विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात देशभरात अनेक लोकांचे उद्योग व्यवसाय गेले. काही लोकांच्या नोकर्या गेल्या त्यातच बेरोजगारांना हाताला काम नाही. त्यामुळे देशभरात गुन्हेगारी मध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सहाजिकच २०१९ च्या तुलनेत कोरोनामुळे प्रभावित झालेल्या वर्ष २०२० मध्ये गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये २८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतही माहिती देण्यात आली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, सन २०२० मध्ये देशात दररोज सरासरी ८० हत्या झाल्या आणि एकूण २९,१९३ लोकांची हत्या झाली. या प्रकरणात उत्तर प्रदेश राज्य या यादीत आघाडीवर आहे. त्याचबरोबर अपहरणाच्या सर्वाधिक घटनाही उत्तर प्रदेशातच घडल्या. वर्ष २०२० मध्ये एकूण सुमारे ६६ लाख वेगवेगळे गुन्हे नोंदवले गेले आहेत. एनसीआरबीची आकडेवारी दर्शवते की, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपहरणाच्या घटनांमध्ये १९ टक्के घट झाली आहे. देशात अपहरणाच्या प्रकरणांमध्ये ८८,५९० बळी पडले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यापैकी बहुतेक ६० टक्के लहान मुले होती. या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये उत्तर प्रदेशात खुनाचे ३,७७९ गुन्हे दाखल झाले. यानंतर बिहारमध्ये ३,१५० तर महाराष्ट्रात २,१६३ तसेच मध्य प्रदेशात २, १०१ आणि पश्चिम बंगालमध्ये १,९४८ खून झाले. २०२०मध्ये दिल्लीमध्ये खुनाचे ४७२ गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी, कोविड -१९ मुळे राष्ट्रीय राजधानीसह संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. तरीही गुन्हेगारी वाढली.
राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्कार
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये देशभरात दररोज सरासरी ७७ बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले. गेल्या वर्षी बलात्काराचे एकूण २८,०४६ गुन्हे नोंदवण्यात आले होते. देशात सर्वाधिक अशी प्रकरणे राजस्थानमध्ये आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात नोंदली गेली आहेत.