नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 79 व्या फेरीच्या क्षेत्र कामास जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली आहे. या पाहणीच्या अनुषंगाने आपल्या कुटुंबास भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यास अचूक व आवश्यक ती संपूर्ण माहिती देऊन राष्ट्रीय कामास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या कक्षेत येणाऱ्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी जुलै २०२२ ते जून, २०२३ असा असणार आहे. हा कालावधी प्रत्येकी ३ महिन्यांच्या ४ उप फेऱ्यांमध्ये विभागलेला असून हे सर्वेक्षण नागरी आणि ग्रामीण भागात सुरू झाले आहे. राज्यात ५१६ ग्रामीण व ९१२ नागरी वस्ती समुह घटकांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. यापैकी नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात २० आणि नागरी भागात ३६ वस्ती समूहांची निवड करण्यात आली आहे.
या पाहणी अंतर्गत जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षेत्र काम सुरू झाले असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे कर्मचारी माहिती संकलनासाठी त्यांना निवडून दिलेल्या वस्ती समूहास (नागरी किंवा ग्रामीण) प्रत्येक कुटुंबांस प्रत्यक्ष भेट देऊन प्राथमिक माहिती प्रश्नावलीच्या आधारे नोंदवून घेणार आहे. त्यानंतर त्या वस्तीतील अथवा नागरी समूहातील निवडक कुटुंबाची अधिकची माहिती संकलित करणार आहे. हे राष्ट्रीय महत्वाचे काम असल्याने सर्व क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पोलीस पाटील, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी व स्थानिक कर्मचारी यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असेही जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रकाश पोळ यांनी सूचित केले आहे.
राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 79 व्या फेरीचा विषय शाश्वत विकास ध्येयाशी निगडित सर्वेक्षण आणि आयुष उपचार पद्धतींचे अवलंबन व माहिती अशा दोन भागात विभागण्यात आला आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आणि देशाने स्वीकारलेल्या १७ शाश्वत विकास ध्येयांशी निगडित असणाऱ्या विविध निर्देशांकाची माहिती संकलित करणे, हा या फेरीचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पोळ यांनी सांगितले आहे.
संकलित केलेल्या माहितीचा उपयोग राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील जनकल्याणाचे विविध निर्णय घेणे, धोरण ठरविणे, प्रचलित धोरणात योग्य ते बदल करणे आणि योजना तयार करणे किंवा सुधारित करणे इत्यादी कामांसाठी हे निष्कर्ष फार उपयुक्त असून त्या आधारे वरील कामे शासन स्तरावर करण्यात येतात. त्यामुळे या माहितीत अचुकता, वस्तुनिष्ठता व सत्यता यांना उच्च दर्जाचे महत्व आहे. संकलित केलेली माहिती कोणत्याही स्तरावर परस्पर प्रसिद्ध करण्यात येत नसून त्या माहितीच्या आधारे केवळ वरील परिच्छेदातील विषयांनुसार एकत्रित स्वरूपाचा अहवाल तयार करण्यासाठी मुख्य कार्यालयास सादर करण्यात येते. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ०२५३-२९५२५४६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] किंवा [email protected] येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पोळ यांनी कळविले आहे.
याबाबींचा सर्वेक्षणात असणार समावेश…
लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या विषयांतर्गत पिण्याचे सुरक्षित व शुद्ध पाणी, स्वच्छतेच्या सुविधांचा वापर व स्वच्छतेच्या सवयींचा अंगिकार मोबाईल फोन व संगणक असणाऱ्या पुरुष व महिलांचे प्रमाण, वैयक्तिक इंटरनेट सुविधा वापरकर्त्यांचे प्रमाण, बँक खाते असले प्रौढ व्यक्ती व महिलांचे प्रमाण, ५ वर्षाच्या आतील बालकांच्या जन्मनोंदणीचे प्रमाण, १ किंवा ½ किमी च्या आत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध असणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण, प्रौढ व्यक्ती व युवक यांचा शैक्षणिक सहभाग, मागील वर्षभरात कुटुंबातील व्यक्तींवर केलेला वैद्यकीय खर्च इत्यादी प्रमुख निर्देशकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
आयुष उपचार प्रणालीची माहिती संकलित करतांना आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग, निसर्गोपचार, होमिओपॅथी इत्यादी भारतीय पारंपारिक उपचारपद्धतींचा उपचार घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण तसेच या उपचार पद्धतीविषयी तोंडओळख किंवा माहिती असलेल्या कुटुंबांचे प्रमाण ही माहिती प्रामुख्याने संकलित करण्यात येणार आहे. या अंतर्गत, आयुष उपाचारावर केलेला खर्च, आयुष उपचारपद्धती अंतर्गत दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे प्रमाण, बाळाच्या जन्मापूर्वी आणि नवजात शिशु यांच्यासाठी आयुष उपचारपद्धतीचा वापर या माहितीचा समावेश असणार आहे. यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने माहितीचे विहित नमुने उपलब्ध केलेले आहेत.
National Sample Survey Started information Door to Door