नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने उच्च शिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 21 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी निवड केली आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई येथील शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नीलाक्षी जैन आणि बारामती येथील एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजीनियरिंग महाविद्यालयातील पुरुषोत्तम पवार यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये हे नमूद केले आहे की प्रेरित, उत्साही आणि सक्षम प्राध्यापक हे विद्यार्थी, संस्था आणि या पेशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षण परिसंस्थेत उत्कृष्टतेची संस्कृती जोपासण्यासाठी पुरस्कार आणि सन्मान यासारख्या प्रोत्साहनांची तरतूद देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. याच दृष्टीने, उच्च शिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनसाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या छत्राखाली दोन श्रेणीतील पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेण्यात आला. आजवर हा पुरस्कार केवळ शालेय शिक्षकांपूरता मर्यादित होता.
उच्च शिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील आदर्श शिक्षकांना खालील श्रेणींनुसार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो:
श्रेणी 1: उच्च शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक:
उप-श्रेणी (i) : अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वास्तुकला.
उप-श्रेणी (ii) : गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र यासह शुद्ध विज्ञान
उप-श्रेणी (iii) : कला आणि सामाजिक विज्ञान, मानव्य, भाषा, विधीशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन.
श्रेणी 2: तंत्रनिकेतन संस्थांमधील शिक्षक: एकूण 10 पुरस्कार
2025 वर्षासाठी निवड झालेले 21 शिक्षक तंत्रनिकेतन, राज्य विद्यापीठे आणि केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील आहेत.
निवड प्रक्रियेत शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन अध्यापन शिक्षण परिणामकारकता, समाजाभिमुख उपक्रम, संशोधन आणि नवोन्मेष, प्रायोजित संशोधन आणि प्राध्यापक विकास कार्यक्रम तसेच सल्लागार अध्यापन यासारख्या निकषांनुसार करण्यात आले. यापैकी, शिक्षण परिणामकारकता आणि समाजाभिमुख उपक्रम या निकषांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठीच्या निवड प्रक्रियेत दोन टप्पे समाविष्ट आहेत;
(i) नामांकित व्यक्तींची प्रारंभिक निवड करण्यासाठी प्राथमिक शोध आणि छाननी समितीद्वारे मूल्यांकन आणि
(ii) राष्ट्रीय ज्युरीद्वारे निवडलेल्या नामांकित व्यक्तींमधून पुरस्कार विजेत्यांची निवड.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी नामांकने ऑनलाइन पद्धतीने @www.awards.gov.in वर मागवण्यात आली होती. यात स्व-नामनिर्देशन, संस्थात्मक नामनिर्देशन आणि सहकर्मी नामनिर्देशक या जनभागीदारीच्या तरतुदी समाविष्ट होत्या.