नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे आयोजित समारंभात पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलसंपदा विभाग तसेच नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने (DoWR, RD &GR) अलिकडेच 14 ऑक्टोबर 2024 रोजी पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 साठी संयुक्त विजेत्यांसह एकूण 38 विजेत्यांची घोषणा केली आहे.
यात सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा अथवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग क्षेत्र, सर्वोत्कृष्ट जल वापरकर्ती संघटना, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा अथवा महाविद्यालय वगळून) आणि सर्वोत्कृष्ट नागरी संस्था अशा एकूण 9 वर्गवारी अंतर्गतच्या विजेत्यांचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट राज्याच्या वर्गवारीत ओडिशा या राज्याला पहिल्या क्रमांकाचा, उत्तर प्रदेशाने दुसऱ्या क्रमांकाचा तर तिसऱ्या क्रमांकासाठी गुजरात आणि पुद्दुचेरीला संयुक्त पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येक पारितोषिक विजेत्याला प्रशस्तीपत्र आणि चषक प्रदान केला जाणार आहे. यासोबतच काही विशिष्ट वर्गवारींकरता रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर जल व्यवस्थापन आणि जल संधारणाविषयी जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीमा राबवल्या जात आहेत.
नागरिकांनी पाण्याच्या वापर करण्यासंबंधीच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करावा या हेतूने तसेच त्या बाबत लोकांमध्ये जागृती करता यावी या हेतूने जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलसंपदा विभाग तसेच नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांनी (DoWR, RD &GR) 2018 साली पहिल्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराला सुरुवात केली होती. त्यानंतर 2019, 2020 आणि 2022 या वर्षांसाठी क्रमाने दुसरे, तिसरे आणि चौथे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केले गेले होते. तर 2021 साली कोविड महामारीचा प्रभाव असल्यामुळे त्या वर्षी हे पुरस्कार दिले गेले नव्हते.
केंद्र सरकारने ‘जल समृद्ध भारत’चे उद्दिष्ट समोर ठेवले आहे हे उद्दिष्ट साकार करण्याच्या अनुषंगाने देशभरातील व्यक्ती आणि संघटनांनी केलेली उत्कृष्ट कामे आणि प्रयत्नांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जल पुरस्कार (NWAs) प्रदान केले जातात. या पुरस्कारांच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देता यावे तसेच त्यांना पाणी वापराच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याकरता प्रवृत्त करता यावे या उद्देशानेच हे पुरस्कार दिले जात आहे.