इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘अग्निपथ’ योजनेला देशभरात विरोध होत असताना, केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजपचे नेते सातत्याने त्याच्या फायद्यांविषयी बोलत आहेत. मात्र तरीही देशाच्या सुरक्षेशी निगडीत अग्निपथ योजनेवर अजूनही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेषत: अग्निवीरांची सैन्यात भरती आणि केवळ चार वर्षांचे प्रशिक्षण यामुळे त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
अग्निपथ योजनेमुळे देशभरात मोठी हिंसा बघायला मिळाली. एएनआय या वृत्तसंस्थेने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी देशाची सुरक्षा धोरणे आणि अग्निपथ योजनेच्या उपयुक्ततेबद्दल संवाद साधला. ‘अग्निपथ’ ही केवळ एक योजना नसून ती भविष्याच्या दृष्टीने आणण्यात आली असून देशासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, “काल आपण जे करत होतो, तेच भविष्यात करत राहिलो तर आपण सुरक्षित राहूच असे नाही.
उद्याची तयारी करायची असेल तर बदलावे लागेल. कारण भारतात आजूबाजूचे वातावरणही वेगाने बदलत आहे. अशावेळी अग्निपथसारख्या योजना महत्त्वाच्या ठरु शकतात. यात दोन प्रकारची प्रात्यक्षिके दिली जाणार आहेत. ज्यांना देशाच्या सुरक्षेची काळजी आहे ते निश्चितच या योजनेचा भाग होतील. त्यांना राष्ट्राशी काही देणेघेणे नाही, ज्यांना राष्ट्राच्या सुरक्षेची पर्वा नाही त्यांनाच समाजात फक्त संघर्ष निर्माण करायचा आहे. ते गाड्या जाळतात, दगडफेक करतात, निषेध करतात. लोकांची दिशाभूल करणे हाच या लोकांचा उद्देश आहे.”
गेल्या आठ वर्षांत अनेक संरचनात्मक सुधारणा झाल्या आहेत. सीडीएसचा प्रश्न २५ वर्षांपासून प्रलंबित होता. राजकीय इच्छाशक्तीअभावी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आज आपल्या संरक्षण संस्थेची स्वतःची स्वतंत्र एजन्सी आहे. आज भारतात बनवलेल्या AK-203 सोबत नवीन असॉल्ट रायफल सैन्यात सामील करण्यात येत आहे. ही जगातील सर्वोत्तम असॉल्ट रायफल आहे. लष्करी उपकरणांमध्ये बरीच प्रगती होत आहे, असेही ते म्हणाले.
एकटा अग्निवीर कधीच संपूर्ण सैन्य नसतो. अग्निवीर फक्त पहिल्या चार वर्षात भरती झालेला सैनिक असेल. उर्वरित सैन्याचा मोठा भाग अनुभवी पुरुषांचा असेल. जे अग्निवीर नियमित असतील त्यांना पुढील प्रशिक्षण दिले जाईल.
सीमाभागावरून आपला चीनशी बराच काळ वाद सुरू आहे. भारत कोणत्याही प्रकारचे उल्लंघन खपवून घेणार नाही, हे चीनला स्पष्ट केले आहे. चर्चेद्वारे ते सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आमच्या सीमेचे पूर्णपणे संरक्षण करत आहोत. जर आपल्याला आपले हित जपायचे असेल तर आपण कधी, कोणासोबत, कोणत्या आधारावर शांतता प्रस्थापित करायची हे ठरवायला हवं. पाकिस्तानसह आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत पण दहशतवाद आपण खपवून घेणार नाही.
दहशतवाद ही एक समस्या आहे ज्याचा प्रभावीपणे सामना आपल्याला करायचा आहे. २०१९पासून काश्मीरमधील लोकांच्या विचारसरणीत बदल झाला आहे, ते आता पाकिस्तान आणि दहशतवादाच्या बाजूने राहिलेले नाहीत. मात्र, आपल्याला सगळ्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी तयारी करावी लागेल. त्यासाठी अगिनपथसारख्या योजना महत्त्वाच्या आहेत.
national security advisor ajit doval on agnipath agneepath scheme