नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथे शनिवारी राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषि स्कूल कॅम्पसमधील ग्लोबल सोल्युशन या परीक्षा केंद्रावर जीपॅट २०२२ या परीक्षेवेळी ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला. ऐनवेळी सुमारे पन्नासहून जास्त विद्यार्थ्यांना संगणकच उपलब्ध न झाल्याने उपस्थित विद्यार्थ्यां आणि परीक्षा केंद्र संचालकांत शाब्दिक चकमक उडाली. यावेळी विद्यार्थ्यांनी या गैरसोयीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. निर्धारित वेळेत ज्या विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर पेपर सोडविण्यास दिला. मात्र काही विद्यार्थ्यांचा दुपार सत्रात इतर केंद्रावर असलेला सीमॅटचा पेपर देखील हुकला.
नाशिकरोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषि स्कूल कॅम्पसमधील ग्लोबल सोल्युशन या परीक्षा केंद्रावर जीपॅट २०२२ या परीक्षेच्या अत्यंत सुमार नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. ऐनवेळी विद्यार्थी संख्या वाढल्याने आणि काही संगणक कार्यरत होऊ न शकल्याने असा प्रकार घडल्याची माहिती परीक्षा केंद्र संचालक गौरव माळी यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी म्हणून नंतर अशा विद्यार्थ्यांचा पेपर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट २०२२ हि परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेले नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे निरीक्षकांच्या डोळ्यासमोरच हा प्रकार घडला. एनटीएच्या शहर समन्वयकानी या परीक्षा केंद्राला भेट दिली. परीक्षा केंद्र संचालक आणि परीक्षेला वंचित राहिलेले विद्यार्थी यांच्यात यावेळी जोरदार बाचाबाची झाली. काही विद्यार्थी इतर जिल्ह्यांतून आलेले होते. अशा विद्यार्थ्याना चार तास परीक्षा केंद्राच्या ठिकाणी ताटकळत थांबावे लागले. या परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग विलंबाने सुरु झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. संगणकीय प्रणालीतील तांत्रिक दोष दूर करता आला नाही. जीपॅट पेपरची वेळ सकाळी ९ ते १२ अशी होती. त्यानंतर दुपारी काही विद्यार्थ्यांचा सीमॅटचाही पेपर होता. मात्र या गोंधळामुळे या विद्यार्थ्यांना सीमॅट पेपरला मुकावे लागले.