नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासन विभाग व नाशिकरोड पोलीस स्टेशन अशी संयुक्त कारवाई करत नाशिकरोड परिसरात छुप्या पद्धतीने अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत लाखोचा अवैध गुटखा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस नाशिकरोड पोलीस पकडण्यात आलेल्या मालाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला. अचानक पडलेल्या या छाप्यामुळे एकच धावपळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहून विक्री करणारे फरार असून त्यांचा शोध नाशिक रोड पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शहर आयुक्त यांनी अवैध अमली पदार्थ विक्री व वाहतूक विरोधी उपाय योजना करण्यासाठी कठोर पावले उचलावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच विविध यंत्रणांना एकत्रित घेत समिती गठीत केली. शहरात ठिकठिकाणी अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आहारी व्यसनाच्या आहारी गेल्याचे निदर्शनास आले होते या गोष्टीची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली.