पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – दरवर्षी भारतात 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञानाशी संबंधित स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टीकोन’ आहे. याच दिवशी प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी रमण इफेक्टची घोषणा केली होती. ज्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
विशेष म्हणजे यानंतर, सी.व्ही. रमण यांनी रमन इफेक्टचा शोध लावल्याबद्दल 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर करण्यात आले. तसेच शिक्षण, कौशल्ये आणि कामावर प्रभाव ही या वर्षीची थीम आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाची सुरुवात सीव्ही रमण यांच्या कर्तृत्वाने झाली, त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सीव्ही रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण होते. त्यांचा जन्म दि. 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिलापल्ली, तमिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे व्याख्याते होते. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश नागरिकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि समाजात जागरूकता आणणे हा आहे. या दिवशी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. इतकेच नाही तर भारत सरकार शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी सन्मानित करते. त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रात तरुण आणि विद्यार्थी पुढे येतात, यासाठी अनेक प्रकारच्या आणि अनेक पातळ्यांवर पुढाकार घेतला जातो.
रमण यांनी विशाखापट्टणम येथील सेंट अलॉयसियस अँग्लो-इंडियन हायस्कूल आणि मद्रासमधील तत्कालीन प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी 1907 मध्ये एमएससी पूर्ण केले. त्यांना मद्रास विद्यापीठात भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळाले. सन 1907 ते 1933 दरम्यान त्यांनी कोलकाता येथील इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्समध्ये काम केले. यादरम्यान त्यांनी भौतिकशास्त्राशी संबंधित अनेक विषयांवर विस्तृत संशोधन केले. रमण प्रभावानुसार, जेव्हा रेणू प्रकाशाच्या किरणांना विचलित करतात तेव्हा प्रकाशाची तरंगलांबी बदलते. जेव्हा एकरंगी प्रकाश द्रव आणि घन पदार्थांमधून जातो तेव्हा घटना प्रकाशासह, अत्यंत कमी तीव्रतेच्या इतर काही रंगांचा प्रकाश दिसतो. चंद्रशेखर वेंकटरमण यांना त्यांच्या शोधासाठी 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. या थोर भारतीय शास्त्रज्ञाचा सर्वांना अभिमान वाटायला हवा तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रेमी होऊन विज्ञान संबंधी संशोधन करायला हवे, तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल.