदाधिकारी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे.
माजी आमदार संजय चव्हाण, दिपीका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या उपस्थितीत चर्चा करुन बरखास्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सर्वच जिल्हा पदाधिकारी चांगले काम करण्यासारखे आहेत परंतु समन्वयाच्या अभावामुळे पक्ष संघटनेच्या जिल्हा परिषद गटनिहाय जबाबदार्यांमध्ये काम होताना दिसत नाही त्यामुळे बागलाणचे पक्ष निरीक्षक सुनिल आहेर यांनी तसेच जिल्हाघ्यक्ष यांनी वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यामुळे आपणास कार्यमुक्त का करण्यात येवु नये अशी नोटीस देखील यापुर्वी या जिल्हा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती.
त्यामुळे नविन पुढील निर्णय होईपर्यंत आज पासुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारीणीवर बागलाण तालुक्यातून कोणीही पदाधिकारी नसेल. नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येईल. जुन्या पदाधिकाऱ्यांनी कुठलेही पदे वापरु नये असेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे.