नाशिक – ७ ते १४ ऑगस्ट, २०२२ दरम्यान इटली येथे ७ व्या विश्व ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उप कनिष्ठ गट, कनिष्ठ आणि यूथ गट अश्या तीन गटांचा समावेश आहे. यामध्ये उपकनिष्ठ (१६ वर्षे) गटाच्या संघामध्ये नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलची खेळाडू राशी सागर जहागीरदार हिची भारताच्या संघामध्ये निवड झाली आहे. राशीबरोबर या गटामध्ये मुंबईचा पावन गोयल, कर्नाटकचा कर्तीकेयन मुत्थुस्वामी आणि कलकत्ताचा तिर्थराज चक्रवर्ती या खेळाडूंचा भारताच्या संघामध्ये समावेश आहे.
राशीने २०१८ च्या करोंनाच्या प्रादुभावाच्या काळात ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू असलेली ब्रीज पाठशाळा जॉइन केली. तीने ब्रीजचा सखोल अभ्यास केला आणि आंतरराष्ट्रीय कोच अनीरूद्ध सांझगिरी यांच्याकडून सर्व तांत्रिक बाबीची माहिती करून घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण एकाग्रतेने सतत सराव केला. तीच्या या मेहनतीचा तिला चांगला फायदा झाला. एप्रिल २०२२ ला आयोजित राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत राशीने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून वैयक्तिक प्रकारात दुसरा क्रमांक आणि पेअर प्रकारात तिसरे स्थान मिळविले. या राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगीरीच्या आधारे संपूर्ण भारतातून ४२ खेळाडूंच्या प्राथमिक निवड करण्यात आली होती. यानंतर झालेल्या शिबिरात राशीने चांगला खेळ करून अंतिम संघामध्ये आपले स्थान पक्के केले.
राशीच्या या निवडीबद्दल तिचा फ्रावशी इंटरनॅशनलचे संचालक रतन लथ, मुख्याध्यापक यांनी सत्कार केला आणि शुभेछ्या दिल्या. राशीची आई डॉ. विशाखा जहागीरदार स्वतः डॉक्टर आहेत. आईने मला संपूर्ण सहकार्य केल्यामुळे आणि माझ्या शाळेने मला सर्व प्रकारची मदत केल्यामुळे मला हे यश मिळवता आले आहे अश्या भावना राशीने व्यक्त केल्या. इटलीत आयोजित या ७ व्या विश्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या संघामध्ये एकूण २२ खेळाडूंचा समावेश असून या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून नाशिकच्या हेमंत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रशिक्षक म्हणून अनिरुद्ध सांजगिरी, विनय देसाई, बिंदीया नायडू, सत्यकुमार आयगार आणि केशव सामंत हे असणार आहेत. ब्रीज हा संपूर्ण बुद्धीचा खेळ आहे. भारताच्या ब्रीज संघाने याआधी वरिष्ठ विश्व स्पर्धेत रौप्य पदक, आशियाई स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. प्रशिक्षकांनी या खेळाडूंकडून चांगला सराव करून घेतला आहे, त्यामुळे हे खेळाडू भारतासाठी चांगली कामगरी करतील असा विश्वास हेमंत पांडे यांनी व्यक्त केला.