नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद – 2024 च्या दुसऱ्या दिवसाची बैठक झाली.
या परिषदेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादविरोधी प्रयत्नांना चालना देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय एजन्सींसोबत सहकार्य करणे आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी क्षमता वाढविण्यासह सविस्तर धोरण प्रस्तावित केले. दहशतवादविरोधी संरचना मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्यात सहकार्य आणि समन्वय वाढवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवादविरोधी प्रयत्नांमध्ये यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन 2047 पर्यंत समृद्ध, सशक्त आणि विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन आपल्या समारोपाच्या भाषणात, अमित शाह यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना केले.