मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी रुग्णालयांमध्ये खूप काम असतं, हे सर्वांनाच ठावूक आहे. पण त्याप्रमाणात डॉक्टरांची संख्याही खूप असते. पण पगारही चांगले असतात. त्याउलट हॉटेलसारखी ट्रीटमेंट देणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कितीही असली तरीही त्यांचे पगार मात्र सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत नक्कीच कमी आहेत. हीच ओरड खुद्द डॉक्टरांनी सर्वेक्षणातून केली आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने खासगी रुग्णालयातील पदवीधर व पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना किती पगार मिळतो, याचे सर्वेक्षण केले होते. यात ही बाब उघडकीस आली आहे. सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना जेवढा पगार मिळतो, तेवढा आम्हाला मिळत नाही. उलट मिळालेले विद्यावेतनही महाविद्यालय प्रशासनाकडून काढून घेतले जाते, असा गंभीर आरोप या सर्वेक्षणात करण्यात आला.
महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात विद्यावेतन मिळण्यावरून नेहमीच निवासी डॉक्टरांचे संप होताना दिसतात. पण तरीही देशभरात खासगी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मिळणाऱ्या विद्यावेतनात मोठा फरक आहे. मात्र सर्वेक्षणानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या बाबतीत गंभीर दखल घेतली असून आता खासगी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनाही सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणेच विद्यावेतन द्यावे लागेल. जे खासगी रुग्णालय या नियमांची पायमल्ली करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट म्हटले आहे. यासंदर्भातील आदेश आयोगाने अलीकडेच काढले.
दहा हजार डॉक्टरांचा सहभाग
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील एकूण १० हजार १७८ डॉक्टरांनी सहभाग घेतला. त्यात ७ हजार ९०१ डॉक्टर खासगी रुग्णालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टर आहेत. त्यांनी वेतनाच्या संदर्भातील तफावत अत्यंत संतापजनक असल्याची बाब सर्वेक्षणाला उत्तर देताना मांडली आहे.
National Medical Commission Private Hospital Doctor Survey Report
Salary Resident College Tuition Fees