मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) च्या अखत्यारितील भारतीय चित्रपट राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय (एनएमआयसी) ने आज गुलशन महल इथे आपल्या नव्या अत्याधुनिक नॅरोकॅस्टर्स ऑडिओ गाईड अर्थात श्राव्य मार्गदर्शिकेचे उद्घाटन केले. या नव्या उपक्रमामुळे वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना स्वयंपथदर्शी पद्धतीने समरसून भारतीय चित्रपटाचा इतिहास अनुभवता येणार आहे.
उद्घाटन सोहळ्यात एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यांच्यासह मुख्य अतिथी अनुप सोनी, विशेष अतिथी श्रुति प्रकाश, नॅरोकॅस्टर्सच्या प्रतिनिधी ख्रिस्टिन शर्मा आणि एनएमआयसीचे उपमहाव्यवस्थापक सत्यजीत मांडले उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर डी. रामकृष्णन यांच्या हस्ते पाहुण्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे यजमानपद एनएमआयसीच्या व्यवस्थापक जयिता घोष यांनी भूषविले.
अनुप सोनी यांनी आपल्या भाषणात त्यांना चित्रपटाविषयी असलेल्या आंत्यतिक प्रेमाबद्दल व्यक्त होत श्रोतृवर्गाचे मन गुंतवून ठेवले. या माध्यमाची जादू, लोकांना जोडून घेण्याची क्षमता आणि कालातील कथाकथनाचा स्वभाव याविषयी ते बोलले. “सौ साल पहले हमे तुम से प्यार था… और कल भी रहेगा” या गाण्याचा उल्लेख करून आपले आणि पिढ्यान्-पिढ्यांचे चित्रपट प्रेम व्यक्त करत समारंभात त्यांनी रंगत आणली. श्रुति प्रकाश यांनी बालपणीच्या आठवणीतील ‘वॉकमन’चा उल्लेख करून अत्याधुनिक श्राव्य मार्गदर्शिकेच्या अनुभवाशी त्याचे साम्य असल्याचे सांगितले. या नव्या सुविधेमुळे वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या अनुभवाचा आनंद वाढेल, असे सांगून तिने उत्साह व्यक्त केला. डी. रामकृष्णन यांनी श्राव्य मार्गदर्शिकेचे महत्त्व सांगताना त्यामुळे वस्तुसंग्रहालयातील विविध मांडण्यांविषयी सखोल माहिती प्रेक्षकांना घेता येईल, भारतीय चित्रपटाचा इतिहास जिवंत झाल्याचा अनुभव मिळेल, असे म्हटले. एनएमआयसी-एनएफडीसी वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांचा अनुभव नॅरोकॅस्टर्स ऑडिओ गाईडसारखे उपक्रम, नव्या तंत्रज्ञानामार्फत अधिक आनंददायी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नॅरोकॅस्टर्स ऑडिओ गाईडच्या फलकाचे औपचारिक अनावरण हा कार्यक्रमाचा चित्तवेधक भाग ठरला. अनुप सोनी, श्रुति प्रकाश, डी. रामकृष्णन, सत्यजित मांडले आणि ख्रिस्टिन शर्मा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जयिता घोष यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा उपक्रम साकारणाऱ्या नॅरोकॅस्टर्सच्या चमूसह एनएमआयसीचे कर्मचारी आणि सर्व भागीदारांचे त्यांनी आभार मानले. ही श्राव्य मार्गदर्शिका भारतीय चित्रपटाचा इतिहास अनुभवण्यासाठी उपलब्ध असून अधिक माहिती आणि भेट देण्यास इच्छुकांनी संकेतस्थळावर संपर्क साधावा – https://nmicindia.com/
भारतीय चित्रपट राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाविषयी –
भारतीय चित्रपट राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय भारतीय चित्रपटाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातील दुवा आहे. आपल्या चित्रपटांप्रमाणे हे वस्तुसंग्रहालयही भारतीय चित्रपटाचा इतिहासाचा मनोरंजक प्रसार करण्याचे माध्यम आहे. वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना इथे भारतीय चित्रपटाच्या जगाच्या भूतकाळात रमता येते आणि या जगताचा परिपूर्ण अनुभव घेता येतो.