नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकीय पक्षांचा राष्ट्रीय दर्जा सध्या देशात चर्चेसाठी ट्रेंडिंग विषय आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्थापन केलेेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्थापन केलेला तृणमूल कॉंग्रेस पक्ष या दोघांचाही राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यामुळे दर्जा मिळविण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी काय निकष असतात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवून दिले आहेत. या निकषांची पूर्तता झाल्यानंतर किंवा निकष पूर्ण होत नसतील तेव्हा, वेळोवेळी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो किंवा काढून घेतला जातो. हे परिस्थितीनुसार ठरवले जाते. राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने २०१९ साली दिलेल्या निर्देशांनुसार, ज्या पक्षाची चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये अधिकृत नोंदणी आहे तो राष्ट्रीय पक्ष. किंवा चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांतून शेवटच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अशा पक्षाच्या उमेदवारांनी कमीत कमी ६ टक्के वैध मते मिळवलेली असावीत.
तसेच शेवटच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे किमान चार खासदार निवडून आलेले असावेत. किंवा जर तीन राज्यांत (त्यापेक्षा कमी नाही) लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा जिंकल्या तर राष्ट्रीय दर्जा मिळतो. आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दर्जा का काढून घेतला गेला, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १० जून १९९९ रोजी झालेली आहे. त्यानंतर काही महिन्यांतच १० जानेवारी २००० रोजी त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा दर्जा कायम होता. मात्र त्यानंतर निकषांची पूर्तता होत नसल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालॅण्ड या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व कमी झालेले आहे. त्यामुळे दर्जा गमवावा लागण्याची शक्यता आहे.
आपला कसा मिळाला दर्जा?
आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मते घेऊन बहुमताच्या आधारावर विजय मिळवलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांना ६.७७ टक्के मतदान मिळाले होते. तसेच गुजरात राज्यात गेल्या वेळी निवडणूक लढवून चौथ्या राज्यात देखील अधिकृत पक्षाचा दर्जा आम आदमी पार्टीने मिळवला होता. दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरात राज्यांत मतदान मिळवण्याचे निकष पूर्ण केल्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
कुणाचे काय झाले?
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीडीए (मणिपूर), पीएमके (पुद्दुचेरी), राष्ट्रीय समाज पार्टी (पश्चिम बंगाल) आणि एमपीसी (मिझोराम) या पक्षांचा राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. भाजपा, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आता आम आदमी पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे.
National Party Status Election Commission NCP TMC Rule