मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या कामकाजातील अनियमितता उघड झाली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने १९० पानांचा आदेश जारी केला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही स्वतंत्र संस्था नाही आणि ती सेबीच्या कक्षेत येते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे एक तांत्रिक पॉवरहाऊस आहे आणि ७० टक्के ऑपरेटिंग मार्जिन आणि भारताच्या भांडवली बाजारावर मक्तेदारी असलेले जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. अशा संस्थांना ‘राम भरोसे’ राहण्याची वेळ येणे खेदाचे आहे, असे सेबीने म्हटले आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्णा चेष्टेचा विषय बनल्या आहेत. सेबीने जारी केलेल्या आदेशात रामकृष्ण यांनी एका अज्ञात योगीसोबत ईमेलद्वारे कशाप्रकारे गुपित बाबींची देवाणघेवाण कशी केली याचे वर्णन केले आहे. अध्यात्मिक गुरुंचा भेटी, भविष्यातील योजना आणि एक्सचेंजच्या कामकाजाच्या इतर अनेक पैलूंवर संबंधित बाबांकडून सल्ला घेण्यात येत होता. २०१२मध्ये एक्सचेंजमध्ये सीओओ आनंद सुब्रमण्यम यांना या क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांना गलेलठ्ठ पगाराची देण्यात आला, त्याचीही चर्चा आहे. रामकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल स्टॉक एक्सचेंजने घेतलेले अनेक निर्णय आणि कृती आज शंकास्पद, पक्षपाती, पूर्वग्रहदूषित आणि चुकीच्या मानल्या जाऊ शकतात. सेबीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व बाबींची रितसर चौकशी त्यामुळेच होणार आहे.
या प्रकरणामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे काही निवडक लोकंच चालवत होते का, जे एकमेकांशी संबंधित होते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक मापदंड हे फक्त सांगण्यासारखे झाले असल्याची खंतही या प्रकरणात संबंधित चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर, कॉर्पोरेट क्षेत्रात व्हिसल ब्लोअर पॉलिसी अस्तित्वात असते, परंतु फार कमी लोक ही पॉलिसी वापरतात. कारण – सीईओ विरुद्ध वाद घालणे किंवा तक्रार करणे हा एखाद्याचा व्यावसायिक मृत्यू आहे. रामकृष्ण यांच्या प्रकरणातही तशीच परिस्थिती दिसत असल्याचं नियमकांनी म्हणलं आहे. त्यामुळेच लोकांना माहित असलं तरी समोर येऊन कोणी बोलत नाही. येस बँक (राणा कपूर), आयसीआयसीआय बँक (चंदा कोचर), एनएसई (चित्रा रामकृष्ण) यांसारख्या उच्च कार्यालयांमध्ये घोटाळे होण्यावरुन तरी तसेच दिसते. सरकारी कार्यालयांमध्ये जबाबदारीने वागण्याची प्रवृत्ती हळूहळू नाहीशी होत असल्याचेही चौकशी अधिकाऱ्यांनी म्हणले आहे.