नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलाबरोबर काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पाच संशयितांच्या टोळक्याने बळजबरीने घरात बळजबरीने घुसून साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार घटना सामनगाव रोडवरील जयप्रकाश नगर मधील अश्विनी कॉलनी येथे बुधवारी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान घडला. या घटनेमुळे अश्विनी कॉलनीत या गुन्हेगारी टोळक्याची दहशत निर्माण झाली आहे.
बाळू पवार रा. अश्विनी कॉलनी यांनी मनोज डोंगले, कुणाल सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, सागर पगारे आणि किरण चव्हाण अशा पाच संशयितांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी बाळू पवार यांचा मुलगा अर्जुन उर्फ बाळा पवार याच्याशी अश्विनी कॉलनीतीलच नवनाथ पंडित याच्याशी झालेल्या वादातून हा प्रकार घडला. फिर्यादीचा मुलगा बाळा पवार याने त्याच्या मित्रांच्या साथीने नवनाथ पंडित याच्यावर सामनगाव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात तलवारीसारख्या घातक हत्याराने हल्ला केला होता. या हल्ल्याच्या रागातून संशयितांनी बाळाच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. दरवाजा तोडून घरातील टीव्ही, संसारोपयोगी साहित्य, फर्निचर आणि वीज मीटरची तोडफोड करून नुकसान केले. संशयितांनी परिसरात दहशत निर्माण करून पोबारा केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.के.शेळके करीत आहेत. अश्विनी कॉलनीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांच्या टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्याकडून वर्चस्वाच्या संघर्षात वारंवार प्राणघातक हत्यारांचा वापर होत आहे. परिणामी या भागातील राहिवाशी देखील दहशतीखाली आले आहेत. नाशिकरोड पोलिसांपुढे येथील गुन्हेगारांच्या टोळ्यांचा वेळीच बिमोड करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.