नवी दिल्ली – देशातील प्रत्येक तीन पैकी दोन व्यक्तींमध्ये ‘अँटीबॉडीज ऑफ कोरोना ‘ म्हणजेच कोरोनाची अँटीबॉडीज तयार झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या (आयसीएमआर) चौथ्या सिरो सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
सिरो सर्वेक्षणानुसार, देशातील सुमारे ६६ टक्के लोकांना कोरोनाचा धोका नाही. परंतु अद्याप देशात सुमारे ४० कोटी म्हणजे ३३ टक्के लोक असे आहेत की, त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अॅन्टीबॉडीज सापडलेल्या नाहीत, त्यामुळे या लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका आहे. ही स्थिती लक्षात घेता, या लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि कोरोनापासून प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले गेले आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, चौथे राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण जून-जुलैमध्ये 70 जिल्ह्यांमध्ये करण्यात आले. त्यात १ ते १७ ते वर्षांच्या मुलांचादेखील समावेश होता. ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा अॅन्टीबॉडीज आढळला. देशातील दोन तृतीयांश लोकसंख्या सार्स-कोव्ह २ किंवा कोवीडमध्ये संक्रमित झाली आहे. सुमारे ७० टक्के लोकसंख्येमध्ये अॅन्टीबॉडीज तयार झाल्यानंतर, संसर्गाविरूद्ध समाजात समूहातून प्रतिकारशक्ती विकसित होते.
सध्या देशात समूहातून प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु देशातील मोठ्या लोकसंख्येच्या दृष्टीने असा दावा करणे आयसीएमआर टाळत आहे. डॉ. भार्गव म्हणाले की, लोकसंख्येच्या दोन-तृतियांश भागात अॅन्टीबॉडीज तयार होत असूनही, अद्यापही मोठ्या संख्येने असलेले लोक सहजपणे कोरोना संसर्गाचे बळी बनू शकतात आणि तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरू शकतात. देशात अशा लोकांची संख्या सुमारे 40 कोटी आहे.
एनआयटीआय आयोगाचे सदस्य आणि कोरोना लसीकरणावरील टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के.पॉल म्हणाले की, येत्या काही दिवसांत लशीकरणाची गती आणखी वाढविण्यात येईल. प्रत्येकाला ही लस मिळेपर्यंत प्रत्येकाने कोरोनावर योग्य उपचार करून तिसरी लाट थांबवावी लागेल. दरम्यान, चौथे सेरो सर्व्हेक्षण त्याच २१ राज्यांतील ७० जिल्ह्यांमध्ये करण्यात आले होते. यापूर्वी तीन सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते.
डॉ. भार्गव म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये संक्रमणाची स्थिती वेगळी आहे. म्हणूनच राज्यांना कोरोना संसर्गाची नेमकी स्थिती शोधण्यासाठी स्थानिक पातळीवर सेरो सर्वेक्षण करण्याचे व त्यानुसार नियंत्रित करण्याचे धोरण आखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व जिल्हा रूग्णालयात सर्दी आणि फ्लूच्या रूग्णांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्याचे त्या राज्यांना सांगण्यात आले आहे, त्यामुळे सुरुवातीलाच कोरोना संसर्ग थांबविता येईल.