विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आतापर्यंत उचलण्यात आलेली पावले परिणामकारक दिसत नाहीये. दररोज रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता कठोर लॉकडाउन लावण्याचाच मार्ग उरला आहे का? कठोर लॉकडाउन लावल्याशिवाय परिस्थिती सुधरणार नाही, हेच मत दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांचे सुद्धा आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच कठोर लॉकडाउन करणे आवश्यक आहे, असे रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. देशातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादेपर्यंत कोरोना विषाणू पोहोचला आहे. त्यामुळे १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर पोहोचलेल्या भागात कठोर लॉकडाउनच हवा, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्यात लावण्यात आलेली संचारबंदी आणि वीकेंड लॉकडाउन अधिक परिणामकारक सिद्ध होत नाहीयेत. तसेच दिल्लीमध्ये एका डॉक्टचा मृत्यू हा त्यांच्यासाठी व्यक्तिगत धक्का असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे.
देशात सलग वाढणार्या रुग्णसंख्येमुळे अशा घटना घडत आहेत. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अधिक आक्रमकरित्या काम करावे लागणार आहे. जगभरातील कोणतीच आरोग्य यंत्रणा अशा प्रकारचा भार उचलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कठोर प्रतिबंधात्मक क्षेत्र अथवा कठोर लॉकडाउन लावणे आवश्यक आहे, असे गुलेरिया म्हणाले.