नाशिक – समाजातील डॉक्टर आणि रुग्ण हे विश्वासावर आधारित अस एक महत्त्वाच नातं आहे. गेल्या काही वर्षांपासून या नात्यात एक प्रकारचा तांत्रिकपणा आला आहे. या नात्यात सलोखा निर्माण होण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न अपेक्षित आहेत. पेशंटच्या मनात अनेक प्रश्न असतात. म्हणून डॉक्टरांनी पेशंटशी कनेक्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्यात सुसंवाद महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर पेशंटने सुद्धा डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. तरच या नात्यातला सलोखा टिकून राहील असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.
आयएमए या संस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांसाठी असलेली एक संस्था आहे. १९२८ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यावेळी भारतात अस्थिरता होती आणि कलकत्याच्या काही डॉक्टरांना असे वाटले की डॉक्टर कम्युनिटीच्या प्रश्नांसाठी आणि सेवा करण्यासाठी एकत्र यावं अस त्यांना वाटलं, त्यातून ही संस्था जन्माला आली. त्यानंतर १९५८ साली नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनची स्थापना झाली. डॉ राजश्री पाटील या नाशिक आयएमएच्या ६४व्या आणि ४थ्या महिला अध्यक्षा आहेत, त्याविषयी त्या म्हणाल्या की, एक स्त्री डॉक्टर होते यात आता नावीन्य राहिले नाही म्हणजे महिला डॉक्टर हे एक समीकरण झाले आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात बघा सुशिक्षित महिला दिसतात. पण उच्चपातळीवर जाताना त्या एक पाऊल नेहमी मागे येतात. पण आता डॉ. निवेदिता पवार यांच्यानंतर १० वर्षानी पुन्हा एकदा महिला अध्यक्षा आहे त्यामुळे माझ्यासाठी एक पर्वणी आहे असे त्या म्हणाल्या.
नवीन वर्षातील योजनांबाबत त्यांनी सांगितले की, या संस्थेचा मूळ उद्देशच डॉक्टरांच्या सामाजिक, शैक्षणिक समस्या सोडवणे हा आहे. डॉक्टर म्हणून समाजाप्रती दायित्व असतं त्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत. वैद्यकीय शिक्षणाविषयी त्या म्हणाल्या, आज गुणवत्ता कुठेतरी घसरली आहे. ती सुधारणे उद्दिष्ट आहे. आज वैद्यकीय महाविद्यालये भरपूर आहेत. पण या क्षेत्रातील गुरू -शिष्याचं नातं कुठेतरी कमी होताना दिसत आहे. तसेच ब्रेन ड्रेन चा प्रकार या क्षेत्रात वाढताना दिसत आहे. भारतात अनेक उच्चविद्याविभूषित असे डॉक्टर आहेत पण चांगलं काम करण्यासाठी, अधिक पैसे मिळवण्यासाठी अनेक डॉक्टर परदेशात जातात. हे थांबणं गरजेचे आहे. त्याचबरोबर आपले नाशिक शहर आता स्मार्ट सिटी होऊ पाहत आहे . मुबलक जागा, चांगले हवामान, रस्ते,एअर कनेक्टिव्हिटी चांगली होत आहे त्यामुळे लवकरच नाशिक इंटरनॅशनल मेडिकल हब होईल. उत्तम प्रकारचे डॉक्टर्स, चांगल्या वैद्यकीय सुविधा आता नाशिकमध्ये उपलब्ध आहेत.
भारतात वैद्यकीय शिक्षण काही प्रमाणात खर्चिक आहे. त्याविषयी त्यांनी सांगितले की, भारतात वैद्यकीय शिक्षण खर्चिक आहे असे नाही, भारतातही चांगली वैद्यकीय महाविद्यालये आहेत. पण आपल्याकडे आई वडिलांचा एक दृष्टिकोन असतो की माझ्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, त्यामुळे येनकेन प्रकारे त्यासाठी भारतात प्रवेश मिळाला नाही तर परदेशात प्रवेश घेतात. सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत त्या बोलल्या की, नातेवाईक हल्ले करत नाहीत, ते अनेकदा शांत असतात पण तिऱ्हाइत व्यक्ती येऊन त्यांच्या मनात काही भरवून जातो आणि ते आक्रमक होतात. बऱ्याचदा यामागे राजकीय हेतू असतात. पण यामुळे एकेकाळी डॉक्टर तुम्ही देव आहात अस म्हणणारे डॉक्टर तुम्ही सैतान आहात अस म्हणायला उतरतात. डॉक्टर ही माणूसच असतो. हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दोन्ही बाजूने सलोखा राखणं आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.