नवी दिल्ली – महामार्गांवर असलेले टोल नाके हे वाहनधारकांचे खिसे रिकामे करण्यासाठी आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आता फास्ट टॅगची अंमलबजावणी सुरू आहे. पूर्वी दिवसातून एकदाच टोल आकारला जायचा. आता प्रत्येकवेळी पैसे द्यावे लागत असल्याने ही बाब नियमित वाहतूकधारांची आर्थिक लूट करणारी ठरत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोल प्लाझावर नागरिकांचे खिसे रिकामे करण्याची पूर्ण व्यवस्था करून ठेवल्याचा आरोप केला जात आहे. टोल प्लाझावरून तुमचे वाहन जितक्या वेळेला जाईल, तितक्या वेळा तुमच्या खात्यातून पैसे कापले जाणार आहेत. पहिल्यांदा टोल प्लाझा पार करताना पूर्ण टोल कर कापला जाईल. परत येताना निम्मा कर कापला जाईल. त्याच दिवशी तुम्ही पुन्हा टोल प्लाझावरून गेला तर तुमच्या खात्यातून पुन्हा पूर्ण कर कपात होईल. आधीच्या अप-डाउनच्या पावतीवर २४ तासांसाठी टोल फ्री होत असे. फास्टटॅग लावल्यानंतर अप-डाउनची व्यवस्था संपली आहे. आता प्रत्येक वेळी टोल प्लाझा पार केल्यानंतर पैसे कापले जाणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल प्लाझावर फास्टटॅग अनिवार्य केले आहे. फासस्टॅग नसलेल्या वाहनांसाठी वेगळी रांग असते. अशा वाहनधारकांकडून दंडाच्या रकमेसह दुप्पट कर वसूल केला जातो. फास्टटॅग अनिवार्य झाल्याने टोल प्लाझावर अप-डाउन टोल वसुली व्यवस्था बंद झाली आहे. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा टोल प्लाझा पार करणार्या वाहनधारकांच्या खिशाला झळ बसत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पंजाबच्या लुधियाना येथील लाडोवाल टोल प्लाझा सुरू होऊ शकला नाही. परंतु येथे सुद्धा २४ तासांच्या पावतीची व्यवस्था बंद झाली आहे. या टोल प्लाझावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला प्रत्येक वेळी टोल द्यावा लागणार आहे.
शेतकऱ्यांचा विरोध
शेतकऱ्यांकडून २४ तासांची पावती बंद झाल्याला विरोध सुरू झाला आहे. टोल प्लाझाच्या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना भेटून विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांनी टोल प्लाझा बंद केला आहे. २४ तासांची पावती जोपर्यंत सुरू केली जाणार नाही. तोपर्यंत टोल प्लाझा सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रत्येक वेळी टोल द्यावा लागेल हे सामान्य नागरिकांना ठाऊकच नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.